RSS

Sunday, November 28, 2010

मालवण दिवस दुसरा - धामापूर, सिंधुदुर्ग आणि रात्रीची भटकंती

आदल्या दिवशीचा मालवण वृत्तांत इथे वाचता येईल.

धामापूर ही मालवणपासून साधारण १५-१८ कि.मी. अंतरावर असलेली पक्षीअभयारण्य आणि तिथे असलेला मानवनिर्मित मोठ्ठा तलाव असलेली जागा आहे. आमचा मुख्य उद्देश पक्षी पाहाणे असल्यामुळे आम्ही सकाळी लवकरच नाश्ता करुन आमची बस घेऊन तिथे पोहोचलो. सकाळची प्रसन्न वेळ म्हणजे पक्षी पाहण्यासाठी पर्वणीच. माझ्या बर्डलिस्टप्रमाणे फ़क्त धामापुरला त्या दिवशी आम्हाला ३५ जातींचे तरी पक्षी दिसलेत.


त्यात बस पार्क केल्यानंतर जो छोटा पायरस्ता चालुन आम्ही भगवती देवीचं देऊळ आणि त्यासमोरच्या तलावाजवळ पोहोचलो होतो तिथे सुरुवातीलाच आम्हाला स्कार्लेट मिनिव्हेटच्या दोन जोड्या दिसल्या. आतापर्यंत हा पक्षी मी नैसर्गिकरित्या पाहिलाच नव्हता त्यामुळे नर आणि मादी दोघांचे रंग पाहुन अक्षरशः हरखायला झाले. त्यानंतर स्मॉल मिनिव्हेटही दिसली. बाकी नेहमी दिसणारे शिंजीर, आयोरा, बुलबुलाच्या जाती, हळद्या, पारवे, ड्रोंगो हे नेहमीचे साथीदार तर होतेच.

तलावाजवळ दिसलेली पाईड किंगफ़िशरची जोडी जणू काही आमच्यासाठीच तिथे थांबली होती. आणि बाकीचे पाणपक्षी अर्थातच होते पण त्या शांत देवळात दर्शन करुन झाल्यावर बाहेर बसलो असताना राकेशने तलावाच्या दुसर्‍या बाजुला स्पॉट केलेला क्रेस्टेड हॉक इगल म्हणजे या सगळ्यावर कळस होता.

आधी त्याला पलीकडच्या किनार्‍यावर एक मोठा पक्षी दिसला आहे इतकं जाणवलं आणि मग दुर्बिणीने पाहून सालिम अलींच्या पुस्तकात कर्न्फ़म करुन मग त्याला जो हर्षवायु झाला होता तो मला आजही तसाच आठवतो. पाण्याच्या जवळ हा गरुड बराच वेळ बसला होता. एकतर त्याबाजुला एकांत आणि मार्चमधला उन्हाळा यामुळे बहुतेक तो तिथे इतका वेळ असावा असं वाटतं. आम्ही सर्वांनी मनसोक्त त्याला पाहून घेतलं आणि दुपारच्या जेवणासाठी मुक्कामी परत आलो.

संध्याकाळी तारकर्लीचा किनारा आणि सिंधुदुर्ग किल्ला असा बेत होता. या ग्रुपमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही चटकन विचार मनात आला तरी कुणीही थोड्या वेळाने निघुया म्हणून कंटाळा केला नाही त्यामुळे हातात असलेला सगळा वेळ आम्ही निसर्गभ्रमंती करु शकलो.थोडक्यात तेरा माणसांची स्वतः बस घेऊन जाण्याचा अगदी पुरेपुर लाभ आम्ही उठवला.

सिंधुदुर्गचा किल्ला म्हणजे बोटीतुन सगळ्यांनी एकत्र जायचा अनुभव, मस्ती आणि तिथेही मनसोक्त भटकंती आणि येताना किनार्‍यावर मच्छिमार लोकांची वर्दळ पाहणे याची मजा होती. तारकर्लीला आमच्या आधी एक ग्रुप आला होता त्यांना डॉल्फ़िन दिसले होते पण आमचं मात्र तितकं सुदैव नसावं. पण खरं सांगायचं तर धामापूर  आणि सिंधुदुर्गमध्ये मन इतकं भरुन आलं होतं की माझ्या पक्ष्यांच्या नोंदीच्या खाली लिहिलेलं wonderful day मला आजही बरंच काही सांगुन जातंय..

पण अजून रात्र बाकी होती. आणि जयेशच्या मते रात्री थोडं गावाबाहेर बस काढली तर एखादं शिकारीसाठी बाहेर निघालेलं जनावर दिसू शकेल त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा सगळं पब्लिक तयार झालं. माझ्या मते नाइट जार हा रात्रीच दिसणारा पक्षी आणि ससे हे सोडलं तर आम्हाला काही दिसलं नाही. एक म्हणजे आम्ही काही कुठल्या राखीव जंगलात गाडी घातली नव्हती आणि दुसरं म्हणजे त्या भागात कुठे काय दिसु शकतं हे सांगणारा कुणी वाटाड्या आमच्याबरोबर नव्हता. पण अगदी पहिल्यांदा असं किर्र काळोखात फ़िरताना जसं रोमांचकारी वाटेल तसं मात्र झालं होतं. मध्ये एका ठिकाणी खसफ़स झाली म्हणून गाडीचं इंजिन बंद करुन आम्ही थांबलो. जयेशच्या अंगात जरा खुमखुमी असल्याने त्याने डोक्यावर लावायची टॉर्च असते ती लावुन उतरून थोडं जाऊनही पाहिलं.

लाल डोळे लांब दिसत होते पण माझं रात्रीच्या अंधारात प्राणी ओळखण्याचं कौशल्य शून्यच आहे. त्यामुळे मी तरी फ़क्त बसमधुन पाहात होते. थोडं पुढे जाऊन जयेशही परत आला. त्याच्या मते ते तरस होतं. असुही शकतं. पण हा अनुभव अजुनही आठवला की वाटतं कुणालाच कसल्या प्रापंचिक चिंता नव्हत्या त्यामुळे मनमुराद भटकण्याचे ते दिवस तेव्हा आले हे तरी नशीब नाही?? आता तर आठवलं तरी आपण नक्की कसली ओझी वाहतो आहोत आणि या अशा जुन्या आठवणीमध्ये पुनःपुन्हा जातो आहोत...

हम्म..अजुन एक दिवस उरलाय आणि कुठे जाणार आहोत आपण?? अजुन काय काय अनुभवायचं आहे बरं......

Sunday, November 21, 2010

मालवणची भटकंती

माझ्या पक्षीनिरिक्षणकालाचा "हनिमुन पिरियड" म्हणता येईल त्या दिवसांतली ही ट्रिप आहे. जयेशचं गाव मालवण आणि तिथला परिसर, दिसणारं पक्षीजीवन याबद्दल त्याला चांगली माहिती होती आणि चांगली गोष्ट ही, की आमचा सगळा ग्रुप तिथे घेऊन जावा, ही कल्पनाही त्यानेच आमच्या मागे लागुन मार्गी लावली. योग्यवेळी योग्य सहकारी मिळाले की एखादं प्रोजेक्ट जसं हमखास यशस्वी होतं तसंच या मालवण दौर्‍याचं झालं.
आईने माझी एक छोटी डायरी तिच्याकडे राहिली होती तिच्यामध्ये या मालवण फ़ेरीची सगळी बर्ड-लिस्ट वाचताना मी स्वतःलाच नशीबवान समजते की मला अशा प्रकारेही फ़िरता आलं. त्या दौर्‍याची या नोंदीप्रमाणे आठवेल तशी ही कहाणी.

Paradise flycatcher male



राखी धनेश

हळद्या
आम्ही मार्चमध्ये हा दौरा आखला होता आणि अगदी फ़ुल हाउस म्हणजे साधारण १२-१३ जण मिनी बसने मुंबईहुन मालवणला निघालो होतो. यावेळी आमच्याबरोबर सर्वात लहान भटक्या होता तो म्हणजे "केदार", त्याने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. बाकी आम्ही सगळे कर्तेसवरते होतो. यात सगळेच आमच्या मूळ ग्रुपमधले नव्हते पण काहींनी आपले पक्षीनिरीक्षणाची आवड असणारे मित्र-मैत्रीणी आणल्यामुळे सर्व मिळून १२-१३ झालो होतो. सर्वानुमते अंधेरी पुर्वेकडे भेटून निघायचं ठरलं त्याप्रमाणे बसही तिथंच बोलावली होती. बर्‍याच सकाळी निघालो होतो. तिथे तीन दिवसांचा मुक्काम होता त्याप्रमाणे सामानही जास्त होतं. सुनीलला यायला जमणार नव्हतं पण तरी आम्हाला निरोप द्यायला तो खास अंधेरीला आल्याचं मला अजुनही आठवतं त्याचा पडलेला चेहरा आम्हाला दिसु नये याचा कसोशीने प्रयत्न चालला होता पण अर्थात आम्ही त्याला जास्त खिजवले नाही. अंधेरीहून निघाल्यावर आम्हाला फ़क्त संगिता आणि तिची मैत्रीण सुगंधा यांना दादरहून घ्यायचे होते की मग आम्ही सुसाट. बसमध्ये अक्षरशः पुन्हा कॉलेजजीवन जगल्यासारखी तुफ़ान मस्ती, गाणी, हैदोस घालुन आम्ही नक्की पक्षी पाहायला चाललोत का असं काही वातावरण निर्माण झालं.पण गाडीने कोकणातल्या लाल मातीला उधळायला सुरुवात केली तसा आमच्यातल्या पक्षीनिरीक्षक जागा झाला.


खंड्या
 त्याचं कारण मुळात हे होतं की ज्या पक्ष्यांना मुंबईच्या नॅशनल पार्कात शोध शोध शोधावं लागायचं ते अगदी आमच्यासमोर हाय हॅलो करायला दिसत होते. त्यांना न्याहाळायला दुर्बिणीची पण गरज पडत नव्हती. आजुबाजुची शेतं, पुलांवरुन बस जाताना दिसलेली नदीची पात्रं अशा अनेक ठिकाणी आम्हाला सुरुवात व्हायच्या आधीच हा मटका लागल्यासारखं झालं होतं. राष्ट्रीय पक्ष्यापासुन सुरुवात झाली ती अगदी पांढर्‍या पोटाचा खंड्या आणि चक्क धनेशाच्या दोन जोड्याही(त्यातही मलाबार पाईड हॉर्नबिल) आम्हाला सहजगत्या दिसल्या. सगळीजण जाम उत्तेजित झाले. मी आत्ता ती बर्डलिस्ट वाचतानाही तिथे पोचल्यासारखं होतंय.

पहिल्या प्लानप्रमाणे आम्ही जय़ेशच्याच घरी राहणार होतो म्हणजे राहिलोही होतो. पण दुसर्‍या दिवशी तिथे त्यांनी घराचा काही भाग कुणाला वापरायला दिला होता त्यांना आमचं येणं कितपत रुचतंय याचा अंदाज न आल्यामुळे तिथेच जवळ एका घर कम खानावळीत राहिलो. तिथे राहण्याचा फ़ायदा म्हणजे अस्सल मालवणी घरगुती जेवण मिळालं आणि घरकाम करायचा त्रासही वाचला.

स्वर्गीय नर्तक
१८ मार्चला साधारण साडे-तीनच्या सुमारास पोहोचलो तर जयेशच्या घराच्या मागेच आम्हाला पाहून पॅराडाइस फ़्लायकॅचरचा मेल दुसर्‍या फ़ांदीवर उडाला. त्याला इतक्या सहजगत्या पाहुन खरं तर आम्हीच उडालो. नॅशनल पार्कात हा "स्वर्गीय नर्तक" दिसावा म्हणून किती नवस बोलायचो आम्ही! अगदी एकदा संगिताने आणलेल्या खिरीला त्या दिवशी मोठ्ठा दांडा असलेला चमचा आणला होता आणि त्यादिवशी नेमका हा नर्तक दिसला तर त्या चमच्याचंच नाव आम्ही "पॅराडाइस चमचा" ठेवलं. तिला प्रत्येकवेळी शकुन म्हणून तो आणायलाही आम्ही सांगायचो. आणि इथे बघा अजुन आंघोळीपण केल्या नाहीत तर आमचा पक्षीदेव आमच्या पुढे हजर. :)

पाइड खंड्या
मालवणमध्ये असाच सहजगत्या दिसलेला दुसरा पक्षी म्हणजे आमचा एल.जी.बी. अर्थात लार्ज ग्रीन बार्बेट. नॅशनल पार्कात त्याचा "कुकडूक कुकडूक" असा काहीसा आवाज ऐकायचो पण साहेबांचं दर्शन म्हणजे राकेशला दिसला तर. पण जयेशच्या घराच्या ओट्यावर बसल की समोरच्याच झाडावर एल.जी.बी आवाज करतोय आणि आम्ही "आ" वासुन पाहातोय. अहाहा....आणि असं जवळून दर्शन झाल्यावर मग निवांतपणे दुर्बिणीतूनही या पक्ष्यांनी त्यांचे रंग डोळ्यात कायमचे साठवेपर्यंत तिथे बसुन राहणं त्या दिवसांत रोजचं. आम्ही काय बघतो हे त्याच्या शेजारच्यांना कळायचं नाही कारण त्यांच्यासाठी हे पक्षी म्हणजे काही आमच्यासारखी नॉवेल्टी नव्हती. आम्हाला त्यांचा इतका हेवा वाटला ना...

Shrike
त्या दिवशी रात्री जेवल्यावर अंगणात आतापर्यंत पाहिलेले चांगले पंचवीसेक पक्ष्यांच्या लिस्टची उजळणी आणि पुढे काय काय पाहायला मिळेल याच्याच चर्चा सुरु होत्या. एवढा मुंबईपासुनचा रात्रभरचा प्रवास झाला तरी या पक्षीदर्शनाने मात्र कुणीच मरगळलेलं नव्हतं. रात्री त्याच्या घरी झोपुन दुसर्‍या दिवशी त्या घरगुती लॉजमध्ये जायचं होतं. आणि दुसर्‍या दिवशीच्या लिस्टवर होतं धामापुर.

पण त्याबद्द्ल नंतर. आज आठवणी आहेत त्या मालवणचं प्रथम दर्शन, तिथली ताजी हवा, रात्रीचं सामिष जेवण, सोलकढी आणि या सर्वांवर कडी करणारे ते पंचवीसच्या वर दिसलेले वेगवेगळ्या जातींचे पक्षी...

Sunday, October 17, 2010

लोहगडावर एक रात्र आणि दिवस

जसजशी निसर्गभ्रमंतीची आवड निर्माण होते तसतसं हळुहळु नेहमीची नॅशनल पार्क आणि अशा जवळपासच्या जागा सोडून थोडं वेगळ्या जागीही जावंसं वाटायला लागतं. त्यात जर वेळीच योग्य सोबती मिळाले तर मग सह्याद्री हा आपला जवळचा मित्र बनुन किती ओढ लावतो हे ज्यांनी ती तशी भटकंती केलीय किंवा करतात त्यांना सांगायलाच नको.


अशाच एका चर्चेत संगिताने तिच्या माहितीतलं कुणीतरी लोहगडावर जाणार आहे त्यांच्या बरोबर जाऊया का अशी कल्पना पुढे आणली आणि जवळजवळ सगळेच तयार झाले.२००० च्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये साधारण खूप पाऊस नाही पण गरमीही नाही अशावेळी आम्ही जायचं ठरवलं. सारेच मुंबईहून जाणार असल्याने एका शनिवारी दुपारी सिंहगडने लोणावळा आणि मग लोकलने मळवली गाठावं. संध्याकाळी चढून, रात्री गडावरच्या गुंफ़ेमध्ये राहावं, रविवारी गड हिंडून मग दुपारी जरी परतीचा प्रवास सुरु केला तरी रविवार रात्रीपर्यंत सारी घरी पोहोचतील अशी साधारण आखणी होती.

आम्ही जवळजवळ सगळीच जणं व्हीटीला भेटलो. माझा क्लायन्टही तेव्हा फ़ोर्टला होता त्यामुळे मलातर जास्तच सोयीचं होतं. शनिवारची दुपार कधी येते असं झालं होतं. एकत्रच भेटल्यामुळे गाडीत एकत्र बसायला मिळालं..लोणावळा-पुण्याला ट्रेनने जायला मला फ़ार आवडतं..कर्जतचा वडा खायचा, पावसाळ्यातले हिरवे डोंगर, धबधबे पाहायचे...ट्रेकच्या आधीच मन प्रसन्न होतं. मला आठवतं हे वडे खाल्यावर सगळ्यांनी आपापला कचरा गाडीबाहेर फ़ेकु नये म्हणून आमच्या ग्रुपमधल्या सत्यमने एक उत्स्फ़ुर्त रोड (की ट्रेन) शो केला होता. जमुरे टाइप संवाद म्हणून आणि आम्ही पण त्याला साथ केली होती. आमच्या सहप्रवाशांना त्यामुळे आम्ही पावसाळ्यात दंगामस्ती करणार्‍या भटक्यांपेक्षा काही वेगळे आहोत असंही वाटलं असावं. पण एक खरं तो प्रवास खूप छान झाला होता. त्या आठवड्याच्या कामाचा शीण हळूहळू विसरायला होत होता.

मळवलीपासुन आधी जो गावातून रस्ता जातो आणि मग डावीकडे भाज्याची लेणी दिसतात तिथपर्यंत सगळं छान सुरु होतं. नंतर मध्ये मध्ये थोडा चढ येतो..(मला वाटतं आता तिथंही रस्ता झाला आहे. पण मी स्वतः नंतर तिथं गेले नाही त्यामुळे नीट माहित नाही) तर त्या चढावाच्या इथे का माहित नाही मला धाप लागायला लागली. पहिल्यांदीच रात्री राहायचा प्लान असल्यामुळे पाठीवर राहायचं, खायचं सामान, पाण्याच्या बाटल्या हे नाही म्हटलं तरी वजनच; शिवाय कामाचा दिवस, त्यामुळे शरीर संध्याकाळी थोडं थकलेलंही होतं. मग माझं काही सामान राकेश,जयेश यांनी काढुन घेतलं आणि माझीही गाडी हलु लागली. खरं हा सगळा आणि यानंतर काही ट्रेक केले त्यातुलनेने लोहगड खूप सोपा आहे आणि नंतर तर सरळ पायर्‍याच आहेत पण त्यावेळचा माझा तो दुसरा किंवा तिसरा ट्रेक होता त्यामुळे सवय नव्हती म्हणूनही असं झालं असावं..

पुन्हा गाव लागुन पायर्‍या लागेस्तो अंधार पडायला लागला होता आणि आमच्या गाईडच्या मते आता लवकर माथा गाठायला हवा. पायर्‍यांचा रस्ता संपेस्तो जवळजवळ अंधारच झाला होता त्यामुळे आम्ही आमच्या पथार्‍या पसरायला पहिले जागा शोधायला सुरुवात केली. तिथे आमच्या आधी आणखी एक ग्रुपही वस्तीला होता आणि मला वाटतं आमच्या ग्रुपमध्ये मी आणि संगिता दोघीच मुली होतो त्यामुळे मग आमच्या रक्षणकर्त्या ग्रुपमित्रांनी आम्हाला सोयीस्कर पडेल अशा जागेची सोय केली...एकदा तिथे सेट झाल्यावर मग बरोबरीच्या खाऊची अंगतपंगत झाली आणि एकदम आम्हाला आठवलं की सुनीलपण येईन असं म्हणाला होता. आम्ही असं म्हणतोय तोच स्वारी चक्क ऑफ़िसचे कपडे आणि लेदरचे बुट अशा अवतारात हजर..मला वाटतं तो कुठल्यातरी इंटरव्ह्युवरुन सरळ इथेच येत होता. कसा काय अंधारात पोहोचला माहित नाही पण ही वल्ली नॅशनल पार्काच्या बाजुला राहुनही खूपदा स्लिपरमध्ये आमच्या बरोबर कान्हेरीला आलीय..कारण घरी नाक्यावर जातो असं काहीतरी सांगितलेलं असायचं मग दुसरं काय करणार?? असो..तर त्या रात्री झोप कमी आणि गप्पा जास्त असं सुरु होतं.

सकाळचे नक्की किती वाजले होते माहित नाही पण गडाखालुन एक सुंदर शीळ येत ऐकु येत होती. अरे Malabar Whistling Thrush अर्चित लगेच म्हणाला..त्या आवाजाचा मागोवा घेण्यासाठी सगळेच एक एक करुन उठले पण त्या दिवशी एकंदरित पक्षीदर्शन नशीबात नव्हतं. खरं तर त्या पूर्ण ट्रेकमध्ये नंतर दिसलेली पांढरपाठी गिधाडं सोडली तर काहीच पाहिल नाही पण जे काही निसर्गदर्शन झालं त्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील.

त्या थ्रशच्या निमित्ताने उठल्यामुळे प्रथमच गड पाहिला कारण आलो तेव्हा रात्रच होती.सगळा हिरवा आसमंत धुक्याने भरुन गेला होता आणि शुद्ध हवेचा एक वेगळा वास आणि प्रसन्नता जाणवत होती. मला आठवतं मी आणि संगिता त्या धुकंमिश्रीत हिरवाईला पहिल्यांदी पाहताना वेड्यासारख्या इकडे-तिकडे भटकत होतो. सूर्यदेव आले की ते विरणार हे चांगलं ठाऊक होतं ना?

थोड्या वेळाने आम्ही कुणाच्याही सुचनांशिवाय पटापट सकाळची आवराआवरी केली. आमच्याबरोबर संगिताचे एक मित्र (मी त्यांचं नाव पूर्ण विसरले आहे) आम्हाला गाईड म्हणून आले होते ते एकदम पट्टीचे भटके होते त्यामुळे त्यांनी चहाची सोय केली आणि आम्ही बरोबर आणलेल्या सुक्या खाऊचा नाश्ता करुन लगेचच बॅगा बांधुन भटकंतीला तयार झालो.


हे माझे सुरुवातीचे ट्रेकचे दिवस म्हणजे कॅमेरा नाही आणि नोंदी ठेवायचा आळस असे असल्याने आता जितकं आठवतं तितक्यावरच विश्वास. पण त्यांनी आम्हाला सगळा गड फ़िरवला, माहिती दिली आणि सर्वात शेवटी आम्हाला विंचुकाटा हा साधारण गडाच्या सोंडेसारखा भाग आहे तिथे ते घेऊन गेले होते. इथे जाण्यासाठी गड आणि विंचुकाटा यामध्ये एक थोडा कठीण उतरायचा पल्ला आहे. तो मी तरी या गाईडच्या मदतीनेच उतरू शकले होते. पण आमच्या ग्रुपमधल्या जयेशला का माहित नाही अजिबात ते जमलं नाही..आणि मग तो तिथंच आमची वाट पाहात बसुन राहिला होता. परत जाताना ट्रेनमधुन हा विंचुकाटा दिसतो आणि आम्ही जिथे जयेश बसला होता त्या जागेला "जयेश पॉइन्ट" असं नाव देऊन त्याची बरेच महिने टरही उडवली होती.असो, पण या ठिकाणी वारा पीत थांबलो होतो तेव्हा तीन-चार पांढरपाठी गिधाडं जवळजवळ आमच्या डोक्यावरुन घिरट्या घालत गेल्याचं आठवतंय.

आधी आम्ही पोटपुजा विंचुकाट्यावर करणार होतो पण मग आमचाच एक मित्र तिथे एकटा होता त्यामुळे जास्त वेळ काट्यावर काढलाही नाही पण तिथुन वारा भन्नाट लागत होता आणि आजुबाजुचा हिरवा परिसर, शेती इतकं छान वाटत होतं ना?? शिवाय आम्हाला मुंबईला जायचं असल्यामुळे परतीचा प्रवास सुरु करणं भाग होतं. परत येताना आमच्या गाइडने मग आम्हाला गडाचे दरवाजे इ.ची सुद्धा माहिती दिली. एकंदरित मजा आली..पावसाळ्यात कर्जतच्या पुढं कुठंही गेलं तरी निसर्ग वेड लावतो. त्यात असा एखादा गड चढला की वरुन दिसणारं नयनरम्य दृष्य ती जादू मनःपटलावर कोरून ठेवते.

कॅमेरा तेव्हा नव्हताच त्यामुळे फ़ोटो नाहीत, ज्या व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे तिथे गेलो ती संगिताही नाही, पण आठवणी आहेत. मागे एकदा कुणीतरी लोहगडचे फ़ोटो मेलमध्ये पाठवले होते त्या अनामिकाचे आभार मानुन तेच इथे चिकटवतेय. आणि आठवणीतल्या या अशा जागी पुन्हा केव्हातरी नक्की जाईन असं मनातल्या मनात म्हणतेय...

Saturday, September 11, 2010

शोध माळढोकांचा...

काल एका प्रतिक्रियेमध्ये नाणजचा उल्लेख आला आणि त्यामुळे आपसूक लिहायला विषय मिळाला.कमवायला लागल्यानंतर ठरवलं होतं की आता एक एक करुन जंगलं पालथी घालायची पण प्रत्यक्षात मात्र सुट्टीचा राक्षस साहेबाच्या रुपाने पुढे उभा असायचा; त्यामुळे म्हणावं तसं फ़िरता आलं नाहीच.पण तरी जमलं तशी एक-दोन जवळची अभयारण्य मात्र करु शकले.


२००१ मध्ये केव्हातरी अल्पाने विषय काढला नाणजला गेलो तर येशील का? कोण कोण येऊ शकेल हे माहित नव्हतं पण ही बहुधा महिला-स्पेशल भटकंती असणार होती.दादरहून मी, अल्पा आणि संगिता एकत्र निघणार होतो आणि मुंबईहूनच अल्पाच्या ओळखीने गिरा आणि एक मॅडम (मी यांचं नाव विसरले आहे पण या पार्ले टिळकच्या माजी मुख्याध्यापिका होत्या) आणि पुण्याहून अल्पाची आणखी एक मैत्रीण (हीचंही नाव विसरले पण एकदम मस्त व्यक्ती होती ही...हीने एकटीने केव्हातरी पुण्याहून दिल्लीपर्यंत स्वतःची गाडी एकटी ड्राइव्ह करुन बराच प्रवास केला होता) म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर या गटात एकदम लिंबुटिंबु (वयाने आणि कतृत्वानेही) मीच होते...पण अर्थात जंगलात जाताना मी नेहमीच पाचवीचा गणवेष मनातल्या मनात घालते त्यामुळे सगळ्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकता येतं..

नमनालाच संगिता कटली कारण तिची मामी खूप सिरियस होती (त्या नंतर गेल्या) आणि मग मी अल्पाला दादरला भेटणार होते. वेळेवर पोचले तरी अल्पा मला अगदी शांत डोक्याने म्हणाली की, ’हे बघ सोलापूरला जायची आपण जी तिकिटं काढली आहेत ती गाडी दादरला थांबतच नाही, व्हि.टी.हून फ़ास्ट आहे आणि आता आपण व्हिटीला जाऊ शकत नाही’ ’का.............य??’ तिच्याकडे अर्थात एक छोटं सोल्युशन होतं.एकतर तिकीट रद्द करायलाही वेळ नव्हता (आणि तेव्हा बजेट हा मोठा इश्यु होताच) तर मागून येणार्‍या मला वाटतं ’सिद्धेश्वर एक्सप्रेस’मध्ये  सोलापुरचं साधं तिकीट काढून चढायचं, ही तिकीट दाखवायची आणि तिकीटचेकर काही कृपा करतो का ते पाहायचं...कारण मला वाटतं सिद्धेश्वरला फ़क्त आरक्षित तिकीट असेल तरच चढता येतं. मला सगळं नवीन होतं कारण त्याआधी मुंबईहून स्वतःच्या डोक्याने फ़क्त पुण्यालाच आगगाडीतून गेले होते..असो जे आरक्षण केलं होतं त्याचे डिटेल्स नीट न पाहायचा मुर्खपणाही स्वतःचाच होता म्हणा.

मग काय? चढलो तसेच आणि बाबा-पुता करुन कुठेतरी जागा मिळवली. सुरुवातीचा टि.सी. बरा होता. दोन मुली म्हणून जास्त काही त्रास दिला नाही पण तरी खाली झोपायचं म्हणजे कसरत होती...कुठेतरी मध्ये कुणी उतरणार हे पाहून त्यानं बर्थही मिळवुन दिला.नशीब. पण त्याची ड्युटी कुठेशी बदलली तेव्हा नवा भिडू, नवा राज...नवी पटवापटवी..कधी एकदाचं सोलापूर येतं असं झालं होतं...आणि एकदाचे दुसर्‍या दिवशी नवाच्या सुमारास उतरलो..ही चुकामुक प्रकरण फ़क्त आमचंच असल्याने बाकीच्या सार्‍या आधीच पोहोचल्या होत्या. त्यामुळे फ़क्त स्टेशनवर नाश्ता करुन तडक एक जीप भाड्याने करुन आम्ही नाणजच्या अभयारण्याच्या रस्त्याला लागलो. जीप केल्याचा खूप फ़ायदा झाला कारण एक म्हणजे स्टेशनहून हे ठिकाण तसं लांब आहेच त्यामुळे यायला जायला जीपचा उपयोग होतो आणि अभयारण्य जरी फ़ार मोठं नसलं तरीही तिथेही फ़िरायला स्वतःचं वाहन असलं की बरं पडतं.

आता इथे एक सुरुवातीलाच सांगायला हवं की माझ्याबरोबर असणार्‍या अनुभवी व्यक्तींनी इथे अभयारण्याच्या गेटपाशीच जे गेस्ट हाऊस आहे त्याचं आधी आरक्षण केलं होतं शिवाय जंगलात फ़िरायची स्पेशल परवानगीही काढून ठेवली होती. आमच्या काही दिवस आधीच बी.एन.एच.एस.ची एक रिसर्च टीम इथं येऊन गेली होती आणि त्यातली लोकं यांना ओळखत असल्याने ते सर्व कसं करायचं हे सारं यांनी समजुन घेतलं होतं; त्यामुळे जेवणाची व्यवस्था इ.चं टेंशन नव्हतं..शिवाय त्यांचा रेफ़रन्स दिल्याने आम्हाला एकदम रॉयल ट्रिटमेंट मिळाली हे सांगणे न लगे.

सोलापुरवरुन नाणजच्या पक्षी अभयारण्यात पोहोचायला नक्की किती वेळ लागला होता हे आता आठवत नाही पण पोचल्यावर लगेच माझ्या कच्च्या भूगोलाची जाणीव मला झाली. हे पहिलंच जंगल होतं ज्याला नक्की जंगल म्हणावं का? असं मला वाटलं. कारण हिरवाईच कुठे दिसत नव्हती...मग सगळी खुरटी, काट्यांवाली झाडं दाखवून पठारातली जंगल अशीच असतात, असं अर्थातच प्रशिक्षण झालं पण शेवटपर्यंत मला आपण जंगलात भटकतोय असं काही म्हणवत नव्हतं...असो.

गेस्ट हाऊस छान होतं, खोल्या ऐसपैस, बाथरुम स्वच्छ आणि हे सर्व मॅनेज करणारे काका मला वाटतं तेच फ़ॉरेस्ट ऑफ़िसरही होते...त्यांनी आमचं खूप छान स्वागत केलं.आम्ही जेवणासाठी भाज्या, तांदुळ,कांदे-बटाटे असं बरंच काही नेलं होतं; ते सर्व त्यांच्या स्वाधीन केलं आणि त्यांच्याबरोबर जेवणाच्या पैशाचं वगैरे ठरवलं. त्यानंतर जाईपर्यंत त्यांनी चविष्ट जेवणं तिन्ही-त्रिकाळ आम्हाला खायला घातलं..पुरुष खूप छान स्वयंपाक करतात असं आमचं सर्वांचं एकमत ठरलं...आणखी एक ऑफ़िसरही होते त्यांनी आम्हाला साधारण रस्ता, नियम, dos and don'ts इ.ची माहितीही दिली.

रस्ता म्हणजे काय सरधोपट एकच एक मुख्य मळलेला पण मोठा रस्ता होता. सरळ जात राहिलं की केव्हा तरी पार्काची हद्द संपे आणि मग गावतही चक्कर मारुन गोल फ़िरुन परत वळसा मारल्यासारखं बॅक टु गेस्ट हाउस करता येतं इतकं सोपं होतं..आमच्या गाडीचा ड्रायव्हरही छान होता.आम्हाला त्याने (बहुतेक थोडे पैसे जास्त घेऊन) परतताना थोडं सोलापुरही दाखवायचं ठरवलं होतं..पण आम्हाला मात्र पार्कात जायची घाई झाली होती..आता दुपारचं काही दिसणार नाही पण सकाळी लवकर मचाणावर गेलात तर माळढोक हमखास दिसेल बघा अशी पक्की खबर आमच्या फ़ॉरेस्ट ऑफ़िसर क्रमांक दोननी दिली होती..आम्हाला अर्थातच तेवढा धीर नव्हता..म्हणून जेऊन आम्ही निघालोच..निदान पार्क कसा आहे ते तरी बघू...वर म्हटल्याप्रमाणे सरळधोपट होतं..जी काही झाडं होती ती खुरटी आणि काटेरी प्रकारातली..बहुधा बाभळीच असाव्यात...रत्याने थोडं आत गेलं की एक छोटं आणि एक मोठं मचाण होतं...टेहेळणीला उत्तम होती..काही ठिकाणी पिवळसर झालेलं पण बरंच उंच वाढलेलं गवत होतं..माळढोकाला लपायला ही जागा चांगली होती असं वाटत होतं...एका बाजुला मात्र कुठल्या तरी सुबाभळीसारख्या परक्या आणि त्या मातीत एकदमच नकोशी झाडं मुद्दाम लावुन हिरवाई आणण्याचा (चुकीचा) प्रयत्न सुरु होता...सरकारी कारभार आणि काय?? मला वाटतं नंतर हे असे प्रयत्न बंद करण्यात आलेत पण पक्कं आठवत नाही...

दुपारची चक्कर म्हणजे एकदमच बेकार होती..काही म्हणजे काही दिसलं नाही...सरळ चहासाठी परत गेस्ट हाउसला आलो आणि मग रात्रीची जेवणाची वेळ होईस्तोवर आमच्यासारख्या एज्युकेटेड लोकांनी (म्हणजे मी आणि अल्पा) कसं साधं तिकीटही वाचलं नाही आणि रेल्वेला फ़सवुन वगैरे आलो याच्या चर्चा रंगल्या...एकदम बकरा झाला (किंवा बकर्‍या) झाला होता म्हणा नं...मी तर अल्पा सोडून सर्वांनाच प्रथम भेटत होते पण त्यादिवशी संध्याकाळी मात्र अगदी जन्मजन्मांतरीच्या मैत्रिणी असल्यासारखं कर्फ़्मटेबल झालो आणि नंतर अल्पा सोडली तर एकीलाही मी आजतागायत भेटले नाही ही वेगळी गोष्ट...

प्रवास आणि एकंदरित दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठायचंय याने रात्री लवकरच झोपलो आणि ठरल्याप्रमाणे लवकर म्हणजे साडे-सहा की सातलाच निघालो.मस्त सकाळच्या प्रसन्न वातावरणात काहीतरी दिसावं, काहीतरी म्हणण्यापेक्षा माळढोकच दिसावेत ही अर्थातच सर्वांचीच इच्छा होती.आमच्याबरोबर ते दुसरे फ़ॉरेस्ट गार्डपण आले होते कदाचित मुली-मुलीच आहेत म्हणून असेल किंवा जास्त लोक न येणार्‍या या जंगलात ते त्यांची जंगलाची जबाबदारी म्हणून जात असतील.पण असं कुणी सोबतीला असल्याचा माग काढायला फ़ायदाच होतो कारण आपण जंगलात नवखे असतो तर यांना अगदी चप्पा चप्पा माहित असतो...नमनाला एखाद-दुसरा पक्षी दिसत होता नाही असं नाही पण ज्याला शोधत होतो तो कुठे होता देव जाणे...


गाडी अगदी हळु जात होती..आणि एका ठिकाणी गवताच्या डोंगरात काहीतरी हलल्यासारखं वाटलं...गाडी थांबवुन सरळ बंद केली म्हणजे आवाजाने पळून जायला नको...तसेच स्तब्ध बसुन राहिलो आणि तीच ती राखाडी रंगाची मान आता नीट दिसली आणि मग तो ट्रेनचा कसाबसा केलेला प्रवास, काढलेली सुट्टी सार्‍याचं सोनं झालं....हाच तो मांस आणि अंड्याकरता बेसुमार शिकार झाल्यामुळे नाणजमध्ये कसाबसा जगवलेला "माळढोक",ग्रेट इंडियन बस्टर्ड उर्फ़ जी.आय.बी....तेव्हाही त्याचं अस्तित्व धोक्यात होतं किंबहुना म्हणून हे अभयारण्य अस्तित्वात आलं आणि अजुनही परिस्थिती तीच आहे असं ऐकतेय....दिसायला सुरुवातीला शहामृगासारखाच वाटणारा, काटकुळे पाय आणि डोक्यावरची काळसर टोपीसारखा भाग असा दिसणार आणि वजनदार असुनही उडू शकणारी ही पक्ष्यांची जात माणसांनी शिकार करुन आता जास्तीत जास्त हजारभर राहिले असतील..त्यात सध्या माळढोकात साधारण पंचवीसेक आहेत अशी माहिती आहे..त्यामुळे इथे आलं तरी ते हमखास दिसतीलच असं नाही...आम्हाला मात्र त्या मानाने लवकर दिसला असं आमच्याबरोबर असणार्‍या गार्डचं म्हणणं आहे...साधारण काळवीटांबरोबर ते असु शकतात अशीही टिप्पणी मिळाली...त्यादिवशी सकाळी त्याच गवतात काळवीटांचा एक मोठा कळपही चरत होता..कसला देखणा प्राणी आहे हा...एकदा दिसला की पाहातच राहावा...आणि आपली जाणीव होऊ दिली नाही तर तासनतास पाहू शकतो....तो त्याच्या राज्यात आणि आपण आपल्या...

पण आजचा आमचा लाडका कलावंत, माळढोक मात्र आम्हाला थोडीशीच झलक दाखवत होता त्यामुळे काळवीटांकडे तितकं लक्ष नव्हतं..पण आमच्या गार्डच्या सुचनांप्रमाणे आम्ही मागच्या बाजुने लपतछपत रस्त्यापासुन थोडं आत असलेल्या त्या दोनपैकी एका मचाणावर चढलो आणि मग काय लॉटरीच लागली, फ़क्त एकच साहेब माळढोक नव्हते तर एक फ़्यामिलीच होती...बच्चु तर इतका गोड होता की बास...आणि सूर्य उगवायला नुक्तीच सुरुवात झाली होती त्या उजेडात आणि मचाणावरुन मिळणार्‍या व्ह्युने दुर्बिणीची पण गरज नव्हती..फ़क्त त्यांची मर्जी आमच्यावर किती आहे त्यावर सारं अवलंबुन होतं...सक्काळ-सक्काळी गवताच्या बिया खायला म्हणून हे कुटुंब या गवताच्या डोंगरात आलं असावं...बराच वेळ त्यांचं खाणं आणि इथे-तिथे हळुवार फ़िरणं सुरु होतं आणि आम्ही मुग्धपणे ते पाहात होतं..आमच्यापैकी ज्यांच्याकडे कॅमेरे होते त्यांना अगदी आयुष्यभर जपुन ठेवावेत असे फ़ोटो मिळाले असणार...(माझ्याकडे अजुनही कॉपी नाहीये...Alpa do you read marathi by chance???) खाणं झालं तसं किंवा आता दिवसाची लगबग सुरु झाल्याची चाहुल लागल्यामुळे बहुतेक ते सारे उडून गेले आणि मग आम्ही भानावर आलो.

केवढातरी मोठा काळवीटांचा कळप तिथं चरत होता..दुर्बिणीतून त्यांनाही न्याहाळलं..बया,श्राइक,वेगवेगळ्या प्रकारचे लार्क आणि अन्य काही पक्ष्यांची लगबग सुरु झाली होती...थोड्या वेळाने आम्ही मचाणावरुन खाली आलो. पुन्हा रस्त्याने सरळ पुढं गेलो तर आणखी चांगले पक्षी दिसतील असं आमच्या गार्डचं मत होतं आणि त्यांनी आम्हाला इतकं सुरेख माळढोक दर्शन घडवल्यामुळे आम्ही आता त्याचं सगळं न ऐकतो तर नवलच...मग आणखी पुढे जाताना बरेच सुंदर पक्षी पाहिले जुनी लिस्ट आता माझ्याकडे असती तर मलाच आश्चर्य वाटल असतं की माळढोक सोडूनही काय काय पाहिलं ते...पण अर्थातच लक्षात राहणार होता तो माळढोकच...

सकाळची वेळ म्हणजे पक्षी-निरीक्षणासाठी तशीही अति-योग्य वेळ आहे..कारण पक्ष्यांना सारखं खायला लागतं, त्यामुळे रात्रभर उपाशी म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठ्ठं असतं..सकाळी-सकाळी बाहेर पडून काही पोटात घातल्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. असो..हे अर्थात सर्वांनाच माहित आहे...आमचं नशीब खरंच चांगलं होतं कारण गार्डनी म्हटल्याप्रमाण पार्काची हद्द संपल्यावरही आम्हाला एका ठिकाणी पुन्हा माळढोक दिसले, फ़क्त यावेळी ते चटकन उडून गेले...गावातही आता लोकांना माहित आहे यांना मारायचं नाही असं ते आम्हाला सांगत होते, खरं-खोटं गावकरीच जाणे.

मग पुन्हा गावाला वळसा घालुन आम्ही परत न्याहारीसाठी गेस्ट हाऊसला आलो...त्या काकांनी आधी म्हटल्याप्रमाणेच चविष्ट खाणं,चहा तयार ठेवला होता आणि आमचे प्रफ़ुल्लित चेहरे पाहून पैसा वसुल झाल्याचं त्यांनाही कळलं होतं..

त्यानंतर आमचं बुकिंग दुसर्‍या दिवसाचं संध्याकाळचं होतं बहुतेक म्हणून मग संध्याकाळी थोडं इतर एक-दोन ठिकाणी आमचा ड्रायव्हर आम्हाला घेउन गेला..एक त्याच्या ओळखीने कुठेतरी आतमध्ये सोलापुरी चादरींच दुकान की कारखाना होता तिथेही नेलं..खरेदी आटपली...दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एक मचाणाची चक्कर मारली पण बहुतेक तेव्हा माळढोक नव्हते....नंतर मग निघताना सोलापुर स्टेशनच्या भागातलं एक जुनं, सुंदर देऊळ आणि असा थोडा परिसर आमच्या ड्रायव्हरने (त्याच्या आग्रहाने) आम्हाला भटकवला आणि मग (यावेळी तिकीटाप्रमाणे) ट्रेनमध्ये बसून पुन्हा सॉफ़्टवेअरच्या जगात मी परतले...पण सोलापुरच्या माळढोकांची गुंगी बरेच महिने होती आणि आत्ता सारं आठवुन लिहितानाही मी मनाने तिथेच पोहोचले आहे असं वाटतेय...बरीच ठिकाणं अशी असतात की तिथे आपल्याला पुन्हा-पुन्हा जावसं वाटतं पण ते शक्य होत नाही. नाणज असंच माझ्या लिस्टवर अजुनही आहे...पाहुया पुन्हा केव्हा योग येतो ते..



फ़ोटो सहकार्य...डॉ. संगिता धानुका आणि GIB गुगलबाबांच्या सहकार्याने

Friday, June 11, 2010

शिवडीचे रोहित


मला आठवतं पक्षीनिरिक्षणाचा छंद लागल्यापासुन रोहित उर्फ़ फ़्लेमिंगोचं मला जबरदस्त आकर्षण होतं..त्याचवेळी वृत्तपत्रात वाचुन मग एका वडाळ्याला राहणार्‍या मित्राबरोबर २००० च्या फ़ेब्रुवारीत जाऊन हजारोंनी फ़्लेमिंगो पाहुनही आले होते..अर्थात त्यावेळी कॅमेरा नव्हता पण त्याचं शल्यही नव्हतं. नंतर लगेचच साधारण सप्टेंबरमध्ये वगैरे वसई-नायगावच्या मध्येही ते दिसले हजारोंनी नाही पण दहाएक असावेत..नंतर देश सोडेपर्यंत प्रत्येक वर्षी ते तिथे दिसायचे..माझं आणि त्यांचं भेटीगाठीचं काही नातं असावं असे....मग २००५ मध्ये भारतात आले तेव्हा तर आईच्या त्यावेळच्या वसईच्या घराच्या मागेच वीसेक फ़्लेमिंगो काही दिवसांसाठी होते त्यांनाही खूप जवळून न्याहाळता आलं...


तसा हा पक्षी शांतता आणि समुहप्रिय. शांतपणे खाडीतल्या ओल्या मातीत आपली वक्र चोच बुडवून चमच्याप्रमाणे ढवळत राहतील नाहीतर चार-पाच एकदम उडतील..उडतानाचं दृष्य म्हणजे काय वर्णावं...त्यांच्या म्हणजे लेसर फ़्लेमिंगोच्या पंखातील लाल ठिपका मन मोहुन घेतो. आपण योग्य अंतर राखुन दुर्बिणीतून पाहात राहिलो तर तासनतास ते त्यांच्या राज्यात राहतील..

आता यावेळी मे महिन्यात कुठे फ़्लेमिंगो दिसतील असं म्हटलं तर मी ते उडवुन लावलं असतं पण राकेशने आणलेली माहिती अगदी पक्की असते. शिवडीला फ़्लेमिंगो आहेत तू भांडूपला असशील तेव्हा जाऊया असं तो म्हणाला तेव्हा माझे डोळे चमकले. मग काय एका गुरुवारी मुहुर्त काढलाच.

दोघंच दादरहुन टॅक्सी करुन गेलो आणि दुपारी दोनच्या टळटळीत उन्हात चांगले प्रहरभर तरी फ़्लेमिंगो पाहात बसलो. (खरं तर उभे होतो. तिथे बसायला जागाच नाहीये) निदान हजारभर असतील. त्यातले काही त्यातल्या त्यात जवळ होते; त्यांना पाहण्यासाठी तिथेच एका मालवाहु जहाजावर कसलं काम सुरु होतं त्यावर चढुन थोडे जवळुन फ़ोटो काढले आणि बराच वेळ निरिक्षणही केलं. दुपारच ऊन जाणवतही नव्हतं इतकी सावली त्यांच्या त्या लाल-गुलाबी पंखात होती. शिवडीच्या त्या खाडीवर रोहितांबरोबर इतरही पाणपक्षी पाहता येतात. आम्हाला ग्रीन हेरॉन, व्हाईट आयबीस, प्लोव्हर असे इतरही पाणपक्षी दिसले पण तरी त्या दिवशीचे स्टार मेहमान शिवडीचे रोहितच होते....

त्यांची ही फ़ोटोझलक.....



Tuesday, May 25, 2010

पार्कवाटा

चार आठवड्याच्या छोट्याशा मायदेश भेटीत नॅशनल पार्क हे टॉप लिस्टवर होतं पण कडाक्याचं ऊन आणि सोबत कुणी नसल्यामुळे प्रत्यक्ष जायला शेवटचा रविवार उजाडला. अर्थात SGNP ला जायला मी कधीही तयार असते.
साधारण साडे-सातला गेटवर राकेश आणि अर्चित भेटणार होते आणि आयत्यावेळी अर्चितचा मित्र अभिषेकही येणार असल्याचं कळलं.अर्थात त्याच्यासाठी न थांबता अर्चितने गाडी वेळेत आत घेतली हे बरं झालं.आता फ़क्त नेहमीसारखं तडक कान्हेरी की आणखी कुठे हे ठरायचं होतं. पण घाईगडबडीत आखलेल्या दौर्‍यात हा प्रश्न त्या दिवसाचं भविष्य जसा दिवस पुढे जाईल तसंच ठरतं.गप्पा मारत मारत गाडी पुढे जात होती आणि आम्ही जुन्या भटकंतीच्या आठवणीत रमत होतो.इथेच कुठे एका मचाणावर जायचो असं म्हणायला आणि गाडी कल्वेट नं. ६५ कडे पोहोचायला एकच गाठ पडली. मग काय आजचा पहिला डेरा तिथेच टाकायचं तिघानुमते ठरलंच.

डावीकडून आत जाणारी पार्कातल्या असंख्य "चलो, अंदर जाते है" कॅटेगरीतल्या अनेक पार्कवाटांपैकी ही वाट तशी बरीच मोठी आहे.सरळ फ़ॉलो केलीत तर मागुन मोराच्या माचीवरुन सरळ हायेस्ट पॉइन्टलाही जाता येतं असं म्हणतात. अर्थात त्याची शहानिशा करण्यासाठी आज तितका वेळ नव्हता हेही खरं.
आत येईस्तो जंगल बरंच शांत वाटत होतं. कदाचित उकाड्यानेही पाखरं चिडिचिप असावीत असं वाटुन काही दिसेल या अपेक्षेत आम्हीही नव्हतो.तरी आज नशीब भलतंच जोरावर होतं. गेल्या गेल्याच रॅकेट टेल्ड ड्रोंगोची (पल्लवपुच्छ कोतवाल हे चितमपल्लींच्या पुस्तकातलं त्याचं मराठी नाव छानच आहे नाही?) एक जोडी समोरच्याच झाडांवर पाठशिवणीचा (उर्फ़ पटवापटवीचा) खेळ खेळत होती. त्यांना दुर्बिणीतुन नीट न्याहाळतोय तोच डावीकडे खसखस ऐकु आली आणि झाडांवरतीही बरीच हालचालही दिसली. Red Whiskered Bulbul लगबगीत होते. दूरवर Indian Cuckoo ची सादही सुस्पष्ट ऐकु येत होती.

पुढे डावीकडे वाटेबरोबर वळलो तशी आमच्या आठवणीतलं मचाण तसंच उभं होतं आणि समोरच पाण्याचा छोटासा साठा पुर्वी या डुगडुगत्या मचाणावर चढल्याचं राकेशला आठवण करुन देत होता. आता बहुधा इथे नवं मचाण येत असावं. जवळच एक कोरा सांगाडा कामगारांची वाट पाहात झोपला होता. इथे बार्बेटचा आवाजही येत होता आणि थोड्याच वेळात त्याचेही जवळून दर्शन झाले.
थोडा वेळ ककुचा आवाज ऐकुन मग पुन्हा मागे वळून थोडंवर जाऊया असं ठरलं पण अर्चितचा जीव अभिषेकसाठी कासावीस झाल्याने तो एकटा परत गेटवर जाय़ला निघाला आणि मी व राकेश थोडं पुढे जाऊन परत यायचं ठरलं. तो निघतोय तितक्यातच राकेशने आमच्या सगळ्यात लाडक्या पक्ष्याच्या मादीला पाहिलं आणि अर्चितलाही पाय वळवावे लागले.Paradise Flycatcher ची मादी साध्या डोळ्यांना दिसेल अशी तिरप्या झाडावर बसली होती. तुम्ही आता नराला शोधा असं सांगुन अर्चित पळाला त्यामुळे आम्ही थोडं चढायला सुरुवात केली.
खरंच तो देखणा नर दिसला तर बरं होईल अशा विचारात होते तोच समोरच्या बाजुने डावीकडून उजवीकडे पळापळ झाली आणि दोन बार्किंग डिअर पळताना ओझरते दिसले. म्हणजे मघाशी त्यांचीच खसखस झाली होती वाटतं?
थोड्या वेळाने पुन्हा ख्यॅक ख्यॅक आवाजाने सतर्क झालो पण त्या बार्किंग डियरने आपल्या मित्रांच्या पाठी जायच्या ऐवजी रेंगाळणं पसंत केलं.तोवर हनुमान लंगुरही अलार्म कॉल देत होते त्यामुळेही ते जागरुक झालं असावं. मात्र आत आत जाताना सुकलेल्या झाडांमुळे निर्माण झालेल्या पोकळ्यांमुळे मात्र आम्ही त्या छोट्या पिलाला स्पष्ट पाहू शकलो.
अजुन थोडं वर जाताना आणखी एक फ़िकट भगव्या रंगाची पक्ष्यांची जोडी डावीकडे उडाली पण ते काय असावं कळणं शक्य नव्हतं. आता आम्हीही बर्‍यापैकी वर आलो होतो. आमच्यातली उरलेली जोडीही आमच्यापर्यंत पोहोचली नव्हती म्हणून आता आणखी वर जायच्या ऐवजी खाली उतरायचं ठरवलं.
खाली उतरताना मटका लागल्याप्रमाणे पक्षीगण दिसले. राखी धनेशाची जोडी उडून कान्हेरीच्या जवळ जात होती.तर हाकेच्या अंतरावर गोल्ड फ़्लेम्ड आणि आणखी एक वुडपेकर झाडाला फ़ेर्‍या मारत होते.हिरवेकंच क्लोरोप्सिस राकेश असला की अपॉइंटमेंट घेतल्यागत भेटतात आणि वाटेबरोबर सोबत करतात तसंच आजही झालं. आणि सूर्यदेव प्रसन्न झाल्याने सुर्यप्क्ष्यांची लगबगही न्याहाळता येत होती. शिक्राही कुणा पक्ष्याच्या पाठी लागत आमच्या डोक्यावरुन उडून गेला.

अर्ध्या वाटेवर अर्चित-अभिषेक भेटल्याने पुन्हा एकदा थोडं वर-खाली केलं यावेळी पुन्हा धनेशाची जोडी आणि Crested Serpent Eagle चा चित्कार कानावर आला. पुन्हा एकदा गाडीने कान्हेरीच्या पायथ्याशी गेलो पण या पार्कवाटेवर इतकं पाहुन झालं होतं की आज गुंफ़ांपर्यंत जायचं कुणीच नाव काढलं नाही आणि एकमेकांनी आणलेला खाऊ गट्टम करता करता पार्कवाटेचंच कौतुक परतीच्या वाटेवर होत राहिलं.

Tuesday, March 30, 2010

रानभूल...

’रानभूल’ हा शब्द आजवर अनेक जंगलाबद्दल लिहिलेल्या बर्‍याच खर्‍या आणि कल्पित कथांमध्ये भेटलाय..पण त्याआधी भेटलंय ते त्यातलं गडद, किर्र करणार जंगल....त्यामुळे आपण हा प्रकार फ़क्त पुस्तकातच अनुभवणार किंवा खरं तर असं काही नसेल अशा काही भाबड्या समजुतीत असतानाच एका मान्सुनमध्ये बी.एन.एच.एस.चा सिलोंडा ट्रेल जाहिर झाला...बी.एन.एच.एस.वाले प्रत्येक पावसाळ्यात एकदा तरी सिलोंड्यात घेऊन जातात त्यामुळे इतर वेळी वनखात्याच्या परवानगीशिवाय न जाणार्‍या विभागात जायला मिळतं शिवाय पावसाळ्यात सिलोंडयातले तिन्ही ओढे मस्त वाहात असतात, सगळीकडे गर्द हिरवाई पसरली असते आणि एकुण काय आपण मुंबईसारख्या एका मोठ्या शहरात उंडारतोय याचा नामोनिशान नसतो...
आतापर्यंत बी.एन.एच.एस.चे जवळजवळ सगळे गाईड निदान चेहर्‍याने तरी माहित झालेत किंवा थोडी मस्ती करता करताही सिरियसली बर्डिंग करणारा आमचा ग्रुप त्यांना माहित झाला आहे..काही का असेना ट्रेलच्या वेळी थोडी मुभा मिळते...म्हणजे थोडं इथे-तिथे उंडारलं तरी चालतं त्यावेळची ही गोष्ट आहे.....
आता आपण सिलोंड्यात काय नेहमीच येतो या मस्तीतच त्या दिवशी ओढा नं.२ पार केल्यावर जयेशच्या डोक्यात दुर्बुद्धी सुचली...(असले उद्योग करून गोत्यात आणायचं घाऊक कंत्राट त्याच्याचकडे आहे म्हणा...) "अरे आजचा ग्रुप (म्हणजे सगळा मोठा गोतावळा) जरा जास्त गडबड करणारा आहे...चलो जंगल में जाते है"...आम्ही काय? जंगल में म्हणजे किस झाड की पत्ती सारखं चला चला करुन बाकीच्या सगळ्यांना पुढे जायला दिलं आणि घुसलो उजवीकडे...

थोडा चढ होता पण शांतता होती...खरं तर बरं वाटत होतं..पावसाळ्यामुळे असेल बहुतेक पण पक्षीगण दिसले नाहीतच फ़ार पण हिरव्यागार जंगलातून मध्ये येणार्‍या वेलींना बाजुला करत कसे पुढे जात होतो कळतच नव्हतं...मध्ये पुन्हा एकदा ओढा लागला...आता जरा जरा भूकही लागली होती म्हणून पोटोबा केली..त्यादिवशी राकेशच्या आईने जवळजवळ सगळ्यांसाठीच मेथीचे ठेपले पाठवले होते त्यामुळे पहिले तर सगळे मुंगळ्यासारखे त्याच्याच डब्याच्या मागे धावले..नंतर मग इतरांनी आणलेल्या केळा वेफ़र्स, सॅंडविच, कुठे फ़ळ अशी सगळी भेळ पोटात गेल्यावर पुन्हा एकदा थोडं पुढे जाऊया असं ठरलं...मुख्य कारण एकतरी चांगलं सायटिंग झालं पाहिजे हे होतं आणि असं जेव्हा बर्‍याच परिघात पक्षी दिसत नाहीत तेव्हा काही वेळा एखाद्या ठिकाणी दोन-चार वेगवेगळ्या जातीचे पक्षी एकदम दिसायची शक्यता असते त्याला मिक्स हंटिंग पार्टी म्हणतात. तसलं काही असेल असं गाजर (अर्थातच जयेशनेच) दाखवल्यामुळे आगे बढोचा नारा होता......ती मिक्स हंटिंग पार्टी असायची तिथे असो पण आम्हाला काही दिसत नव्हती आणि अचानक कुणीतरी घड्याळ पाहायचा शाणपणा केल्यामुळे आता परत फ़िरायला हवंची जाणीव झाली...
परत ठिक आहे पण म्हणजे कुठे?? डावीकडे, ऊजवीकडे की सरळ मागे?? या मिक्स हंटिंगच्या शोधात कुणालाही दिशेची जाणीव होत नव्हती...पहिले उजवीकडे जाऊन पाहिलं तर वेलींची गर्दी वाढतच होती..शिवाय चढ आल्यासारखं वाटलं...नाही नाही चुकलंय...मग डावीकडे गेलं तर तीच आधीची झाडं आणि त्याला लगडलेल्या वेली सगळं सारखंच....चकवा...रानभूल...मारुती चित्तमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर आठवायच्या मनस्थितीत नसतानाही आठवले आणि सुनीलला म्हटलं अरे आपल्याला जरा भूलल्यासारखं झालंय आणि आता निदान अजून आत आत नको जाऊया..पावसाळ्यात काळवंडलेल्या आभाळामूळे अंधार लवकर पडतो आणि सिलोंड्यात वगैरे तर तो लगेच जाणवतो त्यामुळे आता अडकलो तर काय?? सगळीच जण थोडी थोडी घाबरली होती पण तरी एकमेका सहाय करुच्या तत्वाने शेवटी कसाबसा तो दुसर्‍यांदा मिळालेला ओढा मिळाला..मग तो पार केल्यावर बाकीच्या झाडं, तुटलेले ओंडके असं काहीबाही आठवून सिलोंडाच्या मुख्य ओढ्यावरुन एकदाचे ट्रेलवर आलो..
मूळचा ग्रुप कधीच घरी गेला असावा..सारं सिलोंडा चिडीचूप होतं..
एकदा रस्ता दिसल्यावर सगळीच जण पुनश्चः बडबड करायला लागले पण याआधीची दोनेक तासांची रानभूल एक वेगळाच थरारक अनुभव देऊन गेली आणि तेही चक्क मुंबईच्या नॅशनल पार्कात...

फ़ोटो..साभार डॉ.संगिता धानुका