RSS

Wednesday, January 13, 2010

या नयनी मृग पाहिले मी...

थ्री इडियट्स पाहिल्यानंतर इंजिनियरींगचे दिवस आठवले..का माहित नाही पण मला इंजिनियरींगचं शेवटचं वर्ष जवळ येईपर्यंत इतका कंटाळा आला होता कदाचित डिप्लोमामार्गे डिग्री हा द्राविडी प्राणायाम केल्यामुळेही असेल..पण शेवटी शेवटी मी कॉलेज लाइफ़ला पर्याय म्हणून माझा निसर्गभ्रमंतीचा ग्रुप असं केलं होतं..नंतर नोकरीला लागल्यावर ते जास्त बरं झालं कारण नोकरीतले कॉन्टॅक्स परत विकेन्डला?? बापरे कल्पनाच करवत नाही..तिथेही टिम-मिटिंग नाहीतर पिअर रिव्ह्यु असलं काहीतरी बोलत बसले असते..खरंच याबाबतीत मी फ़ारच नशीबवान आहे, त्यामुळे शेवटच्या वर्षापासून का होईना माझ्या दैनंदिन कामाशी संबंधीत नसलेल्या मित्र-मैत्रीणींबरोबर मी जंगलात जायला लागले..त्यामुळे मला ख~या अर्थाने ब्रेक मिळे. आमच्या ग्रुपमधले सगळे जण वेगवेगळे अभ्यास आणि कामं करणारे होते त्यामुळे जी काही बोलणी होत ती फ़क्त आम्ही त्यादिवशी काय पाहिलं किंवा तत्सम विषयावरचीच असत...असो नमनालाच घडा भरला तेलाने..काय आठवलं होतं बरं??? :)
हां...तर शेवटचं वर्ष...शेवटच्या वर्षाच्या तोंडी परिक्षा सुरू होत्या म्हणजे परिक्षा जवळजवळ संपल्याच होत्या..ग्रुपमधल्या बाकी एक दोन टाळक्यांनाही वेळ असणार होता म्हणून आम्ही प्रथमच संध्याकाळी नॅशनल पार्कला जायचं ठरवलं. आजवर जे काही जायचो ते सात वाजता भेटून मग दुपारपर्यंत भटका असंच. पण यावेळी थोडा बदल करायचा प्रयत्न होता.सर्वांनी ठरवलेली वेळ होती चार वाजेपर्यंत.
गेटवर चार वाजता परिक्षा संपवून जाणं मलाही सहज शक्य होतं.आमच्यापैकी जयेशकडे गाडी होती. मला वाटतं त्याच्या बाबांनी त्यांची जुनी फ़ियाट त्याला वापरायला दिली होती. ही गाडी नंतर आमच्या नॅशनल पार्कच्या बर्याच ट्रेल्समध्ये होती आणि नंतर नंतर तिला प्रत्येकवेळी एकदातरी धक्का मारायला लागायचा त्यामुळे आम्ही त्याला जयेशचा डब्बाच म्हणायचो. तो कधीमधी चिडायचा पण त्याचीच काय आमची सर्वांचीच ती लाडकी होती..बापरे ही पोस्ट म्हणजे आठवणींचं जंगल होणार आता...जाऊदे या ब्लॉगमध्ये तसंही सगळ्या आठवणींचीच स्पर्धा असणार आहे.


तर गाडी असल्यामुळे कान्हेरीपर्यंत जावं असा बेत होता. कान्हेरीच्या मागे डोंगर आहे तिथे एका ठिकाणी मोर दिसतात अशी पक्की माहिती पण होती आणि अजून सरता मे होता म्हणजे येणा~या पावसाळ्यासाठी मोर तिथं नक्की येणार या उद्देशाने आम्ही सहा जण गेटवर भेटलो. नितीन, आराधना, मी, जयेश, राकेश आणि मला वाटतं सुनिल (सहावा नक्की आठवत नाही) होतो. पुढे तीन मागे तीन असे आम्ही पार्काचं तिकीट काढून गाडी आत घातली. उन्हं अजून वर होती. माझ्या मामाकडे जाताना आम्ही रस्त्यात लागणा~या गावदेवीला नेहमी नमस्कार करूनच पुढे जातो तसंच नॅशनल पार्कमध्ये कुठेही गेलो तरी सिलोंडाला थोडं वळल्याशिवाय आमचं घोडं पुढे जात नाही.....यावेळी गेलो तर चक्क सगळ्यांनी नाही म्हटलं मला कारण तिथे आता सेफ़ नाही असं म्हणतात (एकतर फ़ॉरेस्ट ऑफ़िसरनी पकडलं तरी किंवा कुणा टारगट कंपुच्या तावडीत सापडलो तरी म्हणून बहुतेक...) पण म्हणजे तोपर्यंत तरी आम्ही सिलोंडाला आमचा पार्कदेव करुन ठेवला होता. त्याप्रमाणे गाडी बाजुला घेऊन सिलोंड्यात एक छोटी चक्कर मारली. एक-दोन बॅबलर्स काय ते दिसले पण बरं वाटलं. मग आता कान्हेरीत जाऊया म्हणून जरा लवकर निघालो कारण कायद्याप्रमाणे काहीतरी सहा वाजता पार्काच्या बाहेर पडायचं असतं असं म्हणतात. त्यातल्या त्यात कान्हेरीचा पहारेकरी त्यावेळेला जरा हिंडूनफ़िरून, हाकारे देऊन सगळ्यांना बाहेर काढतो. त्यामुळे थोडा वेळतरी तिथे मिळायला हवा होता.


सिलोंडातून बाहेर आलं की पुन्हा मुख्य रस्त्याला एक दोन मिनिटांत आपण पोहोचतो आणि मग संध्याकाळची जंगलाची शांतता सुरू झाली. आम्ही सगळीजणं अगदी शांतपणे ती अनुभवत पुढे जात होतो..खरंच विश्वास बसत नाही की आपण भारताच्या आर्थिक राजधानीतच आहोत, शहराचा गोंगाट अगदी एखाद मैल पलीकडे आहे आणि इमारतींचं जंगलही खूपच जवळ आहे. मेमध्ये पार्कातलं जंगल जरा हिरवळ कमी झाल्यामुळे रिकामं रिकामं असतं.रस्त्याच्या बाजुला नजर वळवली तर मिठी नदीचा ओहोळ आणि त्यापलीकडच्या झाडांतलं ब~यापैकी दिसतं. तसंच तेव्हाही होतं. गाडी मध्ये एक जंगल खात्याचा दांडी पाडून बंद करायल येईल असा गेट आहे (तिथे परत गाड्यांची तिकिटं तपासली जातात) त्याच्या जरा अलीकडे होती आणि मी डाव्या बाजुला बसते होते त्याच बाजुच्या झाडीमध्ये काहीतरी हालचाल मला दिसली. मी जरा जास्तच किंचाळून जयेशला गाडी थांबवायला सांगितलं. गाडी थोडी पुढेच गेली होती कारण काय झालंय कुणालाच कळलं नव्हतं.
मग गाडी जरा रिव्हर्सला घेतली तर माझ्यासारखेच सगळे आनंदाने चित्कारले..संध्याकाळच्या वेळी जंगलात चरायला आलेल्या ठिपकेवाल्या हरणांचा एक कळप रस्त्याच्या जवळपासच्या झाडीत जवळच होता. नीट पाहिले की एक शिंगावाला नर, चारेक माद्या आणि दोन छोटी पिल्लं होती. आम्ही गाडी जरा मागं लावली आणि मग आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये असलेल्या एकुलत्या एक दुर्बिणीने एकापाठी एक त्यांना गाडीमागे लपून बराच वेळ पाहून घेतलं. नितीनकडे कॅमेरा होता त्याने फ़ोटोही घेतले. त्यातल्या एका मादीचं थोडं आमच्याकडेही लक्ष होतं. पण एकतर इथल्या हरणांना थोडंफ़ार सवय असावी किंवा आमच्यापासून धोका नाही हे तरी जाणवलं होतं.


पुन्हा गाडीत बसताना माझं तरी ’आज मै उपर आसमान नीचे’ असं झालं होतं.. अरे कशाला का?? माझ्या आयुष्यात मी स्पॉट केलेला जंगलातला पहिलावहिला कळप...स्पॉटेड डिअर. बोरीवलीच्या नॅशनल पार्कात तशी ब~यापैकी आहेत. पण ती त्यांना असं मनमोकळं नैसर्गिकपणे पाहण्याची ही पहिलीवहिलीच वेळ.त्यावेळी अंगावर आलेले रोमांच आणि ती अत्यानंदता वेगळीच. जंगलात असे रोमांचक क्षण जितके जास्त वाट्याला येतात तितकं आपलं जंगलात भटकंती करायचं वेड अजूनच वाढतं. त्यादिवशी नंतर कान्हेरीला आम्हाला विशेष काही दिसलं नाही. मोरांचा पण नुसता आवाजच ऐकू आला.पण तरी परत जाताना प्रत्येकजण एका नव्या आनंदात होता. पार्कात संध्याकाळचं असंच अधुनमधुन यावं असं सर्वानुमते ठरलं. पुन्हा सारखं सारखं नाही पण अधेमधे गेलोही पण पहिल्या फ़ेरीच्या वेळी पाहिलेली हरिणं आणि तो आनंद आमच्यापैकी प्रत्येकाच्याच मनावर वेगळा कोरला गेला आहे.
कधीतरी दूरदेशी उदास बसले असताना मध्येच ग्रुपमधलं कुणीतरी स्क्रॅप करतं ’अगं आज स्पॉटेड डिअर दिसलं, तुझी आठवण आली’ की वरचा प्रसंग आपसूक डोळ्यापुढे उभा राहतो आणि पुन्हा ते थ्रिल अनुभवते अगदी ही पोस्ट लिहिताना वाटतंय तसंच.

Friday, January 8, 2010

प्रथमा...

जंगल भटकंतीची आवड तशी माडगुळकर, चित्तमपल्ली आणि अशाच अनेक लेखकांच्या पुस्तकांप्रमाणे लागली पण प्रत्यक्ष मात्र कुठे जायचं, कसं जायचं आणि मुख्य म्हणजे कोणाबरोबर..(मुलगी असल्यामुळे हा यक्षप्रश्नच) हा मोठाच प्रश्न होता. पण सुदैवाने बहुतेक १९९७ मध्ये ठाण्यामध्ये ओवळा येथे एक पक्षिमित्र सम्मेलन भरणार होतं आणि त्याची फ़ी तशी परवडणारी होती. माझी एक मैत्रीण भारती जिला खरं पक्षीनिरीक्षणामध्ये तसा काही रस नव्हता पण मुंबईतल्या मुंबईत बदल म्हणून ती चटकन हो म्हणाली आणि त्या सम्मेलनाला तीन दिवसांसाठी सगळ्या अट्टल पक्षीमित्रामध्ये मी नवशिकीही सामिल झाले. आम्ही दोघींनी त्या सम्मेलनात जमेल तेवढी धमाल केली. मुंबईतल्या लोकांकडून त्यावेळी सारखं बी.एन.एच.एस. हे नावही ऐकलं आणि सारखं वाटलं की आपल्याला जर हे शास्त्रशुद्ध जमवायचं असेल तर हा हॉर्नबिल हाऊस शोधलंच पाहिजे..
त्यात काय मुंबई आहे घ्या पत्ता आणि शोधा असं इतकं सोपसं वाटणारं हे प्रकरण खरंखरं शोधायला मला मध्ये एक-दिड वर्षे तरी गेली.एकतर इंजिनियरिंगचं विचित्र श्येडूल (म्हणजे सुट्ट्यांच्या बाबतीत) आणि त्यात टाउन साईड म्हणजे त्याकाळात लांब कुठेतरी असंच एकटं कसं निघायचं, घरची सोडतील का असे सगळे प्रश्न तर होतेच आणि एकदा प्रयत्न केलाही होता पण चर्चगेटवरून कसं जायचं ते कुणी नीट सांगेना. त्यामुळे एकदा माझे एक आय.आय.टी. मधुन शिकलेले आणि आता स्वतःची छोटी फ़ॅक्टरी असणारे सर कम मित्र यांच्याबरोबर बी.सी.एल.ला जायचं झालं तेव्हा त्यांनी माझा प्रश्न चुटकीसरशी सोडवला.


आणि खरंतर त्यांनी हॉर्नबिल हाऊस मला दाखवलं तेव्हा त्याला एक वळसा घातल्यावर माझं मलाच हसायला आलं कारण आपलं मुंबईचं ते प्रसिद्ध प्रिन्स ऑफ़ वेल्स म्युझियम आहे ना त्यांच्या बरोबर पाठीला पाठ लावून हे धनेशाचं घर आहे..म्हणजे खरंतर म्युझियमचाच भाग यांना वापरायला दिलाय. कुणी त्या ऍड्रेसमध्ये जर म्युझियमचा उल्लेख लॅन्डमार्क म्हणून केला असता तर मला त्या सरांना उगाच त्रास नसता द्यावा लागला. तर असो..शुभस्य शीघ्रम..लगेच त्यांची वार्षिक वर्गणी भरून छान छान पक्षी पाहायला जायचं अशी स्वप्न रंगवत घरी आले. हे बी.एन.एच.एस. शोधणे आणि त्यांची मेंबरशीप घेणे यासाठी माझ्या बाबांनी मला इतका छान सपोर्ट दिला की त्यांनी जर पाठबळ दिलं नसतं तर मग एक मुलगी, लांब पडतंय, काय सारखं सारखं जंगलांत अशा आईच्या प्रश्नांना मला अजिबात सांभाळता आलं नसतं....
तर एकदाचं बी.एन.एच.एस.चं पत्रक आलं ज्यात मला जमण्यासारखा एक नेचर ट्रेल होता बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कात (त्याला आता फ़क्त एस.जी.एन.पी.च म्हणतो आमचा ग्रुप म्हणजे काही नाही वेळ वाचतो कुठे भेटायचं हे सांगायला). ती ९९ च्या मान्सुनची सुरुवात होती त्यामुळे इंजिनियरींगच्या सुट्ट्याही सुरू होत्या. घरातून कुणी आडकाठी करायचा प्रश्न नव्हता कारण दिवसा ढवळ्या जाऊन दुपारी परत असं लिहिलं होतं..

उशीर नको म्हणून वेळेच्या आधीच गेटवर पोहोचले. माझ्यासारखाच गेटवर अजुन एक मुलगाही थांबला होता. इतर काही टोळकी आपापल्या कंपु मेंबरची वाट पाहात होती. होता होता बरीच टोळकी मध्येही गेली..अजुन काही डोकी एकत्र व्हायला लागली पण हे बी.एन.एच.एस. वाले कुठं आहेत काही कळेना म्हणून मग त्या पहिल्यांदी पाहिलेल्या मुलाला (तोही माझ्यासारखाच थांबला होता म्हणून) विचारलं की बाबा तू पण बी.एन.एच.एस. च्या ट्रेलसाठी आलास का?? हो..नशीब ग्रुपलीडर नाही तर कुणी ग्रुपवाला भेटला म्हणून त्याच्याच बाजुला थांबले. अगदी मोजकं आणि शक्यतो पक्षी आणि अशाच गोष्टींबद्द्ल बोलणारा माझा पहिला वहिला मित्र ’राकेश’ हा मला अशा प्रकारे भेटला. त्यावेळी अर्थातच तो फ़ार काही बोलला नाही पण ओळख झाली.त्यानंतर थोड्या वेळाने एका मुलीने माझ्याशी ओळख करून घेतली ही आमची "आराधना".मग असेच अजून जयेश, नील, लोऑन आणि काही लोकं गोळा व्हायला लागले...आम्ही बरेच जण बी.एन.एच.एस.साठी प्रथमच येत होतो... तर राकेशने, आता याचा राक्या झालाय...इतर एक-दोन टोळक्यांना विचारून ट्रेलमधले बाकी सवंगडीही गोळा केले पण पत्यातले भिडू गोळा झाले पण हुकुमाच्या एक्क्याचा पत्ताच नव्हता. मग कुणीतरी जुन्या मेंबरने कुठे कुठे फ़ोन करून आम्हाला माझ्यासाठीची दुःखद बातमी दिली की काही कारणाने ग्रुप लीडरला येता येणार नाही म्हणून मग ट्रेल कॅंसल...श्या काय बी.एन.एच.एस. आहे?? मी आणि माझ्यासारखे बरेच नवशिके म्हणाले.." इनका आजकल ऐसे होता है" अजून एक नकोशी कॉमेन्ट...आयला कुठल्या मुहुर्तावर जॉइन केलं?? घरी जाऊन पोपट..माझा आणि बाबांचा..
पण इतर काही जणांच्या सुपीक डोक्यातून आता आलो आहोत तर स्वतःच जाऊया म्हणून कल्पना आली आणि चला चला म्हणून आम्ही एकदाचे नॅशनल पार्कमध्ये घुसलो...आधी शाळेत असताना आलेलं नॅशनल पार्क म्हणजे आठवतही नव्हतं कसं जायचं, कुठे काय पण नेहमी येणार्या मंडळींमुळे हा प्रश्नच पडला नाही. सरळ कान्हेरीच्या रस्त्याला चालायला लागायचं आणि मग जे ज्या ज्या क्षेत्रात रस घेणारे होते त्यांनी त्यांचं जंगल नॉलेज नवशिक्यांना वाटायला सुरूवात केली. कुणी झाडांची माझ्या डोक्याच्या संपुर्ण वरुन जाणारी (अजुनही ती नावं वरूनच जातात पण जाता जाता आधी ऐकल्याचं ओळखीचं हसू देऊन जातात) नावं, कुणी किटकांची लांबलचक नाव देतंय..मी बापडी स्वतः चुपचाप राहून चालत होते..अहो तोंड उघडण्यासारखं काही माहित पण असायला हवं ना??


नशीब त्यातल्या त्यात गेटजवळचा नेहमीचा (नेहमीचा आता तेव्हा अरे वा शुभ आणि यॉंव..)भारद्वाज दिसला. तसंच, पार्कातल्या छोट्या तलावात डॅब-चीक, हेरॉन, मुरहेन, खंड्या असे पक्षीगणही दिसले होते त्यामुळे माझं पक्ष्यांबद्दलचा रस वाढत होता..आमच्या पैकी आराधनाला झाडांबद्दल खूपच माहिती होती आणि राकेश आणि जयेश पक्ष्यांना पटापट ओळखत होते. आपण खूप बच्चू आहोत असं जरी वाटलं तरी ते माहित होतं आता फ़क्त योग्य संगत मिळावी आणि देर ही सही पण आपल्या आवडीला जोपासावं यासाठी हा ट्रेल आमचा आम्ही केला ते माझ्यासाठी खूपच बरं होतं.


कदाचीत जो कुणी लीडर होता त्याने नेलं असतं आणि मग हवं तसं थांबता नसतं आलं किंवा त्याने फ़क्त झाडं किंवा किटकच दाखवले असते तर?? अर्थात तसं होत नाही पण उगाच या सगळ्या तेव्हाच्या कुशंका....त्यानंतरच्या ट्रेलमध्ये कळलं की ही वरची पक्ष्यांची यादी तर नॅशनल पार्कातल्या पहिल्या दहा मिन्टांत होतेच पण खरे पक्षी नंतर आत आत गेले की दिसतात. असो. तर त्या दिवशी मग दुपारी काही जण कान्हेरीपर्यंत पुढे गेले. मी मात्र घडाळ्याच्या हिशेबाने आराधनाबरोबर परत फ़िरले. परतीच्या वाटेवर माझ्याकडे या जंगल जगात माझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेले आणि माझ्या दैनंदिन जिवनाशी अजिबात निगडीत नसलेले अनेक नवे मित्र मला मिळाले होते.


आता यापुढे आपणही असंच त्यांच्यासारखं चांगली दुर्बिण (जेव्हा जमेल तेव्हा घेऊन) मस्त पक्षी पाहात रानोमाळ हिंडणार या विचारानेच परतीचा रस्ता कधी संपला आणि पुन्हा एकदा ट्रेनच्या गर्दीत कधी शिरलो कळलंच नाही. ये पुढच्या वेळी नक्की फ़ोन करुन ठरवू हं?? आराधनाला टाटा करताना म्हणत होते..माझ्याकडे स्वतःचा फ़ोन नंबर नसल्याचं मला प्रथमच इतकं वाईट वाटत होतं....
या छोट्या ट्रेलमुळे मिळालेले माझे हे मित्र मी भारतात असेपर्यंत जंगल भ्रमंतीसाठी कायम सोबतीला होते आणि आता जाते तेव्हाही मला पुन्हा त्या जगात घेऊन जातात.आणि त्यामुळे त्यादिवशीचा बी.एन.एच.एस.चा जो कुणी टिम लीडर होता तो न आल्याबद्दल या पोस्टमध्ये त्याचे खास आभार.

Thursday, January 7, 2010

पुनश्च:गणेशा...

सध्या माझ्या बर्याच ब्लॉगर मित्रमैत्रीणींनी सहजच त्यांच्या मनातलं सांगितलं आणि ते म्हणजे आता त्यांना ब्लॉगवर नियमितपणे लिहिता येणार नाही..त्यानंतर मग जिवनिकेने अगदी योग्य शब्दात त्यांना समजावलंही आणि ती पोस्ट वाचताना मला आठवलं की ही लोकं निदान छान छान पोस्टस लिहून तरी निवृत्तीचे संकेत देतात पण मी मात्र अगदी (बहुतेक उसन्या) उत्साहाने चालु केलेल्या या भटकंती ब्लॉगचं मी काय करुन ठेवलंय?? नव्याचे नऊ पण नाही फ़क्त दोन पोस्ट्स?? छे ते काही नाही यावर्षात या ब्लॉगवरचा आळसही थोडा झटकला पाहिजे नाही का??
खरं सांगायचं तर या ब्लॉगची सुरूवात केली त्याची मूळ कारणं दोन एक म्हणजे पहिली पोस्ट आहे ती मला कुणीतरी वाचून त्यावर विचार करावा असं जाम वाटत होतं आणि कुठच्या वर्तमानपत्रात ते छापायला वगैरे द्यायचं का हे ठरवायच्या आधीच मी परतीच्या प्रवासाला निघाले मग ते राहून गेलं आणि दुसरं दिपक माझा मित्र ज्याचा ब्लॉग सगळीच वाचतात नेहमी म्हणायचा की तू पण एक ब्लॉग सुरू कर, एकदा सुरू केलं की लिहिलं जातं इ.इ. तेव्हा मग मलाही वाटलं की जे काही आपण भटकलोय त्याच्य आठवणी खरंच लिहील्या पाहिजेत म्हणून मग चालू केलं आणि पोस्ट नं. २ लिहिल्यानंतर बास...असं कसं...
म्हणजे त्याचं काही नाही फ़क्त मी फ़ार्फ़ार पूर्वीच बाबांच ऐकलं असतं तर या ब्लॉगवर टाकायलाही बरंच काही मिळालं असतं पण ....जाऊदे...नेहमी म्हणतात (अजुनही),"अपर्णा, तू जिथे जातेस त्या जागांबद्दलचे अनुभव लिहून ठेवत जा".त्यांचं ऐकून फ़क्त सागरगडाबद्द्लच लिहीलं होतं ते तसच्या तसं उतरवलं आणि पुन्हा पाढे पंचावन्न...असो...आता आतापर्य़ंत या ब्लॉगवर कॉमेन्ट आली होती की हा ब्लॉग असा उदास का? म्हणून घोळत होतं मनात..पण आज रोहनच्या सप्त शिवपदस्पर्श वाचल्यावर असं वाटलं की अगदी त्या पातळीवरचं नाही पण थोडंफ़ार जुनं आठवून पाहायला काय हरकत आहे??
असं म्हणतात की शेंडेफ़ळाचे लाड जास्त होतात म्हणून माझिया मनाचे लाड जास्त आय मिन पोस्ट्स जास्त झाल्या का? पण आईला सगळी मुलं सारखी तसं हे मोठंही या वर्षी थोडं अजून मोठं करूया असं ठरवतेय..अर्थात हा निग्रह नाही पण बघुया किती आठवतं ते?असो.
नमनाला सांगायचं तर कदाचित माझ्या बाबांमुळे माझ्या रक्तात हे आलं असावं..जेव्हापासून पुस्तकं वाचायला लागले तेव्हापासून व्यंकटेश माडगुळकरांचं लिखाण आणि तेही त्यातलं जंगलाचं वर्णन वाचून भारावल्यासारखं व्हायचं. मारूती चित्तमपल्लीबरोबर आपणंच पक्षी पाहातोय असं वाटायचं. कधी हे स्वतःही करू असं वाटलं नाही पण मला वाटतं बहुतेक ९८ साली ठाण्याला पक्षिमित्रसंमेलन भरलं आणि मैत्रीणीबरोबर त्याला गेले. तिथे बी.एन.एच.एस.ची माहिती कळली आणि शेवटी ते मला मिळेपर्यंत म्हणजे साधारण १९९९ साली जंगल भटकंती, थोडंफ़ार पक्षिनिरीक्षणाचा खर्या अर्थाने नाद लागला.
त्यानंतर भारतात असेपर्यंत म्हणजे २००३ पर्यंत त्या भटक्या मंडळींबरोबर जमेल (आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल) तेवढी बरीच भटकंती केली.कुठेच जायला नसलं म्हणजे आपलं हक्काचं बोरीवलीचं नॅशनल पार्क, त्यात एवढ्या वेगवेगळ्या आतल्या ठिकाणी गेलो, एकदा फ़ॉरेस्ट ऑफ़िसरसमोर उठाबशाही काढल्यात. ते मंतरलेले दिवस पुन्हा येणं अशक्यच आहे पण त्यांच्या आठवणीत रमण्यासारखं दुसरं सुख नाही. तेव्हा कॅमेराही नव्हता आणि जो तो त्यांचे फ़ोटो काढी त्यातले नेहमीच मागायला कसंतरी वाटे शिवाय त्यांचा डिजीटल कॅमेराही नसे त्यामुळे जे काही आहे ते सर्व फ़क्त काही आठवणींच्याच कॅमेर्यात कैद. सगळं तसच्या तसं नाही पण बरचसं आठवेल या अपेक्षेने हा पुनश्च: श्रीगणेशा.