RSS

Thursday, September 6, 2007

सागरगडची सफर

सोमवार ते शुक्रवार आणि कधीकधी शनिवारीही काम करुन थकलेल्या मनाला निसर्गभ्रमंतीसारखा उपचार नाही़. त्यातही जर पावसाळा असेल तर दुधात साखर.

अशाच एका शनिवारी रात्री आमचा १५ जणांचा ग्रुप सागरगडला जायला निघाला. मुंबई सेंट्रलहून रात्री उशिराची एस टी पकडून पनवेल स्थानकात पोहोचलो. सकाळी .३० ला आम्हाला दुसरी एस टी पकडायची होती, त्यमुळे मधल्या वेळेत काही TP करणे भाग होते. काही जणांनी गप्पा मारत वेळ काढला. मी मात्र चक्क फलाटावर त्यातल्या त्यात सुसिस्थीतला बाक पाहून झोपुन गेले.

सक्काळ सक्काळी स्थानकातल्या कँटिनमधले गरमागरम पोहे ( देव भले करो त्या आचाऱयाचे) आणि काँफी घेऊन बस पकडलीसाधारण १५-२० मिनिटांत खंडाळे (हे वेगळे) गाव येते; हाच सागरगडाचा बेस.

अतिशय आल्हाददायक दिवस होता. पावसाची सर मधुनच हजेरी लावुन जाई. सभोवार पसरलेली हिरवी शेते, तिन्ही बाजुला हिरवे डोंगर पाहून कालचा प्रवासाचा शीण कुठच्या कुठे निघुन गेला आणि :३० ला आम्ही गडाच्या दिशेने कुच केली.सुरूवातीला लक्षात येत नाही की आपण नक्की कुठच्या बाजुने चढणार. साधारण पाउण अंतर संपले की लक्षात येते की आपल्याला कुठे जायचे आहे.प्रथम साधारण तासभराचा टाररोड आहे जो गावातून जातो. पण या वाटेवरुन चालताना मध्येच घर, थोडीशी शेती, त्यातले लहरणारे बहुतेक भाताचे पीक बघतान कळतही नाही की वाट कशी संपली ते.त्यानंतर जरा रुंद पायवाटेवरुन चालताना बाजुला एक ओढा सतत आमच्या सोबतीला होता. असं वाटत होत की वर कुठेतरी एखादा धबधबा असावा.

हळुहळु वाट कशी अरुंद होत गेली हे कळलेही नाही आणि थोडा थोडा चढ लागायला लागला. अधुनमधून छोटे छोटे ओहोळ होतेच. मी ओहोळ आला की बुटात पाणी जाउ नये म्हणून ते काढून हातात घेई आणि परत घाले. फ्लोट्सवाल्याची मजा होती. यानंतर आपणपण पावसाळी भटकंतीत बूट नाही घालायचे असे ठरवले पण पुढच्या वेळी नाही घातले आणि जो प्रसंग आला तो पुन्हा केहातरी !


अशाच एका ओहोळापाशी बसुन बुट घालताना मला राखी धनेशाची ( Gray Hornbill) जोडी दिसली. हा पक्षी दिसणे म्हणजे त्या जंगलातली वनसंपदा समृद्द असण्याचा संकेत आहे त्यामुळे मन अजुन तरतरीत झाले. एका ठिकाणी थोडा Rocky Patch लागला जिथे चढताना बऱयापैकी धाप लागते. पण हा चढ संपताच अहाहा ! डोळ्याचे पारणे फिटेल असा सुंदर धबधबा उजवीकडे जणू आमचीच वाट पाहात होता. इतका वेळ बांधलेले अनुमान खरेच होते तर..... ज्या बाजुने आम्ही चढलो होतो तिथुन तरी धबधब्याकडे जाणे शक्य नव्हते म्हणून आम्ही तो आमच्या बरोबर समोर येइल असे किती वेळ बसुन राहिलो ते कळलेही नाही. एकटक उंचावरुन सतत पडणाऱया पाण्याची गाज एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. अशा वेळी बरोबर ५ असो की १५ कुणाचे अस्तित्व जाणवत नाही. सर्वांचीच थोडीफार अशीच अवस्था असावी. पण वर जाउन माघारी परतायचे तर मार्गक्रमण करणे प्राप्त होते. धबधब्यापासुन पाचेक मिनिटांवर एक देऊळ लागते. इतक्या ऊंचावर येऊन बसण्याचे कष्ट फक्त आपले शंकर भगवानच करु शकतात हे सुज्ञास सांगणे न लगे. हमममम तरी तो भोळा ः) असो. बाजुला एक विहीर आणि ओहोळ पण आहे.

देवदर्शन करुन आम्ही बाकीच्या मंडळींची वाट पाहत बसलो. इथे माकडेही होती त्यामुळे सामान बघत बसावे लागले.
आमच्यातील आठजण देवळात मुक्काम करुन दुसऱया दिवशी पुढे जाणार होती तर उरलेली आम्ही सातजण त्याचदिवशी गडावर जाऊन परतणार होतो. त्यामुळे सर्वजण देवळापर्यंत चढल्यावर बाकीच्यांचा निरोप घेऊन हम सात पुढच्या मार्गाला लागलो. अगदी सांगायचे म्हणजे या सात जणांत वय वर्ष दहा असणाऱया जुळ्या बहिणीपण होत्या.

देवळापर्यंत चढण्याचे कष्ट केल्यावर मात्र बराच पठारी भाग आहे आणि तिथे थोडी वस्ती आहे. बहुधा ठाकरवाडी असावी. परत येताना आम्ही एका घरातून अस्सल गाडगीळी (म्हणजे आपलं गाडग्यात लावलेलं हो) दही घेतलं होतं.
शाळेत वाचले होते की शिवाजी महाराजांच्या काळात गडांवर वस्ती असे. ही ठाकरवाडी पाहून ते आठवले. वाटले पु.लं.च्या कथेप्रमाणे कुणीतरी आठवण काढील," महाराजांच्या टायमाला.........".

या हिरव्या रस्त्यावरून चालताना खूप मजा येत होती आणि विशेष म्हणजे थकवाही अजिबात जाणवत नव्हता. आता हळुहळु गडाचे पठार दॄष्टिपथात येऊ लागले. गड साधारण जवळ येऊ लागला तोच एक पंधरा वीस मिनीटे एकदम गर्द राई लागली. इथे जास्त थंडावा होता. आणि चालताना Malabar Whistling Thrush ची सुरेख शीळ सोबतीला होती. हा एक सुंदर गाणारा पक्षी आहे जो थोडा थोडा वेळ थांबून खूप सुंदर Notes मध्ये गातो. माझे मन थोड्या वेळासाठी लोहगडावा गेले; जिथे मागच्या वर्षी वस्तीला राहायची संधी मिळाली आणि पहाटे हीच शीळ ऐकुन वेडावलो होतो.

या रम्य वातावरणातून चालत साधारण अकराच्या सुमारास आम्ही गड काबीज केला. वारा पिऊन घेण्यासारखे हिरवेगार पठार आणि जुन्या काळचे काही भग्न अवशेष, कुठे एखादी तोफ सोडली तर गड म्हणण्यासारखे खूप काही राहिले नाही. पण हा अतिशय सुंदर प्रवास आहे, वाटेवर निसर्गाची विविध रुपे दाखवणारा.

पठारावरून खाली पाहताना कळते आपण किती वर आलो आहोत. पांढरपाठी गिधाडेही (white backed vultures), जी आधी आमच्या डोक्यावरून जात होती ती पण खालून गेली, की आम्ही त्यांना वरुन पाहू शकलो. त्यांच्या पंखांचा भव्य विस्तार आणि मधला पांढरा रंग खपच स्पष्टपणे निरखता आला.
आता मात्र त्या हिरव्यागार गवतावर लवंडायला भरपूर वेळ होता. बराच वेळ आम्ही सर्वजण निसर्ग नुसता न्याहाळत होतो. चार तास चढल्याचे श्रम सार्थकी लागले होते आणि सर्वांना भुकाही लागल्या होत्या. बरोबर नेलेले डबे, खाऊ काढून आम्ही एकत्र खायला बसलो. एकीने लगेच कांदा कापून तिथल्या तिथे पीठ, कांदा व पाणी घालून डांगर बनवला ज्याची चव आजही जिभेवर आहे. आपले नेहमीचेच पदार्थ पण त्या वातावरणात आणि सर्वांच्या जोडीने गोडी अवीट झाली होती. जेवण आवरता आवरता पावसाची एक जोरदार सर आली आणि वस्तू सांभाळायची आमची धांदल उडाली. अर्थात हा दहा मिनिटांसाठीचा दणका होता पण मस्त भिजायला मिळाले.

बघता बघता दुपारचा एक कसा वाजला ते कळलेही नाही. आता मात्र निघायच्या तयारीला लागले पाहीजे असा सूज्ञ विचार करुन गडाचा निरोप घेतला.

परतताना ओढ्यात डुंबायची खूप इच्छा होती पण तेवढा वेळ देणं शक्य नव्हतं. आमच्याबरोबरच्या छोट्या मुलींना मात्र अगदी थोडा वेळ डुंबायला दिले. उतरताना परत देवळाकडे आमच्या सवंगड्यांचा निरोप घेतला धबधबाही नजरेत साठवून परतीच्या वाटेला लागलो.

हा पूर्ण ट्रेक लांबीला तसा जास्त आहे पण तरीही आम्हाला खूप दमायला झाले नाही याचे कारण वातावरण आणि निसर्ग असावे.

हा दिवस सर्वांनाच खूप काही देऊन गेला. निदान पुढचा आठवडा काम करण्यासाठी ऊर्जा म्हणजे पुढच्या weekend ला अजुन एखाद्या नव्या ठिकाणी भटकंती करायाला मोकळे.





9 comments:

Anonymous said...

apratim varnan kela aahe...
purna pravas dolyapudhe ubha rahila...

Anonymous said...

khoopp Chan tai...


Mast lihile ahe Pravasvarnana.....

Sumitr Madgulkar said...

अपर्णा,
"सागरगडची सफर" हे छान प्रवास वर्णन झाले आहे!,आपणपण तेथे पाहिजे होतो असे वाटले,लिहित रहा त्यातून एखाद छान पुस्तकही जन्माला येईल.All the Best!.

साळसूद पाचोळा said...

sahi ... bhannaaT .... maja aali buvaa!!!

अपर्णा said...

धन्यवाद सचिन, अनिरुद्ध आणि सौमित्र

Pankaj - भटकंती Unlimited said...

खूप छान वर्णन आहे. या सागरगडाबद्दल अधिक माहिती मिळण्याची कृपा होईल काय? म्हणजे जाण्याचा रस्ता, पनवेलवरुन कुठली एसटी, किती वाजता, कुठे उतरायचे, वर राहण्याची सोय वगैरे...

अशीच भटकंती चलू ठेव.

अपर्णा said...

पंकज तुझी प्रतिक्रिया जरा उशिराने पाहतेय...आणि या ब्लॉगवर स्वागत...तुला मी माझ्या मुंबई मधल्या काही contacts न विचारून माहिती मिळाली तर नक्की पाठवेन...तुला तर खूपच आवडेल इथे जायला...

Unknown said...

आयला ! सही आहे एकदम !
बघायला पाहिजे.. :)

* बाकी धन्यवाद त्या बझचे.. एका चांगला लेख व माहिती मिळाली :D

अपर्णा said...

राजे....:) धन्यवाद त्यावेळी नेमकं लिहून ठेवलं होतं त्याचे....