RSS

Wednesday, January 13, 2010

या नयनी मृग पाहिले मी...

थ्री इडियट्स पाहिल्यानंतर इंजिनियरींगचे दिवस आठवले..का माहित नाही पण मला इंजिनियरींगचं शेवटचं वर्ष जवळ येईपर्यंत इतका कंटाळा आला होता कदाचित डिप्लोमामार्गे डिग्री हा द्राविडी प्राणायाम केल्यामुळेही असेल..पण शेवटी शेवटी मी कॉलेज लाइफ़ला पर्याय म्हणून माझा निसर्गभ्रमंतीचा ग्रुप असं केलं होतं..नंतर नोकरीला लागल्यावर ते जास्त बरं झालं कारण नोकरीतले कॉन्टॅक्स परत विकेन्डला?? बापरे कल्पनाच करवत नाही..तिथेही टिम-मिटिंग नाहीतर पिअर रिव्ह्यु असलं काहीतरी बोलत बसले असते..खरंच याबाबतीत मी फ़ारच नशीबवान आहे, त्यामुळे शेवटच्या वर्षापासून का होईना माझ्या दैनंदिन कामाशी संबंधीत नसलेल्या मित्र-मैत्रीणींबरोबर मी जंगलात जायला लागले..त्यामुळे मला ख~या अर्थाने ब्रेक मिळे. आमच्या ग्रुपमधले सगळे जण वेगवेगळे अभ्यास आणि कामं करणारे होते त्यामुळे जी काही बोलणी होत ती फ़क्त आम्ही त्यादिवशी काय पाहिलं किंवा तत्सम विषयावरचीच असत...असो नमनालाच घडा भरला तेलाने..काय आठवलं होतं बरं??? :)
हां...तर शेवटचं वर्ष...शेवटच्या वर्षाच्या तोंडी परिक्षा सुरू होत्या म्हणजे परिक्षा जवळजवळ संपल्याच होत्या..ग्रुपमधल्या बाकी एक दोन टाळक्यांनाही वेळ असणार होता म्हणून आम्ही प्रथमच संध्याकाळी नॅशनल पार्कला जायचं ठरवलं. आजवर जे काही जायचो ते सात वाजता भेटून मग दुपारपर्यंत भटका असंच. पण यावेळी थोडा बदल करायचा प्रयत्न होता.सर्वांनी ठरवलेली वेळ होती चार वाजेपर्यंत.
गेटवर चार वाजता परिक्षा संपवून जाणं मलाही सहज शक्य होतं.आमच्यापैकी जयेशकडे गाडी होती. मला वाटतं त्याच्या बाबांनी त्यांची जुनी फ़ियाट त्याला वापरायला दिली होती. ही गाडी नंतर आमच्या नॅशनल पार्कच्या बर्याच ट्रेल्समध्ये होती आणि नंतर नंतर तिला प्रत्येकवेळी एकदातरी धक्का मारायला लागायचा त्यामुळे आम्ही त्याला जयेशचा डब्बाच म्हणायचो. तो कधीमधी चिडायचा पण त्याचीच काय आमची सर्वांचीच ती लाडकी होती..बापरे ही पोस्ट म्हणजे आठवणींचं जंगल होणार आता...जाऊदे या ब्लॉगमध्ये तसंही सगळ्या आठवणींचीच स्पर्धा असणार आहे.


तर गाडी असल्यामुळे कान्हेरीपर्यंत जावं असा बेत होता. कान्हेरीच्या मागे डोंगर आहे तिथे एका ठिकाणी मोर दिसतात अशी पक्की माहिती पण होती आणि अजून सरता मे होता म्हणजे येणा~या पावसाळ्यासाठी मोर तिथं नक्की येणार या उद्देशाने आम्ही सहा जण गेटवर भेटलो. नितीन, आराधना, मी, जयेश, राकेश आणि मला वाटतं सुनिल (सहावा नक्की आठवत नाही) होतो. पुढे तीन मागे तीन असे आम्ही पार्काचं तिकीट काढून गाडी आत घातली. उन्हं अजून वर होती. माझ्या मामाकडे जाताना आम्ही रस्त्यात लागणा~या गावदेवीला नेहमी नमस्कार करूनच पुढे जातो तसंच नॅशनल पार्कमध्ये कुठेही गेलो तरी सिलोंडाला थोडं वळल्याशिवाय आमचं घोडं पुढे जात नाही.....यावेळी गेलो तर चक्क सगळ्यांनी नाही म्हटलं मला कारण तिथे आता सेफ़ नाही असं म्हणतात (एकतर फ़ॉरेस्ट ऑफ़िसरनी पकडलं तरी किंवा कुणा टारगट कंपुच्या तावडीत सापडलो तरी म्हणून बहुतेक...) पण म्हणजे तोपर्यंत तरी आम्ही सिलोंडाला आमचा पार्कदेव करुन ठेवला होता. त्याप्रमाणे गाडी बाजुला घेऊन सिलोंड्यात एक छोटी चक्कर मारली. एक-दोन बॅबलर्स काय ते दिसले पण बरं वाटलं. मग आता कान्हेरीत जाऊया म्हणून जरा लवकर निघालो कारण कायद्याप्रमाणे काहीतरी सहा वाजता पार्काच्या बाहेर पडायचं असतं असं म्हणतात. त्यातल्या त्यात कान्हेरीचा पहारेकरी त्यावेळेला जरा हिंडूनफ़िरून, हाकारे देऊन सगळ्यांना बाहेर काढतो. त्यामुळे थोडा वेळतरी तिथे मिळायला हवा होता.


सिलोंडातून बाहेर आलं की पुन्हा मुख्य रस्त्याला एक दोन मिनिटांत आपण पोहोचतो आणि मग संध्याकाळची जंगलाची शांतता सुरू झाली. आम्ही सगळीजणं अगदी शांतपणे ती अनुभवत पुढे जात होतो..खरंच विश्वास बसत नाही की आपण भारताच्या आर्थिक राजधानीतच आहोत, शहराचा गोंगाट अगदी एखाद मैल पलीकडे आहे आणि इमारतींचं जंगलही खूपच जवळ आहे. मेमध्ये पार्कातलं जंगल जरा हिरवळ कमी झाल्यामुळे रिकामं रिकामं असतं.रस्त्याच्या बाजुला नजर वळवली तर मिठी नदीचा ओहोळ आणि त्यापलीकडच्या झाडांतलं ब~यापैकी दिसतं. तसंच तेव्हाही होतं. गाडी मध्ये एक जंगल खात्याचा दांडी पाडून बंद करायल येईल असा गेट आहे (तिथे परत गाड्यांची तिकिटं तपासली जातात) त्याच्या जरा अलीकडे होती आणि मी डाव्या बाजुला बसते होते त्याच बाजुच्या झाडीमध्ये काहीतरी हालचाल मला दिसली. मी जरा जास्तच किंचाळून जयेशला गाडी थांबवायला सांगितलं. गाडी थोडी पुढेच गेली होती कारण काय झालंय कुणालाच कळलं नव्हतं.
मग गाडी जरा रिव्हर्सला घेतली तर माझ्यासारखेच सगळे आनंदाने चित्कारले..संध्याकाळच्या वेळी जंगलात चरायला आलेल्या ठिपकेवाल्या हरणांचा एक कळप रस्त्याच्या जवळपासच्या झाडीत जवळच होता. नीट पाहिले की एक शिंगावाला नर, चारेक माद्या आणि दोन छोटी पिल्लं होती. आम्ही गाडी जरा मागं लावली आणि मग आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये असलेल्या एकुलत्या एक दुर्बिणीने एकापाठी एक त्यांना गाडीमागे लपून बराच वेळ पाहून घेतलं. नितीनकडे कॅमेरा होता त्याने फ़ोटोही घेतले. त्यातल्या एका मादीचं थोडं आमच्याकडेही लक्ष होतं. पण एकतर इथल्या हरणांना थोडंफ़ार सवय असावी किंवा आमच्यापासून धोका नाही हे तरी जाणवलं होतं.


पुन्हा गाडीत बसताना माझं तरी ’आज मै उपर आसमान नीचे’ असं झालं होतं.. अरे कशाला का?? माझ्या आयुष्यात मी स्पॉट केलेला जंगलातला पहिलावहिला कळप...स्पॉटेड डिअर. बोरीवलीच्या नॅशनल पार्कात तशी ब~यापैकी आहेत. पण ती त्यांना असं मनमोकळं नैसर्गिकपणे पाहण्याची ही पहिलीवहिलीच वेळ.त्यावेळी अंगावर आलेले रोमांच आणि ती अत्यानंदता वेगळीच. जंगलात असे रोमांचक क्षण जितके जास्त वाट्याला येतात तितकं आपलं जंगलात भटकंती करायचं वेड अजूनच वाढतं. त्यादिवशी नंतर कान्हेरीला आम्हाला विशेष काही दिसलं नाही. मोरांचा पण नुसता आवाजच ऐकू आला.पण तरी परत जाताना प्रत्येकजण एका नव्या आनंदात होता. पार्कात संध्याकाळचं असंच अधुनमधुन यावं असं सर्वानुमते ठरलं. पुन्हा सारखं सारखं नाही पण अधेमधे गेलोही पण पहिल्या फ़ेरीच्या वेळी पाहिलेली हरिणं आणि तो आनंद आमच्यापैकी प्रत्येकाच्याच मनावर वेगळा कोरला गेला आहे.
कधीतरी दूरदेशी उदास बसले असताना मध्येच ग्रुपमधलं कुणीतरी स्क्रॅप करतं ’अगं आज स्पॉटेड डिअर दिसलं, तुझी आठवण आली’ की वरचा प्रसंग आपसूक डोळ्यापुढे उभा राहतो आणि पुन्हा ते थ्रिल अनुभवते अगदी ही पोस्ट लिहिताना वाटतंय तसंच.

8 comments:

Mahendra said...

कान्हेरी केव्हज मधे आम्ही पण बरेचदा जायचो. पाउस पडला की हा परिसर अप्रतीम असतो. पण हल्ली मुली मोठ्या झाल्यावर एकदा गेलो असता, तिथे काही मुलं दारुपिउन मस्ती करतांना आणि लोकांना त्रास देतांना आढळल्यापासुन तिथे जाणे बंद केले. पोस्ट खुपच छान झालंय..
मला पण टायगर स्पॉटींग बद्दल आठवलं कान्हा किसली ला.. लिहिन त्यावर पण लवकरच.. सुंदर पोस्ट!!

अपर्णा said...

महेन्र्दकाका आजकाल सगळ्याच अशा जागा सो कॉल्ड टुरिस्टनी खराब झाल्यात...काय सांगायचं...आम्हाला नुसतं पक्षी पाहायला जंगलात आत जाऊ नका म्हणणारे फ़ॉरेस्ट ऑफ़िसर अशावेळी कुठे असतात काय माहित...तुमच्या कान्हाच्या अनुभवाबाबत ऐकायला जरूर आवडेल. आणि या पोस्टचं म्हणाल तर मनाच्या फ़ार जवळचं आहे त्यामुळे कण न कण आठवतो म्हटलं तरी चालेल...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

हेरंब said...

वा एकदम छान पोस्ट. छान स्पर्धा चालू आहे आठवणींची.. आणि शेवट तर एकदम झकास..

अपर्णा said...

धन्यवाद हेरंब....खरंच आठवणींची स्पर्धा आहे. सगळं नीट आठवलं तर मग स्वतःलाच ते वाचताना भरुन येईल असं वाटतं...खूपदा ते जुने दिवस आणि नंतरचं धकाधकीचं रूटीन याची तुलना केली जाते आणि उगाच डोळे भरुन येतात....

रोहन... said...

ही पोस्ट वाचलीच नव्हती मी ... आत्ता वाचतोय बघ.

कान्हेरी केव्हज, सिलोंदा आणि पूर्ण SGNP म्हणजे आमचा अड्डा एकेकाळी. :) आम्ही काहीजण बाईकवरुन एकदा गेलो होतो तेंव्हा आम्हाला २०-२२ हरणे दिसली होती. हर्ष वायु झाला होता तेंव्हा बघून आणि तू जो ओहोळ म्हणते आहेस तो पोइसर नदीचा असावा मीठी नदीचा नव्हे.

अपर्णा said...

धन्यवाद रोहन...तू म्हणतोस त्याप्रमाणे कदाचित मिठी नसेलही...आता तसंही इतकी वर्षे नं गेल्यामुळे आठवणीही धुसरच आहेत पण तरी तो अनुभव मात्र ताजा आहे...:)

Meenal Gadre. said...

हरिण छान प्राणी आहे. डोळे सुंदरच दिसतात. पण घाबरट फार. त्यांचं सौंदर्य डोळ्यात साठवून घेईपर्यंत निसटून जातात.

अपर्णा said...

मीनलताई, आभार...हरिण फ़ार घाबरट आहे पण बिचार्‍यांना खायला बरेच प्राणी (माणूस धरून) टपलेत की त्यांना खाता खाता पळू शकायची तयारी नेहमीच ठेवावी लागते....