माझ्या पक्षीनिरिक्षणकालाचा "हनिमुन पिरियड" म्हणता येईल त्या दिवसांतली ही ट्रिप आहे. जयेशचं गाव मालवण आणि तिथला परिसर, दिसणारं पक्षीजीवन याबद्दल त्याला चांगली माहिती होती आणि चांगली गोष्ट ही, की आमचा सगळा ग्रुप तिथे घेऊन जावा, ही कल्पनाही त्यानेच आमच्या मागे लागुन मार्गी लावली. योग्यवेळी योग्य सहकारी मिळाले की एखादं प्रोजेक्ट जसं हमखास यशस्वी होतं तसंच या मालवण दौर्याचं झालं.
आईने माझी एक छोटी डायरी तिच्याकडे राहिली होती तिच्यामध्ये या मालवण फ़ेरीची सगळी बर्ड-लिस्ट वाचताना मी स्वतःलाच नशीबवान समजते की मला अशा प्रकारेही फ़िरता आलं. त्या दौर्याची या नोंदीप्रमाणे आठवेल तशी ही कहाणी.
राखी धनेश |
हळद्या |
आम्ही मार्चमध्ये हा दौरा आखला होता आणि अगदी फ़ुल हाउस म्हणजे साधारण १२-१३ जण मिनी बसने मुंबईहुन मालवणला निघालो होतो. यावेळी आमच्याबरोबर सर्वात लहान भटक्या होता तो म्हणजे "केदार", त्याने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. बाकी आम्ही सगळे कर्तेसवरते होतो. यात सगळेच आमच्या मूळ ग्रुपमधले नव्हते पण काहींनी आपले पक्षीनिरीक्षणाची आवड असणारे मित्र-मैत्रीणी आणल्यामुळे सर्व मिळून १२-१३ झालो होतो. सर्वानुमते अंधेरी पुर्वेकडे भेटून निघायचं ठरलं त्याप्रमाणे बसही तिथंच बोलावली होती. बर्याच सकाळी निघालो होतो. तिथे तीन दिवसांचा मुक्काम होता त्याप्रमाणे सामानही जास्त होतं. सुनीलला यायला जमणार नव्हतं पण तरी आम्हाला निरोप द्यायला तो खास अंधेरीला आल्याचं मला अजुनही आठवतं त्याचा पडलेला चेहरा आम्हाला दिसु नये याचा कसोशीने प्रयत्न चालला होता पण अर्थात आम्ही त्याला जास्त खिजवले नाही. अंधेरीहून निघाल्यावर आम्हाला फ़क्त संगिता आणि तिची मैत्रीण सुगंधा यांना दादरहून घ्यायचे होते की मग आम्ही सुसाट. बसमध्ये अक्षरशः पुन्हा कॉलेजजीवन जगल्यासारखी तुफ़ान मस्ती, गाणी, हैदोस घालुन आम्ही नक्की पक्षी पाहायला चाललोत का असं काही वातावरण निर्माण झालं.पण गाडीने कोकणातल्या लाल मातीला उधळायला सुरुवात केली तसा आमच्यातल्या पक्षीनिरीक्षक जागा झाला.
त्याचं कारण मुळात हे होतं की ज्या पक्ष्यांना मुंबईच्या नॅशनल पार्कात शोध शोध शोधावं लागायचं ते अगदी आमच्यासमोर हाय हॅलो करायला दिसत होते. त्यांना न्याहाळायला दुर्बिणीची पण गरज पडत नव्हती. आजुबाजुची शेतं, पुलांवरुन बस जाताना दिसलेली नदीची पात्रं अशा अनेक ठिकाणी आम्हाला सुरुवात व्हायच्या आधीच हा मटका लागल्यासारखं झालं होतं. राष्ट्रीय पक्ष्यापासुन सुरुवात झाली ती अगदी पांढर्या पोटाचा खंड्या आणि चक्क धनेशाच्या दोन जोड्याही(त्यातही मलाबार पाईड हॉर्नबिल) आम्हाला सहजगत्या दिसल्या. सगळीजण जाम उत्तेजित झाले. मी आत्ता ती बर्डलिस्ट वाचतानाही तिथे पोचल्यासारखं होतंय.
खंड्या |
पहिल्या प्लानप्रमाणे आम्ही जय़ेशच्याच घरी राहणार होतो म्हणजे राहिलोही होतो. पण दुसर्या दिवशी तिथे त्यांनी घराचा काही भाग कुणाला वापरायला दिला होता त्यांना आमचं येणं कितपत रुचतंय याचा अंदाज न आल्यामुळे तिथेच जवळ एका घर कम खानावळीत राहिलो. तिथे राहण्याचा फ़ायदा म्हणजे अस्सल मालवणी घरगुती जेवण मिळालं आणि घरकाम करायचा त्रासही वाचला.
स्वर्गीय नर्तक |
पाइड खंड्या |
Shrike |
पण त्याबद्द्ल नंतर. आज आठवणी आहेत त्या मालवणचं प्रथम दर्शन, तिथली ताजी हवा, रात्रीचं सामिष जेवण, सोलकढी आणि या सर्वांवर कडी करणारे ते पंचवीसच्या वर दिसलेले वेगवेगळ्या जातींचे पक्षी...
2 comments:
अपर्णा सहि गं ! माझोच गाव गो चेडवा, मालवण, तारकर्ली, देवबाग!!
तुम्ही लोक वेंगुर्ल्याला गेला असता तर वेंगुर्ला सी रॉक्सवर तुम्हाला बरेच सागरी पक्षी दिसले असते!
दीपक, अरे तुझं गाव म्हणजे तुझ्याबरोबर आता जावुक होवा...:)
त्यावेळी जसं ग्रुपने प्लान केलं होतं तसं गेलो रे....पण धमाल आली होती आणि मुख्य खूप पक्षी दिसले होते....
Post a Comment