काल एका प्रतिक्रियेमध्ये नाणजचा उल्लेख आला आणि त्यामुळे आपसूक लिहायला विषय मिळाला.कमवायला लागल्यानंतर ठरवलं होतं की आता एक एक करुन जंगलं पालथी घालायची पण प्रत्यक्षात मात्र सुट्टीचा राक्षस साहेबाच्या रुपाने पुढे उभा असायचा; त्यामुळे म्हणावं तसं फ़िरता आलं नाहीच.पण तरी जमलं तशी एक-दोन जवळची अभयारण्य मात्र करु शकले.
२००१ मध्ये केव्हातरी अल्पाने विषय काढला नाणजला गेलो तर येशील का? कोण कोण येऊ शकेल हे माहित नव्हतं पण ही बहुधा महिला-स्पेशल भटकंती असणार होती.दादरहून मी, अल्पा आणि संगिता एकत्र निघणार होतो आणि मुंबईहूनच अल्पाच्या ओळखीने गिरा आणि एक मॅडम (मी यांचं नाव विसरले आहे पण या पार्ले टिळकच्या माजी मुख्याध्यापिका होत्या) आणि पुण्याहून अल्पाची आणखी एक मैत्रीण (हीचंही नाव विसरले पण एकदम मस्त व्यक्ती होती ही...हीने एकटीने केव्हातरी पुण्याहून दिल्लीपर्यंत स्वतःची गाडी एकटी ड्राइव्ह करुन बराच प्रवास केला होता) म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर या गटात एकदम लिंबुटिंबु (वयाने आणि कतृत्वानेही) मीच होते...पण अर्थात जंगलात जाताना मी नेहमीच पाचवीचा गणवेष मनातल्या मनात घालते त्यामुळे सगळ्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकता येतं..
नमनालाच संगिता कटली कारण तिची मामी खूप सिरियस होती (त्या नंतर गेल्या) आणि मग मी अल्पाला दादरला भेटणार होते. वेळेवर पोचले तरी अल्पा मला अगदी शांत डोक्याने म्हणाली की, ’हे बघ सोलापूरला जायची आपण जी तिकिटं काढली आहेत ती गाडी दादरला थांबतच नाही, व्हि.टी.हून फ़ास्ट आहे आणि आता आपण व्हिटीला जाऊ शकत नाही’ ’का.............य??’ तिच्याकडे अर्थात एक छोटं सोल्युशन होतं.एकतर तिकीट रद्द करायलाही वेळ नव्हता (आणि तेव्हा बजेट हा मोठा इश्यु होताच) तर मागून येणार्या मला वाटतं ’सिद्धेश्वर एक्सप्रेस’मध्ये सोलापुरचं साधं तिकीट काढून चढायचं, ही तिकीट दाखवायची आणि तिकीटचेकर काही कृपा करतो का ते पाहायचं...कारण मला वाटतं सिद्धेश्वरला फ़क्त आरक्षित तिकीट असेल तरच चढता येतं. मला सगळं नवीन होतं कारण त्याआधी मुंबईहून स्वतःच्या डोक्याने फ़क्त पुण्यालाच आगगाडीतून गेले होते..असो जे आरक्षण केलं होतं त्याचे डिटेल्स नीट न पाहायचा मुर्खपणाही स्वतःचाच होता म्हणा.
मग काय? चढलो तसेच आणि बाबा-पुता करुन कुठेतरी जागा मिळवली. सुरुवातीचा टि.सी. बरा होता. दोन मुली म्हणून जास्त काही त्रास दिला नाही पण तरी खाली झोपायचं म्हणजे कसरत होती...कुठेतरी मध्ये कुणी उतरणार हे पाहून त्यानं बर्थही मिळवुन दिला.नशीब. पण त्याची ड्युटी कुठेशी बदलली तेव्हा नवा भिडू, नवा राज...नवी पटवापटवी..कधी एकदाचं सोलापूर येतं असं झालं होतं...आणि एकदाचे दुसर्या दिवशी नवाच्या सुमारास उतरलो..ही चुकामुक प्रकरण फ़क्त आमचंच असल्याने बाकीच्या सार्या आधीच पोहोचल्या होत्या. त्यामुळे फ़क्त स्टेशनवर नाश्ता करुन तडक एक जीप भाड्याने करुन आम्ही नाणजच्या अभयारण्याच्या रस्त्याला लागलो. जीप केल्याचा खूप फ़ायदा झाला कारण एक म्हणजे स्टेशनहून हे ठिकाण तसं लांब आहेच त्यामुळे यायला जायला जीपचा उपयोग होतो आणि अभयारण्य जरी फ़ार मोठं नसलं तरीही तिथेही फ़िरायला स्वतःचं वाहन असलं की बरं पडतं.
आता इथे एक सुरुवातीलाच सांगायला हवं की माझ्याबरोबर असणार्या अनुभवी व्यक्तींनी इथे अभयारण्याच्या गेटपाशीच जे गेस्ट हाऊस आहे त्याचं आधी आरक्षण केलं होतं शिवाय जंगलात फ़िरायची स्पेशल परवानगीही काढून ठेवली होती. आमच्या काही दिवस आधीच बी.एन.एच.एस.ची एक रिसर्च टीम इथं येऊन गेली होती आणि त्यातली लोकं यांना ओळखत असल्याने ते सर्व कसं करायचं हे सारं यांनी समजुन घेतलं होतं; त्यामुळे जेवणाची व्यवस्था इ.चं टेंशन नव्हतं..शिवाय त्यांचा रेफ़रन्स दिल्याने आम्हाला एकदम रॉयल ट्रिटमेंट मिळाली हे सांगणे न लगे.
सोलापुरवरुन नाणजच्या पक्षी अभयारण्यात पोहोचायला नक्की किती वेळ लागला होता हे आता आठवत नाही पण पोचल्यावर लगेच माझ्या कच्च्या भूगोलाची जाणीव मला झाली. हे पहिलंच जंगल होतं ज्याला नक्की जंगल म्हणावं का? असं मला वाटलं. कारण हिरवाईच कुठे दिसत नव्हती...मग सगळी खुरटी, काट्यांवाली झाडं दाखवून पठारातली जंगल अशीच असतात, असं अर्थातच प्रशिक्षण झालं पण शेवटपर्यंत मला आपण जंगलात भटकतोय असं काही म्हणवत नव्हतं...असो.
गेस्ट हाऊस छान होतं, खोल्या ऐसपैस, बाथरुम स्वच्छ आणि हे सर्व मॅनेज करणारे काका मला वाटतं तेच फ़ॉरेस्ट ऑफ़िसरही होते...त्यांनी आमचं खूप छान स्वागत केलं.आम्ही जेवणासाठी भाज्या, तांदुळ,कांदे-बटाटे असं बरंच काही नेलं होतं; ते सर्व त्यांच्या स्वाधीन केलं आणि त्यांच्याबरोबर जेवणाच्या पैशाचं वगैरे ठरवलं. त्यानंतर जाईपर्यंत त्यांनी चविष्ट जेवणं तिन्ही-त्रिकाळ आम्हाला खायला घातलं..पुरुष खूप छान स्वयंपाक करतात असं आमचं सर्वांचं एकमत ठरलं...आणखी एक ऑफ़िसरही होते त्यांनी आम्हाला साधारण रस्ता, नियम, dos and don'ts इ.ची माहितीही दिली.
रस्ता म्हणजे काय सरधोपट एकच एक मुख्य मळलेला पण मोठा रस्ता होता. सरळ जात राहिलं की केव्हा तरी पार्काची हद्द संपे आणि मग गावतही चक्कर मारुन गोल फ़िरुन परत वळसा मारल्यासारखं बॅक टु गेस्ट हाउस करता येतं इतकं सोपं होतं..आमच्या गाडीचा ड्रायव्हरही छान होता.आम्हाला त्याने (बहुतेक थोडे पैसे जास्त घेऊन) परतताना थोडं सोलापुरही दाखवायचं ठरवलं होतं..पण आम्हाला मात्र पार्कात जायची घाई झाली होती..आता दुपारचं काही दिसणार नाही पण सकाळी लवकर मचाणावर गेलात तर माळढोक हमखास दिसेल बघा अशी पक्की खबर आमच्या फ़ॉरेस्ट ऑफ़िसर क्रमांक दोननी दिली होती..आम्हाला अर्थातच तेवढा धीर नव्हता..म्हणून जेऊन आम्ही निघालोच..निदान पार्क कसा आहे ते तरी बघू...वर म्हटल्याप्रमाणे सरळधोपट होतं..जी काही झाडं होती ती खुरटी आणि काटेरी प्रकारातली..बहुधा बाभळीच असाव्यात...रत्याने थोडं आत गेलं की एक छोटं आणि एक मोठं मचाण होतं...टेहेळणीला उत्तम होती..काही ठिकाणी पिवळसर झालेलं पण बरंच उंच वाढलेलं गवत होतं..माळढोकाला लपायला ही जागा चांगली होती असं वाटत होतं...एका बाजुला मात्र कुठल्या तरी सुबाभळीसारख्या परक्या आणि त्या मातीत एकदमच नकोशी झाडं मुद्दाम लावुन हिरवाई आणण्याचा (चुकीचा) प्रयत्न सुरु होता...सरकारी कारभार आणि काय?? मला वाटतं नंतर हे असे प्रयत्न बंद करण्यात आलेत पण पक्कं आठवत नाही...
दुपारची चक्कर म्हणजे एकदमच बेकार होती..काही म्हणजे काही दिसलं नाही...सरळ चहासाठी परत गेस्ट हाउसला आलो आणि मग रात्रीची जेवणाची वेळ होईस्तोवर आमच्यासारख्या एज्युकेटेड लोकांनी (म्हणजे मी आणि अल्पा) कसं साधं तिकीटही वाचलं नाही आणि रेल्वेला फ़सवुन वगैरे आलो याच्या चर्चा रंगल्या...एकदम बकरा झाला (किंवा बकर्या) झाला होता म्हणा नं...मी तर अल्पा सोडून सर्वांनाच प्रथम भेटत होते पण त्यादिवशी संध्याकाळी मात्र अगदी जन्मजन्मांतरीच्या मैत्रिणी असल्यासारखं कर्फ़्मटेबल झालो आणि नंतर अल्पा सोडली तर एकीलाही मी आजतागायत भेटले नाही ही वेगळी गोष्ट...
प्रवास आणि एकंदरित दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठायचंय याने रात्री लवकरच झोपलो आणि ठरल्याप्रमाणे लवकर म्हणजे साडे-सहा की सातलाच निघालो.मस्त सकाळच्या प्रसन्न वातावरणात काहीतरी दिसावं, काहीतरी म्हणण्यापेक्षा माळढोकच दिसावेत ही अर्थातच सर्वांचीच इच्छा होती.आमच्याबरोबर ते दुसरे फ़ॉरेस्ट गार्डपण आले होते कदाचित मुली-मुलीच आहेत म्हणून असेल किंवा जास्त लोक न येणार्या या जंगलात ते त्यांची जंगलाची जबाबदारी म्हणून जात असतील.पण असं कुणी सोबतीला असल्याचा माग काढायला फ़ायदाच होतो कारण आपण जंगलात नवखे असतो तर यांना अगदी चप्पा चप्पा माहित असतो...नमनाला एखाद-दुसरा पक्षी दिसत होता नाही असं नाही पण ज्याला शोधत होतो तो कुठे होता देव जाणे...
गाडी अगदी हळु जात होती..आणि एका ठिकाणी गवताच्या डोंगरात काहीतरी हलल्यासारखं वाटलं...गाडी थांबवुन सरळ बंद केली म्हणजे आवाजाने पळून जायला नको...तसेच स्तब्ध बसुन राहिलो आणि तीच ती राखाडी रंगाची मान आता नीट दिसली आणि मग तो ट्रेनचा कसाबसा केलेला प्रवास, काढलेली सुट्टी सार्याचं सोनं झालं....हाच तो मांस आणि अंड्याकरता बेसुमार शिकार झाल्यामुळे नाणजमध्ये कसाबसा जगवलेला "माळढोक",ग्रेट इंडियन बस्टर्ड उर्फ़ जी.आय.बी....तेव्हाही त्याचं अस्तित्व धोक्यात होतं किंबहुना म्हणून हे अभयारण्य अस्तित्वात आलं आणि अजुनही परिस्थिती तीच आहे असं ऐकतेय....दिसायला सुरुवातीला शहामृगासारखाच वाटणारा, काटकुळे पाय आणि डोक्यावरची काळसर टोपीसारखा भाग असा दिसणार आणि वजनदार असुनही उडू शकणारी ही पक्ष्यांची जात माणसांनी शिकार करुन आता जास्तीत जास्त हजारभर राहिले असतील..त्यात सध्या माळढोकात साधारण पंचवीसेक आहेत अशी माहिती आहे..त्यामुळे इथे आलं तरी ते हमखास दिसतीलच असं नाही...आम्हाला मात्र त्या मानाने लवकर दिसला असं आमच्याबरोबर असणार्या गार्डचं म्हणणं आहे...साधारण काळवीटांबरोबर ते असु शकतात अशीही टिप्पणी मिळाली...त्यादिवशी सकाळी त्याच गवतात काळवीटांचा एक मोठा कळपही चरत होता..कसला देखणा प्राणी आहे हा...एकदा दिसला की पाहातच राहावा...आणि आपली जाणीव होऊ दिली नाही तर तासनतास पाहू शकतो....तो त्याच्या राज्यात आणि आपण आपल्या...
पण आजचा आमचा लाडका कलावंत, माळढोक मात्र आम्हाला थोडीशीच झलक दाखवत होता त्यामुळे काळवीटांकडे तितकं लक्ष नव्हतं..पण आमच्या गार्डच्या सुचनांप्रमाणे आम्ही मागच्या बाजुने लपतछपत रस्त्यापासुन थोडं आत असलेल्या त्या दोनपैकी एका मचाणावर चढलो आणि मग काय लॉटरीच लागली, फ़क्त एकच साहेब माळढोक नव्हते तर एक फ़्यामिलीच होती...बच्चु तर इतका गोड होता की बास...आणि सूर्य उगवायला नुक्तीच सुरुवात झाली होती त्या उजेडात आणि मचाणावरुन मिळणार्या व्ह्युने दुर्बिणीची पण गरज नव्हती..फ़क्त त्यांची मर्जी आमच्यावर किती आहे त्यावर सारं अवलंबुन होतं...सक्काळ-सक्काळी गवताच्या बिया खायला म्हणून हे कुटुंब या गवताच्या डोंगरात आलं असावं...बराच वेळ त्यांचं खाणं आणि इथे-तिथे हळुवार फ़िरणं सुरु होतं आणि आम्ही मुग्धपणे ते पाहात होतं..आमच्यापैकी ज्यांच्याकडे कॅमेरे होते त्यांना अगदी आयुष्यभर जपुन ठेवावेत असे फ़ोटो मिळाले असणार...(माझ्याकडे अजुनही कॉपी नाहीये...Alpa do you read marathi by chance???) खाणं झालं तसं किंवा आता दिवसाची लगबग सुरु झाल्याची चाहुल लागल्यामुळे बहुतेक ते सारे उडून गेले आणि मग आम्ही भानावर आलो.
केवढातरी मोठा काळवीटांचा कळप तिथं चरत होता..दुर्बिणीतून त्यांनाही न्याहाळलं..बया,श्राइक,वेगवेगळ्या प्रकारचे लार्क आणि अन्य काही पक्ष्यांची लगबग सुरु झाली होती...थोड्या वेळाने आम्ही मचाणावरुन खाली आलो. पुन्हा रस्त्याने सरळ पुढं गेलो तर आणखी चांगले पक्षी दिसतील असं आमच्या गार्डचं मत होतं आणि त्यांनी आम्हाला इतकं सुरेख माळढोक दर्शन घडवल्यामुळे आम्ही आता त्याचं सगळं न ऐकतो तर नवलच...मग आणखी पुढे जाताना बरेच सुंदर पक्षी पाहिले जुनी लिस्ट आता माझ्याकडे असती तर मलाच आश्चर्य वाटल असतं की माळढोक सोडूनही काय काय पाहिलं ते...पण अर्थातच लक्षात राहणार होता तो माळढोकच...
सकाळची वेळ म्हणजे पक्षी-निरीक्षणासाठी तशीही अति-योग्य वेळ आहे..कारण पक्ष्यांना सारखं खायला लागतं, त्यामुळे रात्रभर उपाशी म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठ्ठं असतं..सकाळी-सकाळी बाहेर पडून काही पोटात घातल्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. असो..हे अर्थात सर्वांनाच माहित आहे...आमचं नशीब खरंच चांगलं होतं कारण गार्डनी म्हटल्याप्रमाण पार्काची हद्द संपल्यावरही आम्हाला एका ठिकाणी पुन्हा माळढोक दिसले, फ़क्त यावेळी ते चटकन उडून गेले...गावातही आता लोकांना माहित आहे यांना मारायचं नाही असं ते आम्हाला सांगत होते, खरं-खोटं गावकरीच जाणे.
मग पुन्हा गावाला वळसा घालुन आम्ही परत न्याहारीसाठी गेस्ट हाऊसला आलो...त्या काकांनी आधी म्हटल्याप्रमाणेच चविष्ट खाणं,चहा तयार ठेवला होता आणि आमचे प्रफ़ुल्लित चेहरे पाहून पैसा वसुल झाल्याचं त्यांनाही कळलं होतं..
त्यानंतर आमचं बुकिंग दुसर्या दिवसाचं संध्याकाळचं होतं बहुतेक म्हणून मग संध्याकाळी थोडं इतर एक-दोन ठिकाणी आमचा ड्रायव्हर आम्हाला घेउन गेला..एक त्याच्या ओळखीने कुठेतरी आतमध्ये सोलापुरी चादरींच दुकान की कारखाना होता तिथेही नेलं..खरेदी आटपली...दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा एक मचाणाची चक्कर मारली पण बहुतेक तेव्हा माळढोक नव्हते....नंतर मग निघताना सोलापुर स्टेशनच्या भागातलं एक जुनं, सुंदर देऊळ आणि असा थोडा परिसर आमच्या ड्रायव्हरने (त्याच्या आग्रहाने) आम्हाला भटकवला आणि मग (यावेळी तिकीटाप्रमाणे) ट्रेनमध्ये बसून पुन्हा सॉफ़्टवेअरच्या जगात मी परतले...पण सोलापुरच्या माळढोकांची गुंगी बरेच महिने होती आणि आत्ता सारं आठवुन लिहितानाही मी मनाने तिथेच पोहोचले आहे असं वाटतेय...बरीच ठिकाणं अशी असतात की तिथे आपल्याला पुन्हा-पुन्हा जावसं वाटतं पण ते शक्य होत नाही. नाणज असंच माझ्या लिस्टवर अजुनही आहे...पाहुया पुन्हा केव्हा योग येतो ते..
फ़ोटो सहकार्य...डॉ. संगिता धानुका आणि GIB गुगलबाबांच्या सहकार्याने
8 comments:
एवढी ’भारी’ सुरुवात करुन पुढे मात्र छान झाली तुमची भटकंती...छायाचित्रही मस्त आहेत..तुझी माळढोकची गुंगी समजु शकतो ग कारण मलाही निसर्गातले असे आविष्कार असेच गुंग करुन जातात...
अगदी खरय देवेन्द्र. या blog वरही स्वागत् निसर्ग भ्रमण् तुही करतोस त्यामुळे जास्त काय बोलु??
छायाचित्र आमची एक मैत्रीण् संगीता तिची कृपा आहे भली थोरली gun घेउन जाते ती..:)
बर्याच दिवसापासून माळढोक पक्षी अभयारण्यात जायचा विचार घोळत होता ..हे पोस्ट वाचून तो पक्का झाला..धन्यवाद !
धन्यवाद विभा आणि ब्लॉगवर स्वागत. आपण नक्की जा फ़क्त थोडा पेशन्स लागतो इतकं खरं तरीही खास माळढोक पक्षीअभयारण्य असल्यामुळे दिसण्याची शक्यता त्यातल्या त्यात जास्त...आणि मग परत आलात की तुमचा अनुभव ऐकायला नक्की आवडेल...
छान अनुभव आहे...माळढोक पक्षीच मुळात मोठ आकर्षण आहे.. त्याचा मुळ रुबाबच काही न्यारा आहे...राजस्थानातून हे पक्षी नान्नजला स्थलांतर करतात असं ऎंकून आहे....माझ्या ब्लॉगवर काही इंग्लिश लेखकांची आणि त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांची नावे आहेत....परदेशात आहात म्हणून सुचवतो....शेल्लरचं "The tiger & The Deer" हे पुस्तक तरी मिळ्वून नक्की वाचावे.....पुण्यात चौकशी करुन ही मला ते मिळाले नाही ....माडगूळकर आपल्या लेखनात त्याचा सारखा आणि आवर्जून उल्लेख करतात.....बाकी ...आपणास अधिकाधिक वनवास ( शब्दार्थ घेऊ नका / मतितार्थ घ्यावा )..................भेटू पुन्हा..
@व्यंक्या, बरं झालं The tiger and the deer ची आठवण करुन दिलीत ते. मी माडगूळकरांची पुस्तकं वायचायचे तेव्हा ठरवलं होतं की कधीतरी हे पुस्तक वाचेन म्हणून. आता शोधते. त्यांनी कुठेतरी ते शेल्लरचं वाघांना वजाबाकी येत नाही हा प्रसंग लिहिल्याचं चांगलं लक्षात आहे...
वनवास तर हवाच आहे...आता केव्हा मिळतो ते पाहुया...
Aparnaa,
U R really greeeeeeeeat. Mumbait asoonahee vany pashoo v pakshanbaddal etake prem asne mhanaje - "bahut sukrutaanchee jodee".
Hats Off
shashaank
शशांक धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत...मुंबईमध्ये बरेच निसर्गप्रेमी आहेत...इथे आमच संजय गांधी पार्क आहे न...आणि माझ्यामध्ये ही आवड माझ्या वडिलांकडून आली असावी असंही आहे.
Post a Comment