RSS
Showing posts with label सह्याद्रीच्या संगतीत. Show all posts
Showing posts with label सह्याद्रीच्या संगतीत. Show all posts

Sunday, October 17, 2010

लोहगडावर एक रात्र आणि दिवस

जसजशी निसर्गभ्रमंतीची आवड निर्माण होते तसतसं हळुहळु नेहमीची नॅशनल पार्क आणि अशा जवळपासच्या जागा सोडून थोडं वेगळ्या जागीही जावंसं वाटायला लागतं. त्यात जर वेळीच योग्य सोबती मिळाले तर मग सह्याद्री हा आपला जवळचा मित्र बनुन किती ओढ लावतो हे ज्यांनी ती तशी भटकंती केलीय किंवा करतात त्यांना सांगायलाच नको.


अशाच एका चर्चेत संगिताने तिच्या माहितीतलं कुणीतरी लोहगडावर जाणार आहे त्यांच्या बरोबर जाऊया का अशी कल्पना पुढे आणली आणि जवळजवळ सगळेच तयार झाले.२००० च्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये साधारण खूप पाऊस नाही पण गरमीही नाही अशावेळी आम्ही जायचं ठरवलं. सारेच मुंबईहून जाणार असल्याने एका शनिवारी दुपारी सिंहगडने लोणावळा आणि मग लोकलने मळवली गाठावं. संध्याकाळी चढून, रात्री गडावरच्या गुंफ़ेमध्ये राहावं, रविवारी गड हिंडून मग दुपारी जरी परतीचा प्रवास सुरु केला तरी रविवार रात्रीपर्यंत सारी घरी पोहोचतील अशी साधारण आखणी होती.

आम्ही जवळजवळ सगळीच जणं व्हीटीला भेटलो. माझा क्लायन्टही तेव्हा फ़ोर्टला होता त्यामुळे मलातर जास्तच सोयीचं होतं. शनिवारची दुपार कधी येते असं झालं होतं. एकत्रच भेटल्यामुळे गाडीत एकत्र बसायला मिळालं..लोणावळा-पुण्याला ट्रेनने जायला मला फ़ार आवडतं..कर्जतचा वडा खायचा, पावसाळ्यातले हिरवे डोंगर, धबधबे पाहायचे...ट्रेकच्या आधीच मन प्रसन्न होतं. मला आठवतं हे वडे खाल्यावर सगळ्यांनी आपापला कचरा गाडीबाहेर फ़ेकु नये म्हणून आमच्या ग्रुपमधल्या सत्यमने एक उत्स्फ़ुर्त रोड (की ट्रेन) शो केला होता. जमुरे टाइप संवाद म्हणून आणि आम्ही पण त्याला साथ केली होती. आमच्या सहप्रवाशांना त्यामुळे आम्ही पावसाळ्यात दंगामस्ती करणार्‍या भटक्यांपेक्षा काही वेगळे आहोत असंही वाटलं असावं. पण एक खरं तो प्रवास खूप छान झाला होता. त्या आठवड्याच्या कामाचा शीण हळूहळू विसरायला होत होता.

मळवलीपासुन आधी जो गावातून रस्ता जातो आणि मग डावीकडे भाज्याची लेणी दिसतात तिथपर्यंत सगळं छान सुरु होतं. नंतर मध्ये मध्ये थोडा चढ येतो..(मला वाटतं आता तिथंही रस्ता झाला आहे. पण मी स्वतः नंतर तिथं गेले नाही त्यामुळे नीट माहित नाही) तर त्या चढावाच्या इथे का माहित नाही मला धाप लागायला लागली. पहिल्यांदीच रात्री राहायचा प्लान असल्यामुळे पाठीवर राहायचं, खायचं सामान, पाण्याच्या बाटल्या हे नाही म्हटलं तरी वजनच; शिवाय कामाचा दिवस, त्यामुळे शरीर संध्याकाळी थोडं थकलेलंही होतं. मग माझं काही सामान राकेश,जयेश यांनी काढुन घेतलं आणि माझीही गाडी हलु लागली. खरं हा सगळा आणि यानंतर काही ट्रेक केले त्यातुलनेने लोहगड खूप सोपा आहे आणि नंतर तर सरळ पायर्‍याच आहेत पण त्यावेळचा माझा तो दुसरा किंवा तिसरा ट्रेक होता त्यामुळे सवय नव्हती म्हणूनही असं झालं असावं..

पुन्हा गाव लागुन पायर्‍या लागेस्तो अंधार पडायला लागला होता आणि आमच्या गाईडच्या मते आता लवकर माथा गाठायला हवा. पायर्‍यांचा रस्ता संपेस्तो जवळजवळ अंधारच झाला होता त्यामुळे आम्ही आमच्या पथार्‍या पसरायला पहिले जागा शोधायला सुरुवात केली. तिथे आमच्या आधी आणखी एक ग्रुपही वस्तीला होता आणि मला वाटतं आमच्या ग्रुपमध्ये मी आणि संगिता दोघीच मुली होतो त्यामुळे मग आमच्या रक्षणकर्त्या ग्रुपमित्रांनी आम्हाला सोयीस्कर पडेल अशा जागेची सोय केली...एकदा तिथे सेट झाल्यावर मग बरोबरीच्या खाऊची अंगतपंगत झाली आणि एकदम आम्हाला आठवलं की सुनीलपण येईन असं म्हणाला होता. आम्ही असं म्हणतोय तोच स्वारी चक्क ऑफ़िसचे कपडे आणि लेदरचे बुट अशा अवतारात हजर..मला वाटतं तो कुठल्यातरी इंटरव्ह्युवरुन सरळ इथेच येत होता. कसा काय अंधारात पोहोचला माहित नाही पण ही वल्ली नॅशनल पार्काच्या बाजुला राहुनही खूपदा स्लिपरमध्ये आमच्या बरोबर कान्हेरीला आलीय..कारण घरी नाक्यावर जातो असं काहीतरी सांगितलेलं असायचं मग दुसरं काय करणार?? असो..तर त्या रात्री झोप कमी आणि गप्पा जास्त असं सुरु होतं.

सकाळचे नक्की किती वाजले होते माहित नाही पण गडाखालुन एक सुंदर शीळ येत ऐकु येत होती. अरे Malabar Whistling Thrush अर्चित लगेच म्हणाला..त्या आवाजाचा मागोवा घेण्यासाठी सगळेच एक एक करुन उठले पण त्या दिवशी एकंदरित पक्षीदर्शन नशीबात नव्हतं. खरं तर त्या पूर्ण ट्रेकमध्ये नंतर दिसलेली पांढरपाठी गिधाडं सोडली तर काहीच पाहिल नाही पण जे काही निसर्गदर्शन झालं त्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील.

त्या थ्रशच्या निमित्ताने उठल्यामुळे प्रथमच गड पाहिला कारण आलो तेव्हा रात्रच होती.सगळा हिरवा आसमंत धुक्याने भरुन गेला होता आणि शुद्ध हवेचा एक वेगळा वास आणि प्रसन्नता जाणवत होती. मला आठवतं मी आणि संगिता त्या धुकंमिश्रीत हिरवाईला पहिल्यांदी पाहताना वेड्यासारख्या इकडे-तिकडे भटकत होतो. सूर्यदेव आले की ते विरणार हे चांगलं ठाऊक होतं ना?

थोड्या वेळाने आम्ही कुणाच्याही सुचनांशिवाय पटापट सकाळची आवराआवरी केली. आमच्याबरोबर संगिताचे एक मित्र (मी त्यांचं नाव पूर्ण विसरले आहे) आम्हाला गाईड म्हणून आले होते ते एकदम पट्टीचे भटके होते त्यामुळे त्यांनी चहाची सोय केली आणि आम्ही बरोबर आणलेल्या सुक्या खाऊचा नाश्ता करुन लगेचच बॅगा बांधुन भटकंतीला तयार झालो.


हे माझे सुरुवातीचे ट्रेकचे दिवस म्हणजे कॅमेरा नाही आणि नोंदी ठेवायचा आळस असे असल्याने आता जितकं आठवतं तितक्यावरच विश्वास. पण त्यांनी आम्हाला सगळा गड फ़िरवला, माहिती दिली आणि सर्वात शेवटी आम्हाला विंचुकाटा हा साधारण गडाच्या सोंडेसारखा भाग आहे तिथे ते घेऊन गेले होते. इथे जाण्यासाठी गड आणि विंचुकाटा यामध्ये एक थोडा कठीण उतरायचा पल्ला आहे. तो मी तरी या गाईडच्या मदतीनेच उतरू शकले होते. पण आमच्या ग्रुपमधल्या जयेशला का माहित नाही अजिबात ते जमलं नाही..आणि मग तो तिथंच आमची वाट पाहात बसुन राहिला होता. परत जाताना ट्रेनमधुन हा विंचुकाटा दिसतो आणि आम्ही जिथे जयेश बसला होता त्या जागेला "जयेश पॉइन्ट" असं नाव देऊन त्याची बरेच महिने टरही उडवली होती.असो, पण या ठिकाणी वारा पीत थांबलो होतो तेव्हा तीन-चार पांढरपाठी गिधाडं जवळजवळ आमच्या डोक्यावरुन घिरट्या घालत गेल्याचं आठवतंय.

आधी आम्ही पोटपुजा विंचुकाट्यावर करणार होतो पण मग आमचाच एक मित्र तिथे एकटा होता त्यामुळे जास्त वेळ काट्यावर काढलाही नाही पण तिथुन वारा भन्नाट लागत होता आणि आजुबाजुचा हिरवा परिसर, शेती इतकं छान वाटत होतं ना?? शिवाय आम्हाला मुंबईला जायचं असल्यामुळे परतीचा प्रवास सुरु करणं भाग होतं. परत येताना आमच्या गाइडने मग आम्हाला गडाचे दरवाजे इ.ची सुद्धा माहिती दिली. एकंदरित मजा आली..पावसाळ्यात कर्जतच्या पुढं कुठंही गेलं तरी निसर्ग वेड लावतो. त्यात असा एखादा गड चढला की वरुन दिसणारं नयनरम्य दृष्य ती जादू मनःपटलावर कोरून ठेवते.

कॅमेरा तेव्हा नव्हताच त्यामुळे फ़ोटो नाहीत, ज्या व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे तिथे गेलो ती संगिताही नाही, पण आठवणी आहेत. मागे एकदा कुणीतरी लोहगडचे फ़ोटो मेलमध्ये पाठवले होते त्या अनामिकाचे आभार मानुन तेच इथे चिकटवतेय. आणि आठवणीतल्या या अशा जागी पुन्हा केव्हातरी नक्की जाईन असं मनातल्या मनात म्हणतेय...

Thursday, September 6, 2007

सागरगडची सफर

सोमवार ते शुक्रवार आणि कधीकधी शनिवारीही काम करुन थकलेल्या मनाला निसर्गभ्रमंतीसारखा उपचार नाही़. त्यातही जर पावसाळा असेल तर दुधात साखर.

अशाच एका शनिवारी रात्री आमचा १५ जणांचा ग्रुप सागरगडला जायला निघाला. मुंबई सेंट्रलहून रात्री उशिराची एस टी पकडून पनवेल स्थानकात पोहोचलो. सकाळी .३० ला आम्हाला दुसरी एस टी पकडायची होती, त्यमुळे मधल्या वेळेत काही TP करणे भाग होते. काही जणांनी गप्पा मारत वेळ काढला. मी मात्र चक्क फलाटावर त्यातल्या त्यात सुसिस्थीतला बाक पाहून झोपुन गेले.

सक्काळ सक्काळी स्थानकातल्या कँटिनमधले गरमागरम पोहे ( देव भले करो त्या आचाऱयाचे) आणि काँफी घेऊन बस पकडलीसाधारण १५-२० मिनिटांत खंडाळे (हे वेगळे) गाव येते; हाच सागरगडाचा बेस.

अतिशय आल्हाददायक दिवस होता. पावसाची सर मधुनच हजेरी लावुन जाई. सभोवार पसरलेली हिरवी शेते, तिन्ही बाजुला हिरवे डोंगर पाहून कालचा प्रवासाचा शीण कुठच्या कुठे निघुन गेला आणि :३० ला आम्ही गडाच्या दिशेने कुच केली.सुरूवातीला लक्षात येत नाही की आपण नक्की कुठच्या बाजुने चढणार. साधारण पाउण अंतर संपले की लक्षात येते की आपल्याला कुठे जायचे आहे.प्रथम साधारण तासभराचा टाररोड आहे जो गावातून जातो. पण या वाटेवरुन चालताना मध्येच घर, थोडीशी शेती, त्यातले लहरणारे बहुतेक भाताचे पीक बघतान कळतही नाही की वाट कशी संपली ते.त्यानंतर जरा रुंद पायवाटेवरुन चालताना बाजुला एक ओढा सतत आमच्या सोबतीला होता. असं वाटत होत की वर कुठेतरी एखादा धबधबा असावा.

हळुहळु वाट कशी अरुंद होत गेली हे कळलेही नाही आणि थोडा थोडा चढ लागायला लागला. अधुनमधून छोटे छोटे ओहोळ होतेच. मी ओहोळ आला की बुटात पाणी जाउ नये म्हणून ते काढून हातात घेई आणि परत घाले. फ्लोट्सवाल्याची मजा होती. यानंतर आपणपण पावसाळी भटकंतीत बूट नाही घालायचे असे ठरवले पण पुढच्या वेळी नाही घातले आणि जो प्रसंग आला तो पुन्हा केहातरी !


अशाच एका ओहोळापाशी बसुन बुट घालताना मला राखी धनेशाची ( Gray Hornbill) जोडी दिसली. हा पक्षी दिसणे म्हणजे त्या जंगलातली वनसंपदा समृद्द असण्याचा संकेत आहे त्यामुळे मन अजुन तरतरीत झाले. एका ठिकाणी थोडा Rocky Patch लागला जिथे चढताना बऱयापैकी धाप लागते. पण हा चढ संपताच अहाहा ! डोळ्याचे पारणे फिटेल असा सुंदर धबधबा उजवीकडे जणू आमचीच वाट पाहात होता. इतका वेळ बांधलेले अनुमान खरेच होते तर..... ज्या बाजुने आम्ही चढलो होतो तिथुन तरी धबधब्याकडे जाणे शक्य नव्हते म्हणून आम्ही तो आमच्या बरोबर समोर येइल असे किती वेळ बसुन राहिलो ते कळलेही नाही. एकटक उंचावरुन सतत पडणाऱया पाण्याची गाज एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. अशा वेळी बरोबर ५ असो की १५ कुणाचे अस्तित्व जाणवत नाही. सर्वांचीच थोडीफार अशीच अवस्था असावी. पण वर जाउन माघारी परतायचे तर मार्गक्रमण करणे प्राप्त होते. धबधब्यापासुन पाचेक मिनिटांवर एक देऊळ लागते. इतक्या ऊंचावर येऊन बसण्याचे कष्ट फक्त आपले शंकर भगवानच करु शकतात हे सुज्ञास सांगणे न लगे. हमममम तरी तो भोळा ः) असो. बाजुला एक विहीर आणि ओहोळ पण आहे.

देवदर्शन करुन आम्ही बाकीच्या मंडळींची वाट पाहत बसलो. इथे माकडेही होती त्यामुळे सामान बघत बसावे लागले.
आमच्यातील आठजण देवळात मुक्काम करुन दुसऱया दिवशी पुढे जाणार होती तर उरलेली आम्ही सातजण त्याचदिवशी गडावर जाऊन परतणार होतो. त्यामुळे सर्वजण देवळापर्यंत चढल्यावर बाकीच्यांचा निरोप घेऊन हम सात पुढच्या मार्गाला लागलो. अगदी सांगायचे म्हणजे या सात जणांत वय वर्ष दहा असणाऱया जुळ्या बहिणीपण होत्या.

देवळापर्यंत चढण्याचे कष्ट केल्यावर मात्र बराच पठारी भाग आहे आणि तिथे थोडी वस्ती आहे. बहुधा ठाकरवाडी असावी. परत येताना आम्ही एका घरातून अस्सल गाडगीळी (म्हणजे आपलं गाडग्यात लावलेलं हो) दही घेतलं होतं.
शाळेत वाचले होते की शिवाजी महाराजांच्या काळात गडांवर वस्ती असे. ही ठाकरवाडी पाहून ते आठवले. वाटले पु.लं.च्या कथेप्रमाणे कुणीतरी आठवण काढील," महाराजांच्या टायमाला.........".

या हिरव्या रस्त्यावरून चालताना खूप मजा येत होती आणि विशेष म्हणजे थकवाही अजिबात जाणवत नव्हता. आता हळुहळु गडाचे पठार दॄष्टिपथात येऊ लागले. गड साधारण जवळ येऊ लागला तोच एक पंधरा वीस मिनीटे एकदम गर्द राई लागली. इथे जास्त थंडावा होता. आणि चालताना Malabar Whistling Thrush ची सुरेख शीळ सोबतीला होती. हा एक सुंदर गाणारा पक्षी आहे जो थोडा थोडा वेळ थांबून खूप सुंदर Notes मध्ये गातो. माझे मन थोड्या वेळासाठी लोहगडावा गेले; जिथे मागच्या वर्षी वस्तीला राहायची संधी मिळाली आणि पहाटे हीच शीळ ऐकुन वेडावलो होतो.

या रम्य वातावरणातून चालत साधारण अकराच्या सुमारास आम्ही गड काबीज केला. वारा पिऊन घेण्यासारखे हिरवेगार पठार आणि जुन्या काळचे काही भग्न अवशेष, कुठे एखादी तोफ सोडली तर गड म्हणण्यासारखे खूप काही राहिले नाही. पण हा अतिशय सुंदर प्रवास आहे, वाटेवर निसर्गाची विविध रुपे दाखवणारा.

पठारावरून खाली पाहताना कळते आपण किती वर आलो आहोत. पांढरपाठी गिधाडेही (white backed vultures), जी आधी आमच्या डोक्यावरून जात होती ती पण खालून गेली, की आम्ही त्यांना वरुन पाहू शकलो. त्यांच्या पंखांचा भव्य विस्तार आणि मधला पांढरा रंग खपच स्पष्टपणे निरखता आला.
आता मात्र त्या हिरव्यागार गवतावर लवंडायला भरपूर वेळ होता. बराच वेळ आम्ही सर्वजण निसर्ग नुसता न्याहाळत होतो. चार तास चढल्याचे श्रम सार्थकी लागले होते आणि सर्वांना भुकाही लागल्या होत्या. बरोबर नेलेले डबे, खाऊ काढून आम्ही एकत्र खायला बसलो. एकीने लगेच कांदा कापून तिथल्या तिथे पीठ, कांदा व पाणी घालून डांगर बनवला ज्याची चव आजही जिभेवर आहे. आपले नेहमीचेच पदार्थ पण त्या वातावरणात आणि सर्वांच्या जोडीने गोडी अवीट झाली होती. जेवण आवरता आवरता पावसाची एक जोरदार सर आली आणि वस्तू सांभाळायची आमची धांदल उडाली. अर्थात हा दहा मिनिटांसाठीचा दणका होता पण मस्त भिजायला मिळाले.

बघता बघता दुपारचा एक कसा वाजला ते कळलेही नाही. आता मात्र निघायच्या तयारीला लागले पाहीजे असा सूज्ञ विचार करुन गडाचा निरोप घेतला.

परतताना ओढ्यात डुंबायची खूप इच्छा होती पण तेवढा वेळ देणं शक्य नव्हतं. आमच्याबरोबरच्या छोट्या मुलींना मात्र अगदी थोडा वेळ डुंबायला दिले. उतरताना परत देवळाकडे आमच्या सवंगड्यांचा निरोप घेतला धबधबाही नजरेत साठवून परतीच्या वाटेला लागलो.

हा पूर्ण ट्रेक लांबीला तसा जास्त आहे पण तरीही आम्हाला खूप दमायला झाले नाही याचे कारण वातावरण आणि निसर्ग असावे.

हा दिवस सर्वांनाच खूप काही देऊन गेला. निदान पुढचा आठवडा काम करण्यासाठी ऊर्जा म्हणजे पुढच्या weekend ला अजुन एखाद्या नव्या ठिकाणी भटकंती करायाला मोकळे.