RSS

Tuesday, March 30, 2010

रानभूल...

’रानभूल’ हा शब्द आजवर अनेक जंगलाबद्दल लिहिलेल्या बर्‍याच खर्‍या आणि कल्पित कथांमध्ये भेटलाय..पण त्याआधी भेटलंय ते त्यातलं गडद, किर्र करणार जंगल....त्यामुळे आपण हा प्रकार फ़क्त पुस्तकातच अनुभवणार किंवा खरं तर असं काही नसेल अशा काही भाबड्या समजुतीत असतानाच एका मान्सुनमध्ये बी.एन.एच.एस.चा सिलोंडा ट्रेल जाहिर झाला...बी.एन.एच.एस.वाले प्रत्येक पावसाळ्यात एकदा तरी सिलोंड्यात घेऊन जातात त्यामुळे इतर वेळी वनखात्याच्या परवानगीशिवाय न जाणार्‍या विभागात जायला मिळतं शिवाय पावसाळ्यात सिलोंडयातले तिन्ही ओढे मस्त वाहात असतात, सगळीकडे गर्द हिरवाई पसरली असते आणि एकुण काय आपण मुंबईसारख्या एका मोठ्या शहरात उंडारतोय याचा नामोनिशान नसतो...
आतापर्यंत बी.एन.एच.एस.चे जवळजवळ सगळे गाईड निदान चेहर्‍याने तरी माहित झालेत किंवा थोडी मस्ती करता करताही सिरियसली बर्डिंग करणारा आमचा ग्रुप त्यांना माहित झाला आहे..काही का असेना ट्रेलच्या वेळी थोडी मुभा मिळते...म्हणजे थोडं इथे-तिथे उंडारलं तरी चालतं त्यावेळची ही गोष्ट आहे.....
आता आपण सिलोंड्यात काय नेहमीच येतो या मस्तीतच त्या दिवशी ओढा नं.२ पार केल्यावर जयेशच्या डोक्यात दुर्बुद्धी सुचली...(असले उद्योग करून गोत्यात आणायचं घाऊक कंत्राट त्याच्याचकडे आहे म्हणा...) "अरे आजचा ग्रुप (म्हणजे सगळा मोठा गोतावळा) जरा जास्त गडबड करणारा आहे...चलो जंगल में जाते है"...आम्ही काय? जंगल में म्हणजे किस झाड की पत्ती सारखं चला चला करुन बाकीच्या सगळ्यांना पुढे जायला दिलं आणि घुसलो उजवीकडे...

थोडा चढ होता पण शांतता होती...खरं तर बरं वाटत होतं..पावसाळ्यामुळे असेल बहुतेक पण पक्षीगण दिसले नाहीतच फ़ार पण हिरव्यागार जंगलातून मध्ये येणार्‍या वेलींना बाजुला करत कसे पुढे जात होतो कळतच नव्हतं...मध्ये पुन्हा एकदा ओढा लागला...आता जरा जरा भूकही लागली होती म्हणून पोटोबा केली..त्यादिवशी राकेशच्या आईने जवळजवळ सगळ्यांसाठीच मेथीचे ठेपले पाठवले होते त्यामुळे पहिले तर सगळे मुंगळ्यासारखे त्याच्याच डब्याच्या मागे धावले..नंतर मग इतरांनी आणलेल्या केळा वेफ़र्स, सॅंडविच, कुठे फ़ळ अशी सगळी भेळ पोटात गेल्यावर पुन्हा एकदा थोडं पुढे जाऊया असं ठरलं...मुख्य कारण एकतरी चांगलं सायटिंग झालं पाहिजे हे होतं आणि असं जेव्हा बर्‍याच परिघात पक्षी दिसत नाहीत तेव्हा काही वेळा एखाद्या ठिकाणी दोन-चार वेगवेगळ्या जातीचे पक्षी एकदम दिसायची शक्यता असते त्याला मिक्स हंटिंग पार्टी म्हणतात. तसलं काही असेल असं गाजर (अर्थातच जयेशनेच) दाखवल्यामुळे आगे बढोचा नारा होता......ती मिक्स हंटिंग पार्टी असायची तिथे असो पण आम्हाला काही दिसत नव्हती आणि अचानक कुणीतरी घड्याळ पाहायचा शाणपणा केल्यामुळे आता परत फ़िरायला हवंची जाणीव झाली...
परत ठिक आहे पण म्हणजे कुठे?? डावीकडे, ऊजवीकडे की सरळ मागे?? या मिक्स हंटिंगच्या शोधात कुणालाही दिशेची जाणीव होत नव्हती...पहिले उजवीकडे जाऊन पाहिलं तर वेलींची गर्दी वाढतच होती..शिवाय चढ आल्यासारखं वाटलं...नाही नाही चुकलंय...मग डावीकडे गेलं तर तीच आधीची झाडं आणि त्याला लगडलेल्या वेली सगळं सारखंच....चकवा...रानभूल...मारुती चित्तमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर आठवायच्या मनस्थितीत नसतानाही आठवले आणि सुनीलला म्हटलं अरे आपल्याला जरा भूलल्यासारखं झालंय आणि आता निदान अजून आत आत नको जाऊया..पावसाळ्यात काळवंडलेल्या आभाळामूळे अंधार लवकर पडतो आणि सिलोंड्यात वगैरे तर तो लगेच जाणवतो त्यामुळे आता अडकलो तर काय?? सगळीच जण थोडी थोडी घाबरली होती पण तरी एकमेका सहाय करुच्या तत्वाने शेवटी कसाबसा तो दुसर्‍यांदा मिळालेला ओढा मिळाला..मग तो पार केल्यावर बाकीच्या झाडं, तुटलेले ओंडके असं काहीबाही आठवून सिलोंडाच्या मुख्य ओढ्यावरुन एकदाचे ट्रेलवर आलो..
मूळचा ग्रुप कधीच घरी गेला असावा..सारं सिलोंडा चिडीचूप होतं..
एकदा रस्ता दिसल्यावर सगळीच जण पुनश्चः बडबड करायला लागले पण याआधीची दोनेक तासांची रानभूल एक वेगळाच थरारक अनुभव देऊन गेली आणि तेही चक्क मुंबईच्या नॅशनल पार्कात...

फ़ोटो..साभार डॉ.संगिता धानुका

8 comments:

हेरंब said...

हा हा चकवा.. आम्हाला सेम असाच चकवा लागला होता नाणेघाटला. बापरे वर तर पोचलोच नाही आणि जेमतेम निम्म्यापेक्षाही कमी अंतर गेल्यावर लक्षात आलं की साफ चुकलोय. म्हणून मग आता सरळ परत जाऊ म्हटल्यावर परतीचा रस्ताही सापडेना. जवळपास २-३ तास सगळ्या दिशांना भटकत होतो. अंधार पडायला लागला होता जवळपास... आणि सुदैवाने वाट सापडली. भयंकर अनुभव होता तो.

पण तुम्हाला नॅशनल पार्कात चकवा लागला म्हणजे जरा अतीच झालं ;-) हा हा

हेरंब said...

मी आधी एक मोठ्ठी कमेंट टाकली होती. बघ आली का?

हेरंब said...

हा हा चकवा.. आम्हाला सेम असाच चकवा लागला होता नाणेघाटला. बापरे वर तर पोचलोच नाही आणि जेमतेम निम्म्यापेक्षाही कमी अंतर गेल्यावर लक्षात आलं की साफ चुकलोय. म्हणून मग आता सरळ परत जाऊ म्हटल्यावर परतीचा रस्ताही सापडेना. जवळपास २-३ तास सगळ्या दिशांना भटकत होतो. अंधार पडायला लागला होता जवळपास... आणि सुदैवाने वाट सापडली. भयंकर अनुभव होता तो.

पण तुम्हाला नॅशनल पार्कात चकवा लागला म्हणजे जरा अतीच झालं ;-) हा हा

अपर्णा said...

अरे हेरंब त्यावेळेपुरता तरी तो चकवाच होता....सगळ्या वेली अंगावर येणार की काय आता असं झालं होतं...आता ही पोस्ट लिहिताना हसायलाच आलं होतं की चक्क नॅशनल पार्कमध्ये चकवा म्हणजे काय?? तुम्हाला नाणेघाटात म्हणजे एकदम वाट लागली असेल.....

Yogesh said...

नॅशनल पार्क मध्ये चकवा???? चला काही तरी वेगळा अनुभव!!! ब्लॉग टेम्पलेट मस्त आहे!!

@ हेरंब....नाणे घाट म्हणजे आमचा इलाखा बर का!!!

अपर्णा said...

मनमौजी, भटकंतीवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद..

आनंद पत्रे said...

तेंव्हा जरी घाबरल्यासारखे झाले असेल तरी आता तो चकवा आठवुन मजा येत असणार हे नक्की...

अपर्णा said...

हा हा आनंद...अगदी खरंय...