मालवणला जाऊन आल्यावर आमच्या ग्रुपचं मुळातलं भटकंतीचं वेड जरा जास्तच वाढलं..किंवा दुसर्या शब्दात आता मुंबईच्या बाहेर जावं असं जरा जास्तीच वाटायला लागलं..तर मालवण नंतर लगेच म्हणजे साधारण तीन-चार महिन्यातच आम्ही पुण्यातल्या सुपे आणि रेहकुरीला जायचा प्लान आखला.
सुप्याची साधारण माहिती एक-दोघांना होती आणि रेहकुरीला मयुरेश्वर अभयारण्यात राहायची सोय आहे त्याची माहिती आणि बुकिंग करुन मालवणला केली होती तीच बस करुन जायचं ठरलं. फ़क्त यावेळी मागच्यासारखी खोगीरभरती केली नाही. कारण एक म्हणजे अशी अनोळखी माणसं जास्त आली की एकमेकांबद्दलचा कंफ़र्ट अजुन निर्माण न झाल्याने थोडी मजा कमी होते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जंगल भटकंतीला जायचं तर तोंड गप्प ठेवणारी माणसं हवीत; त्यामुळे मग माहितीतलीच थोडी असली तरी चालेल; शिवाय मालवण इतकं अंतर नव्हतं आणि एकच रात्रीचा प्रश्न होता मग खर्चही वाटून घेतला तरी परवडण्यासारखा होता.
एका सुट्टीच्या शनिवारी सकाळी लवकर निघुन पुण्याहुन पहिले सुप्याला थांबायचं आणि मग पुढे रेहकुरीला राहायचं. सकाळी पहाटे तिथे पक्षीनिरिक्षण करुन मग दुपारी परतीला लागलं तरी चालेल असा छोटेखानी बेत होता.
मी स्वतः या दोन्ही जागी कधीच गेले नव्हते त्यामुळे पहिलटकरणीसारखं जे होईल ते पाहायचं, जमेल तसं निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवायचं,खूप पक्षी पाहायचे,शिकायचं हेच डोक्यात होतं..आणि खरंच त्यासाठी सुर्वणसंधी होती..मला वाटतं ऑगस्टमध्ये आम्ही गेलो होतो त्यामुळे तसा पावसाचा थोडाफ़ार इफ़ेक्ट होताच.
सुप्याला जवळजवळ धावता दौरा होता.पण एकदा त्या अभयारण्याच्या जागेत शिरलो आणि आयुष्यातले पहिलेच चिंकारा उर्फ़ गझेल टणटण उड्या मारत जाताना पाहुन सगळ्यांचाच उत्साह एकदम वाढला. याआधी गझेल म्हटलं म्हणजे मला फ़क्त डिस्कव्हरी चॅनेलवरचं टिपिकल वाघ किंवा इतर प्राण्यांनी शिकार करताना दाखवलेला सीनच आठवे. आज ते प्रत्यक्ष समोर पाहुन मात्र भान हरपलं. हा प्राणी इतका सुंदर, नाजुक आणि चपळ आहे की पूर्ण कळप दौडत असताना नजर हटत नाही. सुप्याला एका मचाणापाशी आम्ही थोडावेळ थांबलो. तिथे आणखी काय पाहिलं ते मला आता अजीबात आठवत नाही इतकं सारं चिंकारामय झालं होतं.
जास्त न थांबण्याचं कारण मयुरेश्वर अभयारण्याला वेळेवर पोहोचुन रात्र पडायच्या आधी तिथल्या जंगलात पण एक चक्कर मारायची होती. शिवाय तिथल्या फ़ॉरेस्ट डिपार्टमेंटचा माणूस फ़ार संध्याकाळ झाली आणि कुठे गेला तर आमची राहायची पंचाईत झाली असती. रेहकुरीचं हे अभयारण्य खास प्रसिद्ध आहे ते म्हणजे काळवीटांसाठी. सुपे आणि रेहकुरी याठिकाणच्या अभयारण्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे घनगर्द झाडी नाही. सगळ्या खुरट्या काटेरी बाभळीसारख्या झाडी त्यामुळे हे जंगल आहे हे खास सांगावं लागतं. अशा ठिकाणी राहणार्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना तिथेच कॅमोफ़्लाज होता येणं हे एकंच संरक्षण निसर्गाने त्यांना दिलंय. पण अर्थात मानव नावाच्या अति हुशार प्राण्यांपासुन बचाव करायला हे अर्थातच अपुरं पडतं आणि निव्वळ अभयारण्य केली म्हणून हे प्राणी-पक्षी वाचतात असंही नाही. असो..
तर रेहकुरीला आम्ही गेलो तेव्हा तरी काळवीटं भरपूर होती. आम्ही मुख्य गेटवर पोहोचायच्या आधीच एका शेतात काळवीटांचा एक कळप चरताना आम्हाला दिसला. फ़क्त उशीर होईल म्हणून थांबायला मात्र आम्हाला वेळ नव्हता. ही अशी शेताची नुकसानी झाल्यामुळे मारण्यात आलेल्या काळवीटांची संख्याही लक्षणीय़ आहे असं आम्हाला फ़ॉरेस्ट ऑफ़िसरशी बोलताना कळलं.
मुख्य गेटपाशी अभयारण्याचा बोर्ड आहे आणि एक दोन खोल्यांसारखं फ़ॉरेस्ट गेस्ट हाउस होतं असं मला वाटतं. आम्ही त्या फ़ॉरेस्ट ऑफ़िसरकाकांना रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता याबद्द्ल आधीच सांगुन ठेवलं. पुन्हा गावात जाउन काहीतरी शोधण्यासारखं एक्सायटिंग वाटत नव्हतं आणि हाताशी असलेला वेळ जंगलासाठी ठेवावा असं जास्त वाटत होतं. अजून सूर्यास्त झाला नव्हता त्यामुळे आतमध्ये एक चक्कर मारायची आम्हाला परवानगी होती. मग जास्त वेळ न दवडता आम्ही आपापल्या दुर्बिणी घेऊन आत जाणार्या पायवाटेने चालायला सुरुवात केली.
आज प्राणी दिसायचं आमचं नशीब इतकं जोरावर होतं की आम्हाला जास्त आत जावंही लागलं नाही. काटेरी झाडांच्या मागेच काळवीटांचा एक कळप शांतपणे चरत होता. त्यात चांगली शिंगं असणारे नरही होते आणि काही छोटी पिल्लंही होती. आम्हाला त्यांना नीट न्याहाळता यावे म्हणून लपत छपत आम्ही दुसरीकडे असलेल्या एका मचाणावर चढलो. आता जवळजवळ आमच्या सभोवार काळवीट आणि फ़क्त काळवीटच होते. मोजले तर साधारण नव्वदेक तरी भरले. दुर्बिणीतून न्याहाळताना त्यांची तुकतुकीत कांती आणि पोटावरचा तो काळसर पट्टा आणि अर्थातच नराची शिंगं अगदी नजरेत भरली. सूर्य जवळजवळ अस्ताला जात होता आणि त्या पार्श्वभूमीवर हा देखणा प्राणी ही संध्याकाळ कायमसाठी आठवणीत ठेऊन गेला......मला वाटतं मालवणला तारकर्लीला समुद्राच्या साक्षीने पाहिलेला सूर्यास्त जितका देखणा होता तितकाच अविस्मरणीय हाही होता. खरंच निसर्गाच्या जेवढ्या जवळ आपण जाऊ तितकंच तो आपल्या विविध रुपांनी आपलं विश्व भारुन टाकतो.
त्यानंतर आम्ही रात्रीही जेवणं झाल्यावर पुन्हा आमच्या त्या बसने गावचा एक छोटा दौरा केला. कुणीतरी गावात कोल्हे-बिल्हे येतात अशी माहिती काढली होती. आम्हाला काही दिसलं नाही पण दुसर्या दिवशी सकाळी या भागातले थोडे पक्षीही पाहायचे होते आणि काळवीटांनी पुन्हा दर्शन द्यावं ही अपेक्षा अर्थातच होतीच त्यामुळे सरळ येऊन झोपलो.
अभयारण्याच्या तोंडावरच जी झाडं आहेत तिथेच खूप छान छान पक्षी दिसले..मला काळवीट पाहायचीच होती म्हणून पुन्हा एकदा आतमध्ये जायचं ठरवलं आणि थोडं जास्त मध्ये गेल्यावर पुन्हा एक छोटा कळपही दिसला. फ़क्त आम्हाला सर्वांना परत मुंबईला जायचं होतं म्हणून लवकर आवरतं घेतलं कारण कुणाच्यातरी डोक्यामध्ये सिंहगड पण करुन जाऊया अशी टुम निघाली. अर्थात नाही म्हणणं शक्य नव्हतं पण सिंहगडावर चढणं वगैरे होंणार नव्हतं. थोडं पिकनिकसारखं होणार होतं.
तरी येताना दुपारी भिगवण म्हणून एक गाव आहे तिथल्या तलावावरुन जाताना सुनिलला आयबिस दिसला आणि त्याने इथे थांबायलाच हवं म्हणून आग्रह धरला. त्याचं म्हणणं ऐकलं ते बरंच झालं. तिथे पाणपक्ष्यांची रेलचेलच होती. आम्हाला चोचीवर पांढरा ठिपका असणारे कूट,काळ्या डोक्याचे आयबिस, पेंटेड स्टॉर्क्स आणि बरेच पक्षी दिसले. मला वाटतं लोकल मायग्रेटरी बर्डसाठी हे ठिकाण चांगलं असावं.
हे सर्व कमी होतं म्हणून सिंहगडावरची पिकनिकही केली. त्याचं मुख्य कारण परतीच्या वाटेवर एका ठिकाणी खाल्लेली भाजलेली कणसं सोडली तर पोटात काही नव्हतं हेही असावं असं मला आता वाटतं. सिंहगडावरचं धुकं मला फ़ार आवडलं पण जास्त वेळ नव्हता.शिवाय थोडं पावसासारखं होतं त्यामुळे खालेल्या कांदा भजी आणि झुणका भाकरी मटका दही यांना विसरता येत नाही.बरं झालं थोडा वेळासाठी तरी गेलो कारण त्यानंतर कधीच सिंहगडावर जायचा योग आला नाही.
भरगच्च भटकंतीचे हे पाहायला गेलं तर दोनच दिवस. या दौर्यात भटकंतीत करता येणासारख्या बर्याच जागा केल्या पण जास्त लक्षात राहिले तर टणाटण उड्या मारणारे चिंकारा आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाहिलेले काळवीट....
सगळे फ़ोटो सौजन्य डॉ. संगिता धानुका