RSS

Thursday, January 7, 2010

पुनश्च:गणेशा...

सध्या माझ्या बर्याच ब्लॉगर मित्रमैत्रीणींनी सहजच त्यांच्या मनातलं सांगितलं आणि ते म्हणजे आता त्यांना ब्लॉगवर नियमितपणे लिहिता येणार नाही..त्यानंतर मग जिवनिकेने अगदी योग्य शब्दात त्यांना समजावलंही आणि ती पोस्ट वाचताना मला आठवलं की ही लोकं निदान छान छान पोस्टस लिहून तरी निवृत्तीचे संकेत देतात पण मी मात्र अगदी (बहुतेक उसन्या) उत्साहाने चालु केलेल्या या भटकंती ब्लॉगचं मी काय करुन ठेवलंय?? नव्याचे नऊ पण नाही फ़क्त दोन पोस्ट्स?? छे ते काही नाही यावर्षात या ब्लॉगवरचा आळसही थोडा झटकला पाहिजे नाही का??
खरं सांगायचं तर या ब्लॉगची सुरूवात केली त्याची मूळ कारणं दोन एक म्हणजे पहिली पोस्ट आहे ती मला कुणीतरी वाचून त्यावर विचार करावा असं जाम वाटत होतं आणि कुठच्या वर्तमानपत्रात ते छापायला वगैरे द्यायचं का हे ठरवायच्या आधीच मी परतीच्या प्रवासाला निघाले मग ते राहून गेलं आणि दुसरं दिपक माझा मित्र ज्याचा ब्लॉग सगळीच वाचतात नेहमी म्हणायचा की तू पण एक ब्लॉग सुरू कर, एकदा सुरू केलं की लिहिलं जातं इ.इ. तेव्हा मग मलाही वाटलं की जे काही आपण भटकलोय त्याच्य आठवणी खरंच लिहील्या पाहिजेत म्हणून मग चालू केलं आणि पोस्ट नं. २ लिहिल्यानंतर बास...असं कसं...
म्हणजे त्याचं काही नाही फ़क्त मी फ़ार्फ़ार पूर्वीच बाबांच ऐकलं असतं तर या ब्लॉगवर टाकायलाही बरंच काही मिळालं असतं पण ....जाऊदे...नेहमी म्हणतात (अजुनही),"अपर्णा, तू जिथे जातेस त्या जागांबद्दलचे अनुभव लिहून ठेवत जा".त्यांचं ऐकून फ़क्त सागरगडाबद्द्लच लिहीलं होतं ते तसच्या तसं उतरवलं आणि पुन्हा पाढे पंचावन्न...असो...आता आतापर्य़ंत या ब्लॉगवर कॉमेन्ट आली होती की हा ब्लॉग असा उदास का? म्हणून घोळत होतं मनात..पण आज रोहनच्या सप्त शिवपदस्पर्श वाचल्यावर असं वाटलं की अगदी त्या पातळीवरचं नाही पण थोडंफ़ार जुनं आठवून पाहायला काय हरकत आहे??
असं म्हणतात की शेंडेफ़ळाचे लाड जास्त होतात म्हणून माझिया मनाचे लाड जास्त आय मिन पोस्ट्स जास्त झाल्या का? पण आईला सगळी मुलं सारखी तसं हे मोठंही या वर्षी थोडं अजून मोठं करूया असं ठरवतेय..अर्थात हा निग्रह नाही पण बघुया किती आठवतं ते?असो.
नमनाला सांगायचं तर कदाचित माझ्या बाबांमुळे माझ्या रक्तात हे आलं असावं..जेव्हापासून पुस्तकं वाचायला लागले तेव्हापासून व्यंकटेश माडगुळकरांचं लिखाण आणि तेही त्यातलं जंगलाचं वर्णन वाचून भारावल्यासारखं व्हायचं. मारूती चित्तमपल्लीबरोबर आपणंच पक्षी पाहातोय असं वाटायचं. कधी हे स्वतःही करू असं वाटलं नाही पण मला वाटतं बहुतेक ९८ साली ठाण्याला पक्षिमित्रसंमेलन भरलं आणि मैत्रीणीबरोबर त्याला गेले. तिथे बी.एन.एच.एस.ची माहिती कळली आणि शेवटी ते मला मिळेपर्यंत म्हणजे साधारण १९९९ साली जंगल भटकंती, थोडंफ़ार पक्षिनिरीक्षणाचा खर्या अर्थाने नाद लागला.
त्यानंतर भारतात असेपर्यंत म्हणजे २००३ पर्यंत त्या भटक्या मंडळींबरोबर जमेल (आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल) तेवढी बरीच भटकंती केली.कुठेच जायला नसलं म्हणजे आपलं हक्काचं बोरीवलीचं नॅशनल पार्क, त्यात एवढ्या वेगवेगळ्या आतल्या ठिकाणी गेलो, एकदा फ़ॉरेस्ट ऑफ़िसरसमोर उठाबशाही काढल्यात. ते मंतरलेले दिवस पुन्हा येणं अशक्यच आहे पण त्यांच्या आठवणीत रमण्यासारखं दुसरं सुख नाही. तेव्हा कॅमेराही नव्हता आणि जो तो त्यांचे फ़ोटो काढी त्यातले नेहमीच मागायला कसंतरी वाटे शिवाय त्यांचा डिजीटल कॅमेराही नसे त्यामुळे जे काही आहे ते सर्व फ़क्त काही आठवणींच्याच कॅमेर्यात कैद. सगळं तसच्या तसं नाही पण बरचसं आठवेल या अपेक्षेने हा पुनश्च: श्रीगणेशा.

7 comments:

आनंद पत्रे said...

तुमच्या निर्णयाचे स्वागत, लिखानास शुभेच्छा!

HAREKRISHNAJI said...

welcome back

अपर्णा said...

आनंद आणि हरेकृष्णाजी धन्यवाद...अगदी खूप नाही पण जेवढं जमेल तेवढं लिहिणार आहे...

हेरंब said...

अरेच्च्या.. ही अपर्णा पण तूच आहेस कळलंच नाही आधी. अर्थात मी पण प्रोफाईल मध्ये वगैरे जाऊन बघायचा कंटाळाच केला थोडा. तुझा रिप्लाय बघताना कळलं की ही तर अपर्णा@माझिया-मना.कॉम :)

(तू म्हणशील ब्लॉग वाचताना झोपला होतास का? तिथे नाही का दिसला माझिया मना चा उल्लेख? तर त्यावर उत्तर असं की मला वाटलं या अपर्णाने त्या अपर्णाचा उल्लेख केला असेल तो सहज नाम साधर्म्य दाखवायला :) )

अपर्णा said...

हा हा हा...हेरंब..ही मीच आहे..खरंतर हे पहिलं अपत्य पण नंतर आळश्यांची राणी अंगात संचारली बहुतेक आणि मग नंतर अचानक माझिया मनाचा जन्म झाला...तिथे काहीही लिहीता येतं पण इथं म्हणजे फ़क्त भटकंतीचं आठवलंही पाहिजे ना?? आता पाहाते या वर्षात थोडी तरी भर घालता येते का...:)

रोहन... said...

वा.. भटकंती वरील तुझ्या ब्लॉगचा पुनर्जन्म पाहून मला अतीव आनंद झालाय. आता अशीच लिहितो.. या पुढे सुद्धा... :)

अपर्णा said...

रोहन तुझाही सहभाग आहे बाबा या ब्लॉगचा पुनर्जन्म करण्यामागे. अर्थात वाचल्यावर लक्षात येईल तुझ्या की तसा काही दम नाही माझ्या भटकंतीत..एक म्हणजे गड किल्ल्यांच्या माहितींसारखं काही नाही या ब्लॉगवर आणि अरे साधारण चारच वर्षं मिळाली त्यातलं एक इंजिनियरींगच्या अभ्यासाने आणि इतर वर्षांमधला बराचसा भाग नोकरीने खाल्ला...जे काय कसंबसं पाहिलेय त्याच्या आठवणी काढायच्या..तुझ्यासारख्या सगळ्याच अट्टल भटक्यांचा हेवाच वाटतो...