तिसरा आणि शेवटचा दिवस म्हणजे पळापळ...एक तर ट्रिप संपतेय याची थोडी हुरहुर...पुन्हा असं कधी जाता येईल का अशा संमिश्र भावना आणि असंच काही काही...नंतर खरं सांगायचं तर अशा प्रकारे बाहेर गेलो नाहीच असं नाही पण प्रत्येक वेळी "आपलं मालवण" म्हटलं की प्रत्येकजण आठवणींच्या राज्यात जातो आणि ही सगळ्यात मस्त ट्रीप होती हे मान्य करावंच लागतं....
परत जाताना माझ्यासारख्या भूगोल कच्चा असणार्यांसाठी आणखी एक गम्मत होती ती म्हणजे येताना आम्ही आलो होतो त्याच रस्त्याने परत जाणार नव्हतो. तर परतीचा मार्ग व्हाया दाजीपूरचं राधानगरी अभयारण्य होता...म्या पामरासाठी गाडी तो एक मोठा गेट का जे काय होतं ते ओलांडल्यानंतर एकदम कोकणची लाल माती संपते आणि घाटावरचा भाग सुरु होतो हे म्हणजे अजी म्या ब्रम्ह पाहिले असं काही होतं..म्हणजे कोकणात आणि कोल्हापुरमध्ये शेपरेट ट्रिपा झाल्या होत्या पण हे असं कोकण संपलं आणि मग घाट हा प्रकार म्हणजे मनात एकदम बसला आणि मला वाटत तेवढ्यासाठी जयेशला मी तरी स्तुती (खरी) करुन खूप चढवलं..त्याने तो जरा जास्तच चढला हे वेगळं....पण मजा आली....
तर राधानगरी हे कोल्हापुरातलं बायसन म्हणजे गौर(किंवा मला वाटतं गवा) या प्राण्यासाठीचं राखीव अभयारण्य. खरं तर महाराष्ट्रातलं पहिलंवहिलं अभयारण्य ही पण ओळख आहे पण तरी बायसनसाठी हे जास्त प्रसिद्ध आहे. याला ओळखायची खूण म्हणजे त्याच्या नाकासमोर असणारा पांढरा ठिपका. आम्ही तसे दुपारचे पोहोचत होतो त्यामुळे पक्षी दिसण्याची शक्यता तशी कमी होती आणि आम्ही तिथल्या एका मचाणापर्यंत गाडीनेच जात होतो, एखादा छोटा ट्रेल करण्याइतका वेळ नसणार होता त्यामुळे बसमधुनच जंगलदर्शन करण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यात तशी मजा नव्हती. पण कधीतरी फ़क्त राधानगरीला यायला हवं हे मात्र तेव्हापासून मनात आहे (आणि अर्थातच नंतर कधीही झालं नाही हे वेगळं सांगायला नको).
मध्ये मध्ये काही दिसेल असं वाटलं तेव्हा गाडी थांबवली होती पण पक्षी पाहायचे तर खूप सहनशक्ती आणि वेळ पाहिजे..एकतर मार्चमधली टळटळीत दुपार म्हणजे सगळे कुठे नं कुठे आसर्याला थांबलेले असणार. त्यातल्या त्यात आम्हाला एक ग्रे जंगल फ़ाउल फ़क्त पळत जाताना दिसली होती तेवढी लिस्टमध्ये आहे म्हणून आठवतंय..
पक्षी दिसले नाहीत तरी तसा फ़रक पडणार नव्हता म्हणा कारण मालवणने तो कोटा पूर्ण केला होता.पण बायसनसाठी मात्र आमच्या ग्रुपमधला रेडा (तोच तो वर उल्लेख केलेला जास्त चढलेला...:)) ओव्हरएक्साइटेड होता त्यामुळे मचाणावर गेल्यावर त्याने बायसनसाठी आपली दुर्बीण रोखली..आणि अर्थात तो नसता तरी त्याला दिसलाच असता. पण बर्याच लांब जंगलाच्या दुसर्या भागात काळं काहीतरी बसलेलं त्याला दिसलं एकदाचं आणि अर्थातच नाकावरचा तो पांढरा ठिपका.मग आम्ही पण हो हो म्हणून बराच वेळ त्याला पाहिलं...मला खरं सांगायचं तर दगड आणि त्यात एक काळा ठिपका यात काय फ़रक आहे रे असं एकदा विचारावंस वाटलं पण अंतर पाहता त्याच्या हालचाली कळणं कठीण होतं..त्यामुळे उगा त्या वादात मी काही पडले नाही..
मध्ये एक सुतार पक्षीही ठोकाठोकीमुळे दिसला आणि काही चितळंही नशीबात होती.. एका पाणवठ्याच्या जागी चेकड किलबॅक अशा आणखी काही स्पॉटिंगही झाल्या आणि एकंदरित राधानगरीत परत आलं पाहिजे या बोलीवर आम्ही डेरा हलवला. आता मात्र मध्ये फ़क्त खाऊ थांबे घेऊन म्हमई एवढंच होतं...
परतीची हुरहुर एकदा नव्याने आली...जाताना मस्ती होती पण परत येताना जे पाहिलं त्याची उजळणी...पहिल्यांदीच एकत्र राहिलो त्या आठवणी, मूळ ग्रुपमधली जी मंडळी येऊ शकली नाही त्यांना कसं खिजवता येईल आणि हेच सगळं सुरु होतं...त्यानंतरही एकत्र बाहेर गेलो म्हणजे सुपे-रेहेकुरी वगैरे पण तरी जी मजा या थोडा मोठा ग्रुप झालेल्या मालवणच्या ट्रिपमध्ये आली ती कधीच आली नाही असं आम्ही आता भेटतो तेव्हाही बोलतो. मालवण म्हणजे आमच्या ग्रुपला पडलेलं एक स्वप्न होतं आणि ते यशस्वी करायचं सगळं श्रेय जयेशला जातं. खरं तर आमच्यापेक्षा जास्त जंगल त्याने पाहिलंय आणि त्यावेळी स्वतः प्रस्थापित डॉक्टरचा डॉक्टर मुलगा या नात्याने तो यापेक्षा चांगल्या पद्धतीने सगळं काही अफ़ोर्ड करु शकत होता पण आम्हीही सर्व पाहावं आणि सगळं जणू प्रथमच करतोय, त्याची एक्साइटमेंट या सर्वांनी आम्हाला कधी असं तो आमच्यापेक्षा जास्त पैशाने किंवा अनुभवाने मोठा वाटला नाही. सगळा खर्च आम्ही समान वाटूनच केला..
आता जेव्हा मी खरं जास्त काही अफ़ोर्ड करु शकते पण प्रत्यक्षात करु शकत नाही त्यावेळी या ग्रुपबरोबर केलेल्या अशा भटकंतीच्या आठवणी आल्या की वाटतं महिन्याला तीन हजार रुपयांत जे समाधान होतं ते आता डॉलर्सनी कमवले तरी आहे का?? अर्थात भूतकाळ हा जेव्हा वर्तमान असतो तेव्हा आपण तो विचार तसा करणार नसतो आणि गेलेले दिवस कधी परत येणार नसतात..निदान तेव्हातरी अशा दोस्तांबरोबर भटकंतीचे दिवस आले हेही नसे थोडके....