RSS

Friday, June 11, 2010

शिवडीचे रोहित


मला आठवतं पक्षीनिरिक्षणाचा छंद लागल्यापासुन रोहित उर्फ़ फ़्लेमिंगोचं मला जबरदस्त आकर्षण होतं..त्याचवेळी वृत्तपत्रात वाचुन मग एका वडाळ्याला राहणार्‍या मित्राबरोबर २००० च्या फ़ेब्रुवारीत जाऊन हजारोंनी फ़्लेमिंगो पाहुनही आले होते..अर्थात त्यावेळी कॅमेरा नव्हता पण त्याचं शल्यही नव्हतं. नंतर लगेचच साधारण सप्टेंबरमध्ये वगैरे वसई-नायगावच्या मध्येही ते दिसले हजारोंनी नाही पण दहाएक असावेत..नंतर देश सोडेपर्यंत प्रत्येक वर्षी ते तिथे दिसायचे..माझं आणि त्यांचं भेटीगाठीचं काही नातं असावं असे....मग २००५ मध्ये भारतात आले तेव्हा तर आईच्या त्यावेळच्या वसईच्या घराच्या मागेच वीसेक फ़्लेमिंगो काही दिवसांसाठी होते त्यांनाही खूप जवळून न्याहाळता आलं...


तसा हा पक्षी शांतता आणि समुहप्रिय. शांतपणे खाडीतल्या ओल्या मातीत आपली वक्र चोच बुडवून चमच्याप्रमाणे ढवळत राहतील नाहीतर चार-पाच एकदम उडतील..उडतानाचं दृष्य म्हणजे काय वर्णावं...त्यांच्या म्हणजे लेसर फ़्लेमिंगोच्या पंखातील लाल ठिपका मन मोहुन घेतो. आपण योग्य अंतर राखुन दुर्बिणीतून पाहात राहिलो तर तासनतास ते त्यांच्या राज्यात राहतील..

आता यावेळी मे महिन्यात कुठे फ़्लेमिंगो दिसतील असं म्हटलं तर मी ते उडवुन लावलं असतं पण राकेशने आणलेली माहिती अगदी पक्की असते. शिवडीला फ़्लेमिंगो आहेत तू भांडूपला असशील तेव्हा जाऊया असं तो म्हणाला तेव्हा माझे डोळे चमकले. मग काय एका गुरुवारी मुहुर्त काढलाच.

दोघंच दादरहुन टॅक्सी करुन गेलो आणि दुपारी दोनच्या टळटळीत उन्हात चांगले प्रहरभर तरी फ़्लेमिंगो पाहात बसलो. (खरं तर उभे होतो. तिथे बसायला जागाच नाहीये) निदान हजारभर असतील. त्यातले काही त्यातल्या त्यात जवळ होते; त्यांना पाहण्यासाठी तिथेच एका मालवाहु जहाजावर कसलं काम सुरु होतं त्यावर चढुन थोडे जवळुन फ़ोटो काढले आणि बराच वेळ निरिक्षणही केलं. दुपारच ऊन जाणवतही नव्हतं इतकी सावली त्यांच्या त्या लाल-गुलाबी पंखात होती. शिवडीच्या त्या खाडीवर रोहितांबरोबर इतरही पाणपक्षी पाहता येतात. आम्हाला ग्रीन हेरॉन, व्हाईट आयबीस, प्लोव्हर असे इतरही पाणपक्षी दिसले पण तरी त्या दिवशीचे स्टार मेहमान शिवडीचे रोहितच होते....

त्यांची ही फ़ोटोझलक.....



4 comments:

हेरंब said...

मस्त फोटोज आहेत ग.. वडाळा म्हंटलं की फ्लेमिंगोच आठवतात..

मी फ्लेमिंगो पहिल्यांदा पहिले ते सिंगापूरच्या बर्ड पार्क मध्ये :)

अपर्णा said...

धन्यु हेरंब....यावेळी पक्षी, कॅमेरा आणि अर्थात मी असा योग जुळून आला होता म्हणून जरा अप्रुप...नाहीतर आता शिवडीच्या फ़्लेमिंगोची लोकांना सवय झाली असेल....

pwngnd said...

मला ही जंगल भटकंतीची फ़ार आवड आहे...अगदी महाराष्ट्रातील तरी सगळी जंगले पालथी घालावीत असं वाटतं.....तुमचा जसा जंगलप्रेमी मित्रांचा ग्रुप आहे तसा आम्हाला मराठवाड्यात मिळत नाही....सगळ्यांना भटकने म्हणजे फ़ाल्तू पैसा, वेळ वाया घालवने असे वाटते.....मुंबईत जसे sgnp आहे तसे मराठवाड्यात नाही त्यामुळे अंदाजे ३०० km चे तरी अंतर कापून मराठवाड्याच्या बाहेर याव लागत ...मराठवाड्यात जंगल नाही अस नाही ...पण तशी सोबत करणारी माणस देखील नाहीत ...उस्मानाबाद जिल्ह्याच्या पश्चिमेला नान्नज (सोलपूर जिल्हा)गाव आहे गावाच्या पूर्वेला ’माळ्ढोक’Indian Bustard' पक्षासाठीच महाराष्ट्रातील एकमेव प्रसिद्ध अभयारण्य आहे...बघायला गेलो होतो पण साफ़ निराशा सगल जंगल तितल्या रेंजर ऑफ़िसरनी नांगरुन काढ्ल होतं...पक्षी नाही काही नाही सरळ मागं फ़िरलो आणि आलो आहोत तसं म्हणून मार्डीच हेमाडपंती मंदिर पाहून गावी आलो......... अशी ही अपेक्षा

अपर्णा said...

@ व्यंक्या, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत... मराठवाड्यात कुठ पक्षीनिरीक्षण करता येईल ते मला माहित नाही..पण नाणजला मी गेले आहे आणि आम्हाला माळढोक दिसलेही आहेत...त्या परिसरात खुरट्या वनस्पती असतात त्यामुळे जंगलाची जातकुळी वेगळी असते...बर झालं आठवण केलीत आता एकदा लिहीन ह्या विषयावर...असेच ब्लॉगवर येत जा....फार नियमित लिहिणं नाहीये पण जुन जेवढ आठवेल ते सार लिहायची इच्छा आहे...