RSS

Monday, May 9, 2011

आठवणीतलं कर्नाळा

पक्षीनिरिक्षणाचा छंद लागला आणि मग वेध लागला तो एखाद्या खरखुरं पक्षी अभयारण्यात जायचा. अर्थात त्यावेळी नुकतंच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण होत होतं. ग्रुपमधले सगळेच साधारण माझ्यासारखेच मध्यमवर्गीय.त्यामुळे मग आपल्या मध्यमवर्गीय बजेटमध्ये बसणारं, मुंबईच्या जवळ असलेलं कर्नाळा हेच ठिकाण आमच्यासारख्यांसाठी योग्य होतं.कर्नाळ्याला मी निदान साताठवेळा तरी गेलेय. माझ्यासाठी कर्नाळा म्हणजे एखाद्या दिग्गज गायकाच्या मैफ़िलीसारखं..सुरुवातीला विलंबित खयालासारखं, सगळ्यांनाच कळेल असं नाही आणि "निघुया अपने बस की बात नही” म्हणावं तर एखादा सूर ह्र्दयाचा ठाव घेणारा, आपल्याला त्या मैफ़िलीचा भंग करुन निघु देणार नाही. मैफ़िलीत सुरु केलेला राग पूर्ण ऐकायचा संयम दाखवून मग स्वतः थोडा अभ्यास करुन रागदारी ऐकायची सवय लावली तर मात्र भैरवी आली की चुटपुट लावणारा...काही वेळा ठुमरी आणि तराण्यामधुन आपल्याला डोलायला लावणारा कर्नाळा.

कितीतरी आठवणी आहेत...अगदी सुरुवातीला फ़क्त चढायची सवय नाही म्हणून दमवणारा, मग अंगठ्याखाली चढलं की वरती सुटणारा भन्नाट वारा आणि आपली पांढरी पाठ दाखवत मस्त तरंगणार्‍या गिधाडांना पाहताना, एकदा माझ्या वाढदिवसाचा केक सॅकमध्ये लपवून वरपर्यंत नेऊन सगळ्यांना सरप्राइज देतानाचा आनंद घेणारा तर एकदा उतरताना नेमकं ग्रुपमधली एक मुलगी पायर्‍यांवरुन घसरल्यामुळे तिला इतरांबरोबर उतरवताना आलेलं टेंशन, त्यापेक्षाही जास्त टेंशन आणखी एका मैत्रीणीच्या वाढदिवसाला फ़क्त चौघीजणींनी कर्नाळा सर करायला जाताना त्रास देणारा मुलांचा एक ग्रुप भेटल्यामुळे आलेला प्रसंग निभावताना. आता हे सगळंच सोडून इतकी वर्षे झालीत हे सर्व एकत्र आठवतेय तेव्हा लक्षात येतंय आणि पुन्हा एकदा कर्नाळ्याला जावसं वाटतंय़.
सर्वात पहिल्यांदी कर्नाळ्याला गेलो होतो तेव्हा जाताना दादरहून बसने पनवेल मार्गे सक्काळ सक्काळी गेलो होतो. "जैत रे जैत" चित्रपटात माहित झालेला कर्नाळा तोवर मी फ़क्त महामार्गाने जाताना दिसणारा कर्नाळ्याचा अंगठा बसमधुन तेवढा पाहिला होता. जाताना तर वेळेवर गेलो. चढताना पायर्‍या असल्या तरी मध्ये मध्ये काही ठिकाणी त्या थोड्या जास्त उभ्या आहेत किंवा काही ठिकाणी त्यातलं अंतर जास्त आहे त्यामुळे झाली दमणूक आठवते. पण एकदा वर पोहोचलं की बेभान सुटलेला वारा पिऊन आणि खाली दिसणारं जंगल पाहिलं की सारा शीण कुठे जातो ते कळत नाही. पहिल्यावेळी मात्र माझं विलंबीत खयालासारखं झालं होतं. एवढ्या मोठ्या पायपिटीत जाताना काही म्हणजे काही दिसलं नाही. फ़क्त वर गेल्यावर पांढरपाठी गिधाडं आमच्या खालुन गेली. "हेच पक्षीअभयारण्य म्हणायचं का?" " हा हायवे गेलाय नं इथुन, त्यामुळे आवाज वाढलेत मग कसे दिसणार पक्षी???" असं सगळं कोल्ह्याला लागलेल्या आंबट द्राक्ष्यांसारखं बोलुन झालं.पण मान्सुनचा पाऊस झाल्यानंतर गेल्यामुळे वेड लावणारी दिसणारी हिरवाई आणि चढताना झांडांच्या गर्द छायेत जाणवणारा थंडावा यामुळे कर्नाळा मला तरीही खूप आवडला. मुंबईच्या जवळ हे एक गाजरही होतंच. पण परत निघताना संध्याकाळी कुठुनश्या येणार्‍या सगळ्या बस भरुन जाताना मात्र आता परत कसं जायचं याचं जाम दडपण आलं होतं.
शेवटी जवानांचं सामान नेणार्‍या एका टेम्पोवाल्याला आमची दया आली आणि काही जवान मागे आणि आम्ही दहा-बारा जण टेम्पोच्या मागच्या बाजुला काठ पकडून तो भन्नाट वारा खात एकदाचे पनवेलला पोहोचलो आणि पुन्हा दादरची बस-लोकल असं सगळं साग्रसंगीत करुन घरी येतानाच पुन्हा जाऊया रे एकदाचा गजर होताच. आणि मालवणला जाऊन आल्यानंतर ग्रुपचं स्वतःचं वाहन करुन ट्रेक जास्त आणखीबद्ध करता येतात किंवा आमच्यासारख्यांच्या बजेटमध्ये पण बसवता येतात हे कळल्याचा आत्मविश्वास असेल, त्याच बसने आम्ही तेरा-चौदा जण मिळुन यावेळी बसने पुन्हा कर्नाळ्याला निघालो. यावेळचं कर्नाळ्याची मैफ़िल रंगतदार होती.नेहमीपेक्षा लवकर पोहोचल्यामुळे पिकनिकर्स आले नव्हते. त्यामुळे चढतानाच बर्‍यापैकी पक्षीदर्शन झालं. दुपारच्यावेळी वर पोहोचुन मस्त तोच तो उनाड वारा खात बसताना सुख म्हणजे काय ते हेच असतं का असं वाटण्याचे ते दिवस आत्ता आठवलं तरी ती नशा चढते आणि खांद्यावर सॅक टाकुन भटकंतीला बाहेर पडावंसं वाटतं.
स्वतःच्या बसने जाण्याचा फ़ायदा येता-जाता दोन्हीवेळा झाल्यामुळे झिंग लागल्यासारखे दुसर्‍या एका मान्सुनमध्ये पुन्हा त्याच बसनेच गेलो. यावेळी ग्रुपमध्ये दोन-चार मेंबरं वाढली पण होती. अर्थात बजेट मॅनेजमेंटला अशी दोन-तीन जास्तीची लोकं बरीच पडतात. यावेळी कर्नाळ्याच्या मनात काहीतरी वेगळं होतं.जाताना कदाचित गप्पांचा अतिरेक सुरु होता की काय नीट आठवत नाही पण विशेष काही दिसलं नाही. नेहमीचे होले आणि सूर्यपक्षीवगैरे दिसले. येताना मात्र मी राकेशसोबत उतरत होते त्याच्या पायगुणाने सारखं काही नं काहीतरी दिसत होतं.
Credit: Free images from acobox.com
याआधीही त्याने बरेच चांगले स्पॉटिंग केलेत तोच शिरस्ता त्यादिवशीही कायम होता. त्यादिवशी खाली येताना बरेच पक्षी दिसले पण लक्षात राहिला तो मी पहिल्यांदीच पाहिलेला हिरवागार क्लोरोप्सिस आणि ग्रीन पिजन. त्यानंतर क्लोरोप्सिस मी बर्‍याचदा पाहिला पण पहिल्यांदी राकेशने कर्नाळ्याला तो दाखवताना (अर्थात त्याला) झालेला त्रास. "अरे तेरे तीन बजे देख"..." अभी देख नं हील रहा है वो डाल के पीछे"...बापरे किती हिरवा आणि झाडात अदृष्यच असलेला सुंदर पक्षी तो...अहाहा....ग्रीन पिजन मात्र नंतर कधीच दिसला नाही. त्यावेळी पण तो उतरताना थोडा वेळच दिसला आणि मग झाडीत नाहीसा झाला. तो बाकीच्यांना पण पाहता यावा म्हणून मागे पाहातो तो काय? बडबड करत उतरणारी मीनल धपाकन पडली होती. तिला बरंच लागलं असावं कारण आमच्या ग्रुपमधल्या दोन मुलांनी दोन्ही बाजुला पकडलं होतं तरी तिचं कण्हणं सुरुच होतं. नशीबाने आमच्यातला नितीन डॉक्टर होता पण तिला पेन किलर देऊन मुंबईला गेल्यावर कुठे न्यावं खेरीज विशेष काहीच करण्यासारखं नव्हतं. नंतर कळलं की तिला लिगामेंट फ़्रॅक्चर झालं होतं आणि दोनेक महिनेतरी घरीच राहावं लागणार होतं. ग्रुपमध्ये एकाचं जरी बिनसलं की आपसूक पूर्ण ट्रेकवर त्याची छाया येते तसंच झालं आणि सगळीजणं शांतपणे उतरायला लागली. मध्ये मध्ये चढण्यापेक्षा उतरणं कसं जास्त रिस्की आहे आणि तिने असं लागु न द्यायला काय करायला हवं होतंपासुन ते तिची थोडीफ़ार खेचाखेची हेही सुरु होतंच. नशीब खालीच आम्ही भाड्याने आणलेली पंधरा सिटर होती नाहीतर आज काय खरं नव्हतं.


हे एक संकट समोर आहे तोच दुसरा एक नवाच अनुभव आमच्यासाठी पुढे होताच. आम्ही उतरताना एक टारगट मुलांचा ग्रुप पळतपळत वर गेला. नुस्ती हुल्लडगिरी सुरु होती म्हणून जाणवलं पण कुठे लक्ष द्या? पण त्यानंतर वीसेक मिनिटांतच आमच्यापाठी एक घाईघाईत उतरणारं जोडपं दिसलं. पाय मोडलेल्या मेंबरमुळे आमचा वेग कमी होता पण त्यातली बायको मुसमुसताना दिसली म्हणून जयेशने तिच्या नवर्‍याला काही मदत हवी आहे का असं सहज विचारलं आणि कळलं ते थोडं धक्कादायकच होतं. आम्हाला वर वेगात जाणारी जी मुलं दिसली होती त्यांनी आमच्या मागे उतरणार्‍या या जोडप्याला मध्ये कुठेतरी एकांतात गाठलं आणि धमकावलं. बायकोला काही होऊ नये म्हणून अंगावरचे, दागिने, घड्याळ, पाकिट असं सगळं त्या जोडप्याने त्यांना दिलं आणि आता विमनस्कपणे खाली उतरत होते. आमच्या अंगावर काटा आला. मुळात नव्या लग्न झालेल्या जोडप्याने फ़िरायला यायची ही जागा नव्हे आणि त्यातही दागिने इ. जोखीम घेऊन. पण आता गेली गोष्ट होऊन गेली होती. आमच्या बसमध्ये जागा असणार होती म्हणून आम्ही त्यांना पनवेलपर्यंत सोडायची तयारी दाखवली आणि पुढच्या प्रवासासाठी पैसे. त्यानंतर आणखीच गप्पपणे खाली उतरून बसमध्ये चढुन एका दिवसांत किती प्रसंग दिसले त्याचा विचार करत घरी परतलो. विलंबीत लयीत सुरु झालेली, दादरा आणि तराण्याच्या साथीत रंगलेली ही आणखी एक मैफ़ल.

त्यानंतरची कर्नाळा ट्रीप आठवते ती अशाच एका जूनमधली. संगीताचा वाढदिवस जूनमध्ये असायचा आणि नुकताच सुरु झालेला पावसाळा कर्नाळ्यात छान अनुभवता येईल म्हणून अल्पाच्या गाडीने चटकन होईल म्हणून अगदी आयत्यावेळी ठरवलेली आणखी एक कर्नाळा ट्रीप अशीच वेगळा अनुभव देणारी. आम्ही चार मुलीच होतो. पण बाकीच्या वयाने माझ्यापेक्षा जास्त मॅच्युअर ग्रुप म्हणून चला जाऊया म्हटलं आणि दुपारपर्यंत चढलो, वरती घरुन आणलेला खाऊ खाल्ला आणि तेव्हा कर्नाळ्याच्या पायथ्याशी एक हॉटेल होतं (आता ते बहुधा नसावं) तिथे वडापाव खाऊन परत निघुया म्हणून उतरताना माझ्या लक्षात आलं नाही पण माझ्या मॅच्युअर मैत्रीणींच्या लक्षात आलं की एक मध्यमवयीन माणसांचं टोळकं आपला पाठलाग करतंय. आम्ही ब्रेक घेतला की आसपास ब्रेक घेणं, कमेन्ट्स इ. त्यावेळी थोडं घाबरायला झालं पण नशीबाने आम्ही पायथ्याच्या साधारण जवळपास होतो आणि अल्पा तशी व्यवसायासाठी अनेक बिल्डर वगैरेंशी सामना करते त्यामुळे बरीच बोल्ड आहे. तिने त्यावेळी खूप संयमाने हाताळलं. सुरुवातीला मला आणि इतरांना काही सुचना देताना त्या टारगट ग्रुपला कळलंही नाही आणि मग पायथ्याची गर्दी दिसायला लागली तशी त्यांना बरोबर झापुन पटापट उतरून आम्ही त्या हॉटेलात चहा आणि वडा-पाव खाताना आपणही असं एकटं यायला नको होतं या चर्चा करत राहिलो. वरच्या दोन प्रसंगामध्ये कर्नाळ्याला काही सांगायचं होतं का असं त्रयस्थपणे या घटनांकडे पाहिलं की मला उगीच वाटतं. कदाचित आता कर्नाळा जास्त करुन पिकनिकर्सचं होतंय हाच तो संदेश असावा.
हे दोन थोडे कडवट प्रसंग जरी असले तरी याच्या मध्येच मी एका एप्रिलमध्ये कर्नाळ्याला गेलो तेव्हा माझ्या सॅकमध्ये मॉनजिनिसचा माझा आणि आमच्या ग्रुपचा आवडता ब्लॅक फ़ॉरेस्ट घेऊन गेले होते तो ट्रेकही मला आठवायला आवडतो. यावेळी पण आम्ही त्या पंधरा सिटरनेच गेलो होतो. खरं तर आम्ही दहाएक जणंच असू पण स्वतःच वाहन असणं कर्नाळ्यासाठी तरी सोयिस्कर पडतं हे आता अनुभवाने लक्षात आलं होतं. माझ्या आधीच्या वाढदिवसाला हीच सॅक माझ्या याच ग्रुपमधल्या मित्र-मैत्रीणींनी मला दिली होती. खरं तर कर्नाळ्यासाठी ती मोठी होती. पण दुर्बिण, पाणी, सालिम अलींचं पुस्तक घेऊन फ़िरायचं तर ती सॅक बरी पडे म्हणून मी ती आणली असावी असं सर्वांना वाटलं होतं आणि वर पोहोचल्यावर आम्ही खायचा ब्रेक घेतला तेव्हा त्यातुन केक काढुन सगळ्यांच्या चेहर्‍यावरचं आश्चर्य आणि आनंद पाहण्यापुढे ते ओझं घेऊन चढणं काहीच नव्हतं. खरंच माझ्या भटकंती कारकिर्दीतले ते मंतरलेले दिवस होते.

त्यानंतर नेहमी माझ्या तोंडून कर्नाळा कर्नाळा ऐकुन माझ्या एका जास्त ट्रेक न करणार्‍या ग्रुपबरोबर बाइकने कर्नाळ्याला जायचा योगही आला. त्यातही मला कुणाची तरी बाइक पनवेलनंतर चालवायलाही मिळाली होती. त्यामुळे आपण कधीतरी बाइकने एखादा मोठा ट्रेक करु इ.इ. स्वप्न रंगवायला मीही सुरुवात केली होती..पण मुलींच्या आयुष्यात काही स्वप्न फ़क्त स्वप्नंच राहतात तसंच माझं हे एक स्वप्न अद्यापतरी सत्यात आलं नाही.आलंच तर त्याची सुरुवात मी कर्नाळ्यापासुन केली असं सांगायला मला नक्कीच आवडेल.
तुर्तास तरी सुरुवातीला म्हटलं तसं कर्नाळ्याच्या आठवणींची ही सुरेल मैफ़ल कधीच संपु नये, कर्नाळ्याने कधी बदलु नये आणि आपण त्याला कधी विसरु नये असं मला तेव्हा वाटायचं. फ़क्त तो योग आता पुन्हा कधी येतो त्याची वाट पाहात त्या आठवणी जागवायच्या आणि त्या सुरेल क्षणांची आपण काही काळ का होईना साक्षिदार होतो याबद्दल त्या विधिलिखिताचे आभार मानायचे इतकंच मी करु शकते.....


फ़ोटो...साभार डॉ. संगिता धानुका आणि मायाजाल

10 comments:

Abhishek said...

लेख मस्त! ओघवत लिखाण! (तस मला काही कळत नाही, पण वाचताना कंटाळा तत्सम काहीच नाही आलं)
फोटो आवडलेच .. काढणाऱ्याच कौतुक...

Unknown said...

मस्तच!!

अपर्णा said...

आभार अभिषेक आणि ब्लॉगवर स्वागत...

अपर्णा said...

राजे या ब्लॉगवर पण आलात तर...स्वागत आणि आभार...

Deepak Parulekar said...

खतरनाक अनुभव आहेत! जबरी एकदम!
आयला मी बाजुला असुनही मला अजुन एकदाही जायला नाही जमले कर्नाळ्याला!
नेक्स्ट टाईम तू भारतात आलिस ना की नक्की जाउया! आणि हो तुझा बर्थडे धरुनच ये म्हणजे पुन्हा साजरा करु कर्नाळ्याला काय बोलतावं?!
बघू या ट्रेक सिजनमध्ये एकदा फेरी मारुन येतो !

अपर्णा said...

दिप्या, तू एकदा पण कर्नाळ्याला गेला नाहीस?? पिकतं तिथ विकत नाही हेच खरं....पुढच्यावेळी मलाच तुला न्यावे लागेल....:)

vaibhav_sadakal said...

mast lekh avadala ..............

अपर्णा said...

आभारी वैभव आणि ब्लॉगवर स्वागत...

AJ said...

वा! मस्त लिहिलंय. मी सुद्धा कर्नाळ्याला जाउन आलोय. पक्षी ’निरीक्षण’ असा मी शब्द वापरत नाही पण पक्षी बघू आणि ट्रेक पण करू असं म्हणून मी आणि माझा मित्र असे दोघेच एक दिवस सणक आल्यासरशी गेलेलो. उशीरा पोचलो त्यामुळे पक्षी दिसले नाहीत पण ट्रेक अविस्मरणीय झाला. चकवा लागला फ़िर फ़िर फ़िरलो काय विचारायला नको. पण पोचलो शेवटी वर.

असो. पोस्ट मस्त आहे. आवडली. माझ्या ब्लॉग वर Hop-in झाल्याबद्दल धन्यवाद!

AJ
http://ajstates.blogspot.com
http://houndingtheworld.blogspot.com
http://apurvaoka.blogspot.com

अपर्णा said...

AJ, ब्लॉगवर स्वागत..तुम्हाला कर्नाळ्याला वर जायला चकवा लागला म्हणजे नक्कीच लक्षात राहणार तो ट्रेक...मला वाटतं वरून जे खाली जंगल दिसतं ते खूप दाट आहे त्यामुळे तुम्ही लोकं तिथं असलात तर बाहेर आलात हेच नशीब...असे अनुभव आले की भटकंतीच व्यसन आणखी वाढतं हा स्वानुभव...:)