RSS

Tuesday, May 25, 2010

पार्कवाटा

चार आठवड्याच्या छोट्याशा मायदेश भेटीत नॅशनल पार्क हे टॉप लिस्टवर होतं पण कडाक्याचं ऊन आणि सोबत कुणी नसल्यामुळे प्रत्यक्ष जायला शेवटचा रविवार उजाडला. अर्थात SGNP ला जायला मी कधीही तयार असते.
साधारण साडे-सातला गेटवर राकेश आणि अर्चित भेटणार होते आणि आयत्यावेळी अर्चितचा मित्र अभिषेकही येणार असल्याचं कळलं.अर्थात त्याच्यासाठी न थांबता अर्चितने गाडी वेळेत आत घेतली हे बरं झालं.आता फ़क्त नेहमीसारखं तडक कान्हेरी की आणखी कुठे हे ठरायचं होतं. पण घाईगडबडीत आखलेल्या दौर्‍यात हा प्रश्न त्या दिवसाचं भविष्य जसा दिवस पुढे जाईल तसंच ठरतं.गप्पा मारत मारत गाडी पुढे जात होती आणि आम्ही जुन्या भटकंतीच्या आठवणीत रमत होतो.इथेच कुठे एका मचाणावर जायचो असं म्हणायला आणि गाडी कल्वेट नं. ६५ कडे पोहोचायला एकच गाठ पडली. मग काय आजचा पहिला डेरा तिथेच टाकायचं तिघानुमते ठरलंच.

डावीकडून आत जाणारी पार्कातल्या असंख्य "चलो, अंदर जाते है" कॅटेगरीतल्या अनेक पार्कवाटांपैकी ही वाट तशी बरीच मोठी आहे.सरळ फ़ॉलो केलीत तर मागुन मोराच्या माचीवरुन सरळ हायेस्ट पॉइन्टलाही जाता येतं असं म्हणतात. अर्थात त्याची शहानिशा करण्यासाठी आज तितका वेळ नव्हता हेही खरं.
आत येईस्तो जंगल बरंच शांत वाटत होतं. कदाचित उकाड्यानेही पाखरं चिडिचिप असावीत असं वाटुन काही दिसेल या अपेक्षेत आम्हीही नव्हतो.तरी आज नशीब भलतंच जोरावर होतं. गेल्या गेल्याच रॅकेट टेल्ड ड्रोंगोची (पल्लवपुच्छ कोतवाल हे चितमपल्लींच्या पुस्तकातलं त्याचं मराठी नाव छानच आहे नाही?) एक जोडी समोरच्याच झाडांवर पाठशिवणीचा (उर्फ़ पटवापटवीचा) खेळ खेळत होती. त्यांना दुर्बिणीतुन नीट न्याहाळतोय तोच डावीकडे खसखस ऐकु आली आणि झाडांवरतीही बरीच हालचालही दिसली. Red Whiskered Bulbul लगबगीत होते. दूरवर Indian Cuckoo ची सादही सुस्पष्ट ऐकु येत होती.

पुढे डावीकडे वाटेबरोबर वळलो तशी आमच्या आठवणीतलं मचाण तसंच उभं होतं आणि समोरच पाण्याचा छोटासा साठा पुर्वी या डुगडुगत्या मचाणावर चढल्याचं राकेशला आठवण करुन देत होता. आता बहुधा इथे नवं मचाण येत असावं. जवळच एक कोरा सांगाडा कामगारांची वाट पाहात झोपला होता. इथे बार्बेटचा आवाजही येत होता आणि थोड्याच वेळात त्याचेही जवळून दर्शन झाले.
थोडा वेळ ककुचा आवाज ऐकुन मग पुन्हा मागे वळून थोडंवर जाऊया असं ठरलं पण अर्चितचा जीव अभिषेकसाठी कासावीस झाल्याने तो एकटा परत गेटवर जाय़ला निघाला आणि मी व राकेश थोडं पुढे जाऊन परत यायचं ठरलं. तो निघतोय तितक्यातच राकेशने आमच्या सगळ्यात लाडक्या पक्ष्याच्या मादीला पाहिलं आणि अर्चितलाही पाय वळवावे लागले.Paradise Flycatcher ची मादी साध्या डोळ्यांना दिसेल अशी तिरप्या झाडावर बसली होती. तुम्ही आता नराला शोधा असं सांगुन अर्चित पळाला त्यामुळे आम्ही थोडं चढायला सुरुवात केली.
खरंच तो देखणा नर दिसला तर बरं होईल अशा विचारात होते तोच समोरच्या बाजुने डावीकडून उजवीकडे पळापळ झाली आणि दोन बार्किंग डिअर पळताना ओझरते दिसले. म्हणजे मघाशी त्यांचीच खसखस झाली होती वाटतं?
थोड्या वेळाने पुन्हा ख्यॅक ख्यॅक आवाजाने सतर्क झालो पण त्या बार्किंग डियरने आपल्या मित्रांच्या पाठी जायच्या ऐवजी रेंगाळणं पसंत केलं.तोवर हनुमान लंगुरही अलार्म कॉल देत होते त्यामुळेही ते जागरुक झालं असावं. मात्र आत आत जाताना सुकलेल्या झाडांमुळे निर्माण झालेल्या पोकळ्यांमुळे मात्र आम्ही त्या छोट्या पिलाला स्पष्ट पाहू शकलो.
अजुन थोडं वर जाताना आणखी एक फ़िकट भगव्या रंगाची पक्ष्यांची जोडी डावीकडे उडाली पण ते काय असावं कळणं शक्य नव्हतं. आता आम्हीही बर्‍यापैकी वर आलो होतो. आमच्यातली उरलेली जोडीही आमच्यापर्यंत पोहोचली नव्हती म्हणून आता आणखी वर जायच्या ऐवजी खाली उतरायचं ठरवलं.
खाली उतरताना मटका लागल्याप्रमाणे पक्षीगण दिसले. राखी धनेशाची जोडी उडून कान्हेरीच्या जवळ जात होती.तर हाकेच्या अंतरावर गोल्ड फ़्लेम्ड आणि आणखी एक वुडपेकर झाडाला फ़ेर्‍या मारत होते.हिरवेकंच क्लोरोप्सिस राकेश असला की अपॉइंटमेंट घेतल्यागत भेटतात आणि वाटेबरोबर सोबत करतात तसंच आजही झालं. आणि सूर्यदेव प्रसन्न झाल्याने सुर्यप्क्ष्यांची लगबगही न्याहाळता येत होती. शिक्राही कुणा पक्ष्याच्या पाठी लागत आमच्या डोक्यावरुन उडून गेला.

अर्ध्या वाटेवर अर्चित-अभिषेक भेटल्याने पुन्हा एकदा थोडं वर-खाली केलं यावेळी पुन्हा धनेशाची जोडी आणि Crested Serpent Eagle चा चित्कार कानावर आला. पुन्हा एकदा गाडीने कान्हेरीच्या पायथ्याशी गेलो पण या पार्कवाटेवर इतकं पाहुन झालं होतं की आज गुंफ़ांपर्यंत जायचं कुणीच नाव काढलं नाही आणि एकमेकांनी आणलेला खाऊ गट्टम करता करता पार्कवाटेचंच कौतुक परतीच्या वाटेवर होत राहिलं.

8 comments:

हेरंब said...

अरे वा. हेही करून झालं वाटतं स्वदेस दौ-यात.. मजा आहे !!

बाकी या पोस्टमुळे मला अनेक नवीन नावाचे प्राणी/पक्षी कळले.. ;)

अपर्णा said...

माझ्या प्रत्येक दौर्‍यात हा आणि आणखी एक नेचर स्टॉप असतोच....नवे काय?? बार्किंग डिअर तू डिस्कव्हरीवर ऐकलंही असशील...:)

सागर said...

तुझा हा ब्लोग माहित नव्हता...असो तुझी नवीन आवड कळली...

अपर्णा said...

सागर हा ब्लॉग नीट वाच...ही आवड नवी नाही आहे...फ़ार्फ़ार जुनीच आहे...ब्लॉगवर स्वागत...:)

Sonali Kelkar said...

अपर्णा,
अरे वा! हा ब्लॉग पण मस्त आहे ग!
मी SGNP अजुन पाहिले नाहीये. पावसाळ्यात एक ट्रिप मारावी म्हणत्ये.

दिपक said...

सुंदर भटकंती आणि फोटो.. पक्षीदर्शन करुनही आलीस. मी अजुन तिकडे गेलो नाहिये. गुगल मॅप वरुन मुंबईला पाहिले की नॅशनल पार्क ने किती मोठा व्यापला आहे हे दिसते...

मस्त लिहिले आहेस...
पु.ले.शु.

अपर्णा said...

सोनाली, या ब्लॉगवरही स्वागत....नक्की जा..आम्ही एकदा येऊर पासुन गोरेगाव असं पुर्ण पार्कातून केलं होतं...या ब्लॉगवर जास्तीत जास्त आठवणी फ़क्त SGNP च्याच येऊ शकतात इतकी पडीक असायचे तेव्हा...गेले ते दिन...

अपर्णा said...

धन्यवाद दिपक..गुगल मॅपची आठवण काढलीसच म्हणून सांगते...आता कितीतरी भाग इमारतींनी गिळंकृत केलाय रे...काळजी नाही घेतली तर फ़क्त गेट उरेल की काय दहाएक वर्षांनी अशी भिती वाटतेय...