RSS

Sunday, October 17, 2010

लोहगडावर एक रात्र आणि दिवस

जसजशी निसर्गभ्रमंतीची आवड निर्माण होते तसतसं हळुहळु नेहमीची नॅशनल पार्क आणि अशा जवळपासच्या जागा सोडून थोडं वेगळ्या जागीही जावंसं वाटायला लागतं. त्यात जर वेळीच योग्य सोबती मिळाले तर मग सह्याद्री हा आपला जवळचा मित्र बनुन किती ओढ लावतो हे ज्यांनी ती तशी भटकंती केलीय किंवा करतात त्यांना सांगायलाच नको.


अशाच एका चर्चेत संगिताने तिच्या माहितीतलं कुणीतरी लोहगडावर जाणार आहे त्यांच्या बरोबर जाऊया का अशी कल्पना पुढे आणली आणि जवळजवळ सगळेच तयार झाले.२००० च्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये साधारण खूप पाऊस नाही पण गरमीही नाही अशावेळी आम्ही जायचं ठरवलं. सारेच मुंबईहून जाणार असल्याने एका शनिवारी दुपारी सिंहगडने लोणावळा आणि मग लोकलने मळवली गाठावं. संध्याकाळी चढून, रात्री गडावरच्या गुंफ़ेमध्ये राहावं, रविवारी गड हिंडून मग दुपारी जरी परतीचा प्रवास सुरु केला तरी रविवार रात्रीपर्यंत सारी घरी पोहोचतील अशी साधारण आखणी होती.

आम्ही जवळजवळ सगळीच जणं व्हीटीला भेटलो. माझा क्लायन्टही तेव्हा फ़ोर्टला होता त्यामुळे मलातर जास्तच सोयीचं होतं. शनिवारची दुपार कधी येते असं झालं होतं. एकत्रच भेटल्यामुळे गाडीत एकत्र बसायला मिळालं..लोणावळा-पुण्याला ट्रेनने जायला मला फ़ार आवडतं..कर्जतचा वडा खायचा, पावसाळ्यातले हिरवे डोंगर, धबधबे पाहायचे...ट्रेकच्या आधीच मन प्रसन्न होतं. मला आठवतं हे वडे खाल्यावर सगळ्यांनी आपापला कचरा गाडीबाहेर फ़ेकु नये म्हणून आमच्या ग्रुपमधल्या सत्यमने एक उत्स्फ़ुर्त रोड (की ट्रेन) शो केला होता. जमुरे टाइप संवाद म्हणून आणि आम्ही पण त्याला साथ केली होती. आमच्या सहप्रवाशांना त्यामुळे आम्ही पावसाळ्यात दंगामस्ती करणार्‍या भटक्यांपेक्षा काही वेगळे आहोत असंही वाटलं असावं. पण एक खरं तो प्रवास खूप छान झाला होता. त्या आठवड्याच्या कामाचा शीण हळूहळू विसरायला होत होता.

मळवलीपासुन आधी जो गावातून रस्ता जातो आणि मग डावीकडे भाज्याची लेणी दिसतात तिथपर्यंत सगळं छान सुरु होतं. नंतर मध्ये मध्ये थोडा चढ येतो..(मला वाटतं आता तिथंही रस्ता झाला आहे. पण मी स्वतः नंतर तिथं गेले नाही त्यामुळे नीट माहित नाही) तर त्या चढावाच्या इथे का माहित नाही मला धाप लागायला लागली. पहिल्यांदीच रात्री राहायचा प्लान असल्यामुळे पाठीवर राहायचं, खायचं सामान, पाण्याच्या बाटल्या हे नाही म्हटलं तरी वजनच; शिवाय कामाचा दिवस, त्यामुळे शरीर संध्याकाळी थोडं थकलेलंही होतं. मग माझं काही सामान राकेश,जयेश यांनी काढुन घेतलं आणि माझीही गाडी हलु लागली. खरं हा सगळा आणि यानंतर काही ट्रेक केले त्यातुलनेने लोहगड खूप सोपा आहे आणि नंतर तर सरळ पायर्‍याच आहेत पण त्यावेळचा माझा तो दुसरा किंवा तिसरा ट्रेक होता त्यामुळे सवय नव्हती म्हणूनही असं झालं असावं..

पुन्हा गाव लागुन पायर्‍या लागेस्तो अंधार पडायला लागला होता आणि आमच्या गाईडच्या मते आता लवकर माथा गाठायला हवा. पायर्‍यांचा रस्ता संपेस्तो जवळजवळ अंधारच झाला होता त्यामुळे आम्ही आमच्या पथार्‍या पसरायला पहिले जागा शोधायला सुरुवात केली. तिथे आमच्या आधी आणखी एक ग्रुपही वस्तीला होता आणि मला वाटतं आमच्या ग्रुपमध्ये मी आणि संगिता दोघीच मुली होतो त्यामुळे मग आमच्या रक्षणकर्त्या ग्रुपमित्रांनी आम्हाला सोयीस्कर पडेल अशा जागेची सोय केली...एकदा तिथे सेट झाल्यावर मग बरोबरीच्या खाऊची अंगतपंगत झाली आणि एकदम आम्हाला आठवलं की सुनीलपण येईन असं म्हणाला होता. आम्ही असं म्हणतोय तोच स्वारी चक्क ऑफ़िसचे कपडे आणि लेदरचे बुट अशा अवतारात हजर..मला वाटतं तो कुठल्यातरी इंटरव्ह्युवरुन सरळ इथेच येत होता. कसा काय अंधारात पोहोचला माहित नाही पण ही वल्ली नॅशनल पार्काच्या बाजुला राहुनही खूपदा स्लिपरमध्ये आमच्या बरोबर कान्हेरीला आलीय..कारण घरी नाक्यावर जातो असं काहीतरी सांगितलेलं असायचं मग दुसरं काय करणार?? असो..तर त्या रात्री झोप कमी आणि गप्पा जास्त असं सुरु होतं.

सकाळचे नक्की किती वाजले होते माहित नाही पण गडाखालुन एक सुंदर शीळ येत ऐकु येत होती. अरे Malabar Whistling Thrush अर्चित लगेच म्हणाला..त्या आवाजाचा मागोवा घेण्यासाठी सगळेच एक एक करुन उठले पण त्या दिवशी एकंदरित पक्षीदर्शन नशीबात नव्हतं. खरं तर त्या पूर्ण ट्रेकमध्ये नंतर दिसलेली पांढरपाठी गिधाडं सोडली तर काहीच पाहिल नाही पण जे काही निसर्गदर्शन झालं त्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील.

त्या थ्रशच्या निमित्ताने उठल्यामुळे प्रथमच गड पाहिला कारण आलो तेव्हा रात्रच होती.सगळा हिरवा आसमंत धुक्याने भरुन गेला होता आणि शुद्ध हवेचा एक वेगळा वास आणि प्रसन्नता जाणवत होती. मला आठवतं मी आणि संगिता त्या धुकंमिश्रीत हिरवाईला पहिल्यांदी पाहताना वेड्यासारख्या इकडे-तिकडे भटकत होतो. सूर्यदेव आले की ते विरणार हे चांगलं ठाऊक होतं ना?

थोड्या वेळाने आम्ही कुणाच्याही सुचनांशिवाय पटापट सकाळची आवराआवरी केली. आमच्याबरोबर संगिताचे एक मित्र (मी त्यांचं नाव पूर्ण विसरले आहे) आम्हाला गाईड म्हणून आले होते ते एकदम पट्टीचे भटके होते त्यामुळे त्यांनी चहाची सोय केली आणि आम्ही बरोबर आणलेल्या सुक्या खाऊचा नाश्ता करुन लगेचच बॅगा बांधुन भटकंतीला तयार झालो.


हे माझे सुरुवातीचे ट्रेकचे दिवस म्हणजे कॅमेरा नाही आणि नोंदी ठेवायचा आळस असे असल्याने आता जितकं आठवतं तितक्यावरच विश्वास. पण त्यांनी आम्हाला सगळा गड फ़िरवला, माहिती दिली आणि सर्वात शेवटी आम्हाला विंचुकाटा हा साधारण गडाच्या सोंडेसारखा भाग आहे तिथे ते घेऊन गेले होते. इथे जाण्यासाठी गड आणि विंचुकाटा यामध्ये एक थोडा कठीण उतरायचा पल्ला आहे. तो मी तरी या गाईडच्या मदतीनेच उतरू शकले होते. पण आमच्या ग्रुपमधल्या जयेशला का माहित नाही अजिबात ते जमलं नाही..आणि मग तो तिथंच आमची वाट पाहात बसुन राहिला होता. परत जाताना ट्रेनमधुन हा विंचुकाटा दिसतो आणि आम्ही जिथे जयेश बसला होता त्या जागेला "जयेश पॉइन्ट" असं नाव देऊन त्याची बरेच महिने टरही उडवली होती.असो, पण या ठिकाणी वारा पीत थांबलो होतो तेव्हा तीन-चार पांढरपाठी गिधाडं जवळजवळ आमच्या डोक्यावरुन घिरट्या घालत गेल्याचं आठवतंय.

आधी आम्ही पोटपुजा विंचुकाट्यावर करणार होतो पण मग आमचाच एक मित्र तिथे एकटा होता त्यामुळे जास्त वेळ काट्यावर काढलाही नाही पण तिथुन वारा भन्नाट लागत होता आणि आजुबाजुचा हिरवा परिसर, शेती इतकं छान वाटत होतं ना?? शिवाय आम्हाला मुंबईला जायचं असल्यामुळे परतीचा प्रवास सुरु करणं भाग होतं. परत येताना आमच्या गाइडने मग आम्हाला गडाचे दरवाजे इ.ची सुद्धा माहिती दिली. एकंदरित मजा आली..पावसाळ्यात कर्जतच्या पुढं कुठंही गेलं तरी निसर्ग वेड लावतो. त्यात असा एखादा गड चढला की वरुन दिसणारं नयनरम्य दृष्य ती जादू मनःपटलावर कोरून ठेवते.

कॅमेरा तेव्हा नव्हताच त्यामुळे फ़ोटो नाहीत, ज्या व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे तिथे गेलो ती संगिताही नाही, पण आठवणी आहेत. मागे एकदा कुणीतरी लोहगडचे फ़ोटो मेलमध्ये पाठवले होते त्या अनामिकाचे आभार मानुन तेच इथे चिकटवतेय. आणि आठवणीतल्या या अशा जागी पुन्हा केव्हातरी नक्की जाईन असं मनातल्या मनात म्हणतेय...