RSS

Friday, January 8, 2010

प्रथमा...

जंगल भटकंतीची आवड तशी माडगुळकर, चित्तमपल्ली आणि अशाच अनेक लेखकांच्या पुस्तकांप्रमाणे लागली पण प्रत्यक्ष मात्र कुठे जायचं, कसं जायचं आणि मुख्य म्हणजे कोणाबरोबर..(मुलगी असल्यामुळे हा यक्षप्रश्नच) हा मोठाच प्रश्न होता. पण सुदैवाने बहुतेक १९९७ मध्ये ठाण्यामध्ये ओवळा येथे एक पक्षिमित्र सम्मेलन भरणार होतं आणि त्याची फ़ी तशी परवडणारी होती. माझी एक मैत्रीण भारती जिला खरं पक्षीनिरीक्षणामध्ये तसा काही रस नव्हता पण मुंबईतल्या मुंबईत बदल म्हणून ती चटकन हो म्हणाली आणि त्या सम्मेलनाला तीन दिवसांसाठी सगळ्या अट्टल पक्षीमित्रामध्ये मी नवशिकीही सामिल झाले. आम्ही दोघींनी त्या सम्मेलनात जमेल तेवढी धमाल केली. मुंबईतल्या लोकांकडून त्यावेळी सारखं बी.एन.एच.एस. हे नावही ऐकलं आणि सारखं वाटलं की आपल्याला जर हे शास्त्रशुद्ध जमवायचं असेल तर हा हॉर्नबिल हाऊस शोधलंच पाहिजे..
त्यात काय मुंबई आहे घ्या पत्ता आणि शोधा असं इतकं सोपसं वाटणारं हे प्रकरण खरंखरं शोधायला मला मध्ये एक-दिड वर्षे तरी गेली.एकतर इंजिनियरिंगचं विचित्र श्येडूल (म्हणजे सुट्ट्यांच्या बाबतीत) आणि त्यात टाउन साईड म्हणजे त्याकाळात लांब कुठेतरी असंच एकटं कसं निघायचं, घरची सोडतील का असे सगळे प्रश्न तर होतेच आणि एकदा प्रयत्न केलाही होता पण चर्चगेटवरून कसं जायचं ते कुणी नीट सांगेना. त्यामुळे एकदा माझे एक आय.आय.टी. मधुन शिकलेले आणि आता स्वतःची छोटी फ़ॅक्टरी असणारे सर कम मित्र यांच्याबरोबर बी.सी.एल.ला जायचं झालं तेव्हा त्यांनी माझा प्रश्न चुटकीसरशी सोडवला.


आणि खरंतर त्यांनी हॉर्नबिल हाऊस मला दाखवलं तेव्हा त्याला एक वळसा घातल्यावर माझं मलाच हसायला आलं कारण आपलं मुंबईचं ते प्रसिद्ध प्रिन्स ऑफ़ वेल्स म्युझियम आहे ना त्यांच्या बरोबर पाठीला पाठ लावून हे धनेशाचं घर आहे..म्हणजे खरंतर म्युझियमचाच भाग यांना वापरायला दिलाय. कुणी त्या ऍड्रेसमध्ये जर म्युझियमचा उल्लेख लॅन्डमार्क म्हणून केला असता तर मला त्या सरांना उगाच त्रास नसता द्यावा लागला. तर असो..शुभस्य शीघ्रम..लगेच त्यांची वार्षिक वर्गणी भरून छान छान पक्षी पाहायला जायचं अशी स्वप्न रंगवत घरी आले. हे बी.एन.एच.एस. शोधणे आणि त्यांची मेंबरशीप घेणे यासाठी माझ्या बाबांनी मला इतका छान सपोर्ट दिला की त्यांनी जर पाठबळ दिलं नसतं तर मग एक मुलगी, लांब पडतंय, काय सारखं सारखं जंगलांत अशा आईच्या प्रश्नांना मला अजिबात सांभाळता आलं नसतं....
तर एकदाचं बी.एन.एच.एस.चं पत्रक आलं ज्यात मला जमण्यासारखा एक नेचर ट्रेल होता बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कात (त्याला आता फ़क्त एस.जी.एन.पी.च म्हणतो आमचा ग्रुप म्हणजे काही नाही वेळ वाचतो कुठे भेटायचं हे सांगायला). ती ९९ च्या मान्सुनची सुरुवात होती त्यामुळे इंजिनियरींगच्या सुट्ट्याही सुरू होत्या. घरातून कुणी आडकाठी करायचा प्रश्न नव्हता कारण दिवसा ढवळ्या जाऊन दुपारी परत असं लिहिलं होतं..

उशीर नको म्हणून वेळेच्या आधीच गेटवर पोहोचले. माझ्यासारखाच गेटवर अजुन एक मुलगाही थांबला होता. इतर काही टोळकी आपापल्या कंपु मेंबरची वाट पाहात होती. होता होता बरीच टोळकी मध्येही गेली..अजुन काही डोकी एकत्र व्हायला लागली पण हे बी.एन.एच.एस. वाले कुठं आहेत काही कळेना म्हणून मग त्या पहिल्यांदी पाहिलेल्या मुलाला (तोही माझ्यासारखाच थांबला होता म्हणून) विचारलं की बाबा तू पण बी.एन.एच.एस. च्या ट्रेलसाठी आलास का?? हो..नशीब ग्रुपलीडर नाही तर कुणी ग्रुपवाला भेटला म्हणून त्याच्याच बाजुला थांबले. अगदी मोजकं आणि शक्यतो पक्षी आणि अशाच गोष्टींबद्द्ल बोलणारा माझा पहिला वहिला मित्र ’राकेश’ हा मला अशा प्रकारे भेटला. त्यावेळी अर्थातच तो फ़ार काही बोलला नाही पण ओळख झाली.त्यानंतर थोड्या वेळाने एका मुलीने माझ्याशी ओळख करून घेतली ही आमची "आराधना".मग असेच अजून जयेश, नील, लोऑन आणि काही लोकं गोळा व्हायला लागले...आम्ही बरेच जण बी.एन.एच.एस.साठी प्रथमच येत होतो... तर राकेशने, आता याचा राक्या झालाय...इतर एक-दोन टोळक्यांना विचारून ट्रेलमधले बाकी सवंगडीही गोळा केले पण पत्यातले भिडू गोळा झाले पण हुकुमाच्या एक्क्याचा पत्ताच नव्हता. मग कुणीतरी जुन्या मेंबरने कुठे कुठे फ़ोन करून आम्हाला माझ्यासाठीची दुःखद बातमी दिली की काही कारणाने ग्रुप लीडरला येता येणार नाही म्हणून मग ट्रेल कॅंसल...श्या काय बी.एन.एच.एस. आहे?? मी आणि माझ्यासारखे बरेच नवशिके म्हणाले.." इनका आजकल ऐसे होता है" अजून एक नकोशी कॉमेन्ट...आयला कुठल्या मुहुर्तावर जॉइन केलं?? घरी जाऊन पोपट..माझा आणि बाबांचा..
पण इतर काही जणांच्या सुपीक डोक्यातून आता आलो आहोत तर स्वतःच जाऊया म्हणून कल्पना आली आणि चला चला म्हणून आम्ही एकदाचे नॅशनल पार्कमध्ये घुसलो...आधी शाळेत असताना आलेलं नॅशनल पार्क म्हणजे आठवतही नव्हतं कसं जायचं, कुठे काय पण नेहमी येणार्या मंडळींमुळे हा प्रश्नच पडला नाही. सरळ कान्हेरीच्या रस्त्याला चालायला लागायचं आणि मग जे ज्या ज्या क्षेत्रात रस घेणारे होते त्यांनी त्यांचं जंगल नॉलेज नवशिक्यांना वाटायला सुरूवात केली. कुणी झाडांची माझ्या डोक्याच्या संपुर्ण वरुन जाणारी (अजुनही ती नावं वरूनच जातात पण जाता जाता आधी ऐकल्याचं ओळखीचं हसू देऊन जातात) नावं, कुणी किटकांची लांबलचक नाव देतंय..मी बापडी स्वतः चुपचाप राहून चालत होते..अहो तोंड उघडण्यासारखं काही माहित पण असायला हवं ना??


नशीब त्यातल्या त्यात गेटजवळचा नेहमीचा (नेहमीचा आता तेव्हा अरे वा शुभ आणि यॉंव..)भारद्वाज दिसला. तसंच, पार्कातल्या छोट्या तलावात डॅब-चीक, हेरॉन, मुरहेन, खंड्या असे पक्षीगणही दिसले होते त्यामुळे माझं पक्ष्यांबद्दलचा रस वाढत होता..आमच्या पैकी आराधनाला झाडांबद्दल खूपच माहिती होती आणि राकेश आणि जयेश पक्ष्यांना पटापट ओळखत होते. आपण खूप बच्चू आहोत असं जरी वाटलं तरी ते माहित होतं आता फ़क्त योग्य संगत मिळावी आणि देर ही सही पण आपल्या आवडीला जोपासावं यासाठी हा ट्रेल आमचा आम्ही केला ते माझ्यासाठी खूपच बरं होतं.


कदाचीत जो कुणी लीडर होता त्याने नेलं असतं आणि मग हवं तसं थांबता नसतं आलं किंवा त्याने फ़क्त झाडं किंवा किटकच दाखवले असते तर?? अर्थात तसं होत नाही पण उगाच या सगळ्या तेव्हाच्या कुशंका....त्यानंतरच्या ट्रेलमध्ये कळलं की ही वरची पक्ष्यांची यादी तर नॅशनल पार्कातल्या पहिल्या दहा मिन्टांत होतेच पण खरे पक्षी नंतर आत आत गेले की दिसतात. असो. तर त्या दिवशी मग दुपारी काही जण कान्हेरीपर्यंत पुढे गेले. मी मात्र घडाळ्याच्या हिशेबाने आराधनाबरोबर परत फ़िरले. परतीच्या वाटेवर माझ्याकडे या जंगल जगात माझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेले आणि माझ्या दैनंदिन जिवनाशी अजिबात निगडीत नसलेले अनेक नवे मित्र मला मिळाले होते.


आता यापुढे आपणही असंच त्यांच्यासारखं चांगली दुर्बिण (जेव्हा जमेल तेव्हा घेऊन) मस्त पक्षी पाहात रानोमाळ हिंडणार या विचारानेच परतीचा रस्ता कधी संपला आणि पुन्हा एकदा ट्रेनच्या गर्दीत कधी शिरलो कळलंच नाही. ये पुढच्या वेळी नक्की फ़ोन करुन ठरवू हं?? आराधनाला टाटा करताना म्हणत होते..माझ्याकडे स्वतःचा फ़ोन नंबर नसल्याचं मला प्रथमच इतकं वाईट वाटत होतं....
या छोट्या ट्रेलमुळे मिळालेले माझे हे मित्र मी भारतात असेपर्यंत जंगल भ्रमंतीसाठी कायम सोबतीला होते आणि आता जाते तेव्हाही मला पुन्हा त्या जगात घेऊन जातात.आणि त्यामुळे त्यादिवशीचा बी.एन.एच.एस.चा जो कुणी टिम लीडर होता तो न आल्याबद्दल या पोस्टमध्ये त्याचे खास आभार.

4 comments:

हेरंब said...

मस्त वाटलं तुझ्या सगळ्या पक्षांची नावं वाचून. मला काही विशेष कळत नाही त्यातलं. पण माझ्या बायकोला कळतं आणि जाम आवडतं पण. तिला सांगतो हे वाचायला.
आणि हो माझ्याही पहिल्या पोस्टचं नाव "प्रथमा" च आहे. Great minds think alike huh? ;-)

अपर्णा said...

हम्म्म्म्म्म्म्म..तुमची जोडीपण आमच्यासारखी दिसते..नवर्याला यातलं काही कळत नाही...पण त्यादिवशी त्याच्या एका मित्राच्या ऑर्कुटच्या अल्बममध्ये सगळे पक्षी मला ओळखायला लावून कॉमेन्ट्समध्ये मारे नावं टाकली...देना तिला वाचायला. आणि अरे ही पोस्ट लिहायला घ्यायच्या आधीच नाव सुचलं...you are right...great minds think alike :)

रोहन... said...

इच्छा असुनही मला हवा तितका वेळ देता येत नाही पक्षीनिरीक्षणामध्ये... खुप मित्र आहेत Bird Watcher & Photographer. मुंबईला गेलो की फ्लेमिंगो बघायला शिवडीला जायला हवे... :)

अपर्णा said...

रोहन जी काही थोडीफ़ार ट्रेकर्ससोबत फ़िरले त्यात घाईघाईने माथा गाठण्याची जिद्द जास्त आढळली..त्यामुळेही पक्षी पाहायचे राहिले असतील. आम्ही खूपदा शेवटच्या ठिकाणापर्यंत जातोच असंही नाही पण वाटेत दिसणारं सारं काही पाहून घेतो. शिवाय कठिण चढही नसतात मग यावर निरीक्षणावर लक्ष देता येतं...अरे तुझ्याकडे तर अजून भरपूर वेळ आहे आणि एक चांगला मित्र (तुझ्या ठाण्यातला) जास्त वेळ लागत नाही रे...:)
आणि आता फ़ेब्रुवारीत शिवडीला जायला मिळेल तुला..जळव आम्हाला दुसरं काय???