RSS

Friday, January 13, 2012

मिऱ्या डोंगर


 खरं तर ट्रेकर या जातीतली मी कधीच नव्हते किंवा नाही..आपला पिंड निवांत चालायचा आणि मुख्य पक्षी (आणि जमल्यास प्राणी) पाहायला शिकायचं थोडक्यात ट्रेल करायची आवड..पण तरी एक दिवस असा येतो की तुम्ही अट्टल ट्रेकर बरोबर कुठे तरी जाता..ते ठिकाण काही भव्य दिव्य असायला हवं असण जरुरीचं नाही पण तो प्रवास, ती झिंग एकदा अनुभवली की मग अरे इतकी वर्ष आपण हे का नाही केलं बरं असं लगेच वाटतं...आणि मग आपल्याला वाटतं की हे सगळं आपल्याला कायम लक्षात राहील...आणि तिथेच माझ्यासारख्यांच गणित चुकतं..
हम्म म्हणजे  काय आहे या ब्लॉगचं पुनरुज्जीवन केल्यापासून मला माझा पहिला ट्रेक याविषयी लिहायचं आहे आणि बरेच दिवस मला त्या जागेचं नाव आठवत नव्हतं..मग जागेचं नाव आठवलं तर तिथे नक्की कसे गेलो ते आठवत नव्हत..या ना त्या कारणाने ते लिहिणं राहून जात होतं..मग आता २०१२ सुरु झालंय तर जस आठवेल तस पण लिहायचं असा विचार करून बसलेच आहे त्यामुळे यातल्या माहितीत गल्लत व्हायची शक्यता आहे हे आधीच नमूद करायला हव...
तर माझी कामावरची एक मैत्रीण रोहिणी, जिला खर तर अट्टल ट्रेकरच म्हटलं पाहिजे तिला एकदा मी माझ्याबरोबर बीएनएचएसच्या ट्रेलला नेलं होतं त्यानंतर ती तिच्या एका ट्रेकग्रुप बरोबर कुठेतरी जाणार होती त्यात तिने मलाही आमंत्रण दिलं...शनिवारी रात्री प्रवास आणि रविवारी ट्रेक करून परत असा माझ्या शब्दात धाडसी कार्यक्रम होता....आणि जागा होती मिऱ्या डोंगर...
आम्ही सर्व दादर स्टेशनला भेटून रात्रीच्या गाडीने पेणला जाणार होतो आणि मग तिथून सकाळी दुसरी लालडब्बा पकडून पायथ्याच्या गावाशी. रोहिणीचा ग्रुप तसा मोठा आणि मोठ्या वयाच्या लोकांचा होता पण मंडळी सगळी बोलायला मोकळी ढाकळी होती त्यामुळे त्यांची ओळख होऊन गप्पांचा फड रंगायला बसमध्ये वेळ लागला नाही...आणि खर तर नन्तर मी जे काही थोडे फार ट्रेक केले त्यातले या ग्रुपबरोबर जास्तच होते त्यामुळे आमच सूत पहिल्या ट्रेकलाच जुळलं असं म्हणायला हरकत नाही..
आता हे पायथ्याच गाव नक्की कुठल होत ते काही मला आठवत नाही पण एका घरात जेवण सांगून तिथलाच वाटाड्या मदतीला घेऊन आम्ही निघालो होतो...मला आता नक्की महिना पण आठवत नाही पण भर पावसात नक्कीच नव्हतो बहुदा पीक कापणीच्या सुमारास जेव्हा रान पिवळ झालेलं असत ते दिवस होते..आमच्या वाटाड्याला आम्ही विचारल की मिऱ्या डोंगर कुठेशी? तर ते म्हणतात हा काय इथं...आणि सरळ वर बोट दाखवलं...आम्ही त्या पिवळ्या उंच गवतातून किती उंच असेल याचा अंदाज  घ्यायच्या आत आमचे मावले एक एक करून गड काबीज करयच्या वाटेवर लागले पण होते...नशिबाने खाली येऊन जेवायचं होत त्यामुळे सर्वामध्ये एका sack मध्ये पाणी आणि पाकीट ठेवून ती एका सरांकडे दिल्यामुळे आम्हाला सड्यासुट्ट्या हाताने फक्त चढाई करायची होती...बाकी ट्रेकला जाताना मौल्यवान काही नेऊ नये हा नियम तेव्हापासून होताच त्यामुळे त्याची चिंता नव्हती..मला वाटतं कुणाचकडे कॅमेरा नव्हतं त्यामुळे ते धूडही नव्हत...
पण मी आणि माझी आणखी एक मैत्रीण आम्ही आयुष्यात पहिल्यांदी ट्रेक करत होतो..याआधी मला वाटत  विरारची जीवदानी आणि मळवलीची कार्ल्याची लेणी सोडून कुठे आम्ही चढलो नसू..आणि तिथे तर काय पायऱ्या त्यामुळे तस सोप..पण इथे आमचे वाटाडे काका हा काय गड म्हणले तो चढताना जो घाम फुटत होता काही सांगायची सोय नाही...आणि बाकीचे तर पटापट चढत होते त्यामुळे आणखी टेन्शन....कुठे थांबायचं तर तस काही सपाट दिसत नव्हत...म्हणून मग ते नेतात तसे चढत राहिलो..आणि (एकदाचे) पोहोचलो...मी आणि माझी मैत्रीण आम्ही नक्की किती वेळ धापा टाकत होतो माहित नाही पण वरचा गार वारा खाऊन जरा हुश झाल्यावर आपण कुठून आलो हे पहायचा अंदाज घेतला आणि एकदम लक्षात आलं की वाटाडे काकांनी आम्हाला बरोबर सरळसोट म्हणजे नव्वद अंशात चढवल होत...बापरे..सहीच होते ते...आणि मग आम्हाला म्हणतात, "बघा आणलं ना बिगी बिगी??आता बगा काय बगायचं ते आणि चला खाली..उन उन जेवण वाट पाहत असेल...."
धन्य...त्यांना बाकीचे पण साष्टांग दंडवत घालणार होते पण आम्हाला उतरून त्यांच्याच घरी जेवून जायचं होतं...म्हणून तो विचार रद्द केला गेला असावा..काहीही असो एकदा गडावर चढल्यावर असल्या गोष्टींची चिंता करायच्या ऐवजी मस्त उनाड वारा पिऊन घेतला आणि वरून दिसणारे इतर डोंगरकडे, खालचे रानोमाळ न्याहाळत बसलो..मला वाटत वर कुठेतरी पाण्याचा एक हौदसारखा होता पण बाकी काही विशेष पहिल्याच आठवत नाहीये...आता पुन्हा ते तसेच उतरवणार का याच एक कोड होताच पण आमची चढतानाची फे फे बघून त्यांनी उतरण्याचा मार्ग आम्हाला झेपेल असा निवडला होता..खाली यायला फार वेळ पण लागला नाही कारण आम्ही अक्षरश दुपारच्या जेवणाला थोडच उशीरा खाली पोहोचलो होतो आणि ते आवश्यक पण होत कारण पुन्हा तिथून मुंबईचा पल्ला होताच...
या ट्रेकमधल्या खूप गोष्टी मी विसरले आहे तरी त्या काकुनी बनवलेलं ते चविष्ट जेवण, पानात अगदी पापड लोणच्यापासून सर्व काही आणि माझी आवडती वालाची उसळ हे मात्र फार फार लक्षात राहील आहे...जाता जाता या ग्रुपमधले सर्व शाकाहारी असल्याने यांच्याबरोबर मी ट्रेकला कधी नॉनवेज खाल्ल्याच आठवत नाही..पण इतक सुरेख शाकाहारी गरम गरम जेवण असेल तर उभा कडा चढायलाच काय उतरायला  पण मी पुन्हा तयार होईन...ट्रेकिंगची आवड निर्माण व्ह्यायला मिऱ्या डोंगरावरून दिसलेली दृश्य, तिथला उनाड वारा जितकं कारणीभूत आहे तसच त्या गडाच्या पायथ्याशी माफक दरात जेवलेल ते सुग्रास अन्नही तितकच कारणीभूत आहे असं आता ही पोस्ट लिहिताना मला वाटत...:)

Sunday, November 13, 2011

वारी सुपे रेहकुरीची....

मालवणला जाऊन आल्यावर आमच्या ग्रुपचं मुळातलं भटकंतीचं वेड जरा जास्तच वाढलं..किंवा दुसर्‍या शब्दात आता मुंबईच्या बाहेर जावं असं जरा जास्तीच वाटायला लागलं..तर मालवण नंतर लगेच म्हणजे साधारण तीन-चार महिन्यातच आम्ही पुण्यातल्या सुपे आणि रेहकुरीला जायचा प्लान आखला.

सुप्याची साधारण माहिती एक-दोघांना होती आणि रेहकुरीला मयुरेश्वर अभयारण्यात राहायची सोय आहे त्याची माहिती आणि बुकिंग करुन मालवणला केली होती तीच बस करुन जायचं ठरलं. फ़क्त यावेळी मागच्यासारखी खोगीरभरती केली नाही. कारण एक म्हणजे अशी अनोळखी माणसं जास्त आली की एकमेकांबद्दलचा कंफ़र्ट अजुन निर्माण न झाल्याने थोडी मजा कमी होते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जंगल भटकंतीला जायचं तर तोंड गप्प ठेवणारी माणसं हवीत; त्यामुळे मग माहितीतलीच थोडी असली तरी चालेल; शिवाय मालवण इतकं अंतर नव्हतं आणि एकच रात्रीचा प्रश्न होता मग खर्चही वाटून घेतला तरी परवडण्यासारखा होता.

एका सुट्टीच्या शनिवारी सकाळी लवकर निघुन पुण्याहुन पहिले सुप्याला थांबायचं आणि मग पुढे रेहकुरीला राहायचं. सकाळी पहाटे तिथे पक्षीनिरिक्षण करुन मग दुपारी परतीला लागलं तरी चालेल असा छोटेखानी बेत होता.

मी स्वतः या दोन्ही जागी कधीच गेले नव्हते त्यामुळे पहिलटकरणीसारखं जे होईल ते पाहायचं, जमेल तसं निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवायचं,खूप पक्षी पाहायचे,शिकायचं हेच डोक्यात होतं..आणि खरंच त्यासाठी सुर्वणसंधी होती..मला वाटतं ऑगस्टमध्ये आम्ही गेलो होतो त्यामुळे तसा पावसाचा थोडाफ़ार इफ़ेक्ट होताच.

सुप्याला जवळजवळ धावता दौरा होता.पण एकदा त्या अभयारण्याच्या जागेत शिरलो आणि आयुष्यातले पहिलेच चिंकारा उर्फ़ गझेल टणटण उड्या मारत जाताना पाहुन सगळ्यांचाच उत्साह एकदम वाढला. याआधी गझेल म्हटलं म्हणजे मला फ़क्त डिस्कव्हरी चॅनेलवरचं टिपिकल वाघ किंवा इतर प्राण्यांनी शिकार करताना दाखवलेला सीनच आठवे. आज ते प्रत्यक्ष समोर पाहुन मात्र भान हरपलं. हा प्राणी इतका सुंदर, नाजुक आणि चपळ आहे की पूर्ण कळप दौडत असताना नजर हटत नाही. सुप्याला एका मचाणापाशी आम्ही थोडावेळ थांबलो. तिथे आणखी काय पाहिलं ते मला आता अजीबात आठवत नाही इतकं सारं चिंकारामय झालं होतं.

जास्त न थांबण्याचं कारण मयुरेश्वर अभयारण्याला वेळेवर पोहोचुन रात्र पडायच्या आधी तिथल्या जंगलात पण एक चक्कर मारायची होती. शिवाय तिथल्या फ़ॉरेस्ट डिपार्टमेंटचा माणूस फ़ार संध्याकाळ झाली आणि कुठे गेला तर आमची राहायची पंचाईत झाली असती. रेहकुरीचं हे अभयारण्य खास प्रसिद्ध आहे ते म्हणजे काळवीटांसाठी. सुपे आणि रेहकुरी याठिकाणच्या अभयारण्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे घनगर्द झाडी नाही. सगळ्या खुरट्या काटेरी बाभळीसारख्या झाडी त्यामुळे हे जंगल आहे हे खास सांगावं लागतं. अशा ठिकाणी राहणार्‍या प्राण्यांना आणि पक्ष्यांना तिथेच कॅमोफ़्लाज होता येणं हे एकंच संरक्षण निसर्गाने त्यांना दिलंय. पण अर्थात मानव नावाच्या अति हुशार प्राण्यांपासुन बचाव करायला हे अर्थातच अपुरं पडतं आणि निव्वळ अभयारण्य केली म्हणून हे प्राणी-पक्षी वाचतात असंही नाही. असो..

तर रेहकुरीला आम्ही गेलो तेव्हा तरी काळवीटं भरपूर होती. आम्ही मुख्य गेटवर पोहोचायच्या आधीच एका शेतात काळवीटांचा एक कळप चरताना आम्हाला दिसला. फ़क्त उशीर होईल म्हणून थांबायला मात्र आम्हाला वेळ नव्हता. ही अशी शेताची नुकसानी झाल्यामुळे मारण्यात आलेल्या काळवीटांची संख्याही लक्षणीय़ आहे असं आम्हाला फ़ॉरेस्ट ऑफ़िसरशी बोलताना कळलं.

मुख्य गेटपाशी अभयारण्याचा बोर्ड आहे आणि एक दोन खोल्यांसारखं फ़ॉरेस्ट गेस्ट हाउस होतं असं मला वाटतं. आम्ही त्या फ़ॉरेस्ट ऑफ़िसरकाकांना रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता याबद्द्ल आधीच सांगुन ठेवलं. पुन्हा गावात जाउन काहीतरी शोधण्यासारखं एक्सायटिंग वाटत नव्हतं आणि हाताशी असलेला वेळ जंगलासाठी ठेवावा असं जास्त वाटत होतं. अजून सूर्यास्त झाला नव्हता त्यामुळे आतमध्ये एक चक्कर मारायची आम्हाला परवानगी होती. मग जास्त वेळ न दवडता आम्ही आपापल्या दुर्बिणी घेऊन आत जाणार्‍या पायवाटेने चालायला सुरुवात केली.

आज प्राणी दिसायचं आमचं नशीब इतकं जोरावर होतं की आम्हाला जास्त आत जावंही लागलं नाही. काटेरी झाडांच्या मागेच काळवीटांचा एक कळप शांतपणे चरत होता. त्यात चांगली शिंगं असणारे नरही होते आणि काही छोटी पिल्लंही होती. आम्हाला त्यांना नीट न्याहाळता यावे म्हणून लपत छपत आम्ही दुसरीकडे असलेल्या एका मचाणावर चढलो. आता जवळजवळ आमच्या सभोवार काळवीट आणि फ़क्त काळवीटच होते. मोजले तर साधारण नव्वदेक तरी भरले. दुर्बिणीतून न्याहाळताना त्यांची तुकतुकीत कांती आणि पोटावरचा तो काळसर पट्टा आणि अर्थातच नराची शिंगं अगदी नजरेत भरली. सूर्य जवळजवळ अस्ताला जात होता आणि त्या पार्श्वभूमीवर हा देखणा प्राणी ही संध्याकाळ कायमसाठी आठवणीत ठेऊन गेला......मला वाटतं मालवणला तारकर्लीला समुद्राच्या साक्षीने पाहिलेला सूर्यास्त जितका देखणा होता तितकाच अविस्मरणीय हाही होता. खरंच निसर्गाच्या जेवढ्या जवळ आपण जाऊ तितकंच तो आपल्या विविध रुपांनी आपलं विश्व भारुन टाकतो.

त्यानंतर आम्ही रात्रीही जेवणं झाल्यावर पुन्हा आमच्या त्या बसने गावचा एक छोटा दौरा केला. कुणीतरी गावात कोल्हे-बिल्हे येतात अशी माहिती काढली होती. आम्हाला काही दिसलं नाही पण दुसर्‍या दिवशी सकाळी या भागातले थोडे पक्षीही पाहायचे होते आणि काळवीटांनी पुन्हा दर्शन द्यावं ही अपेक्षा अर्थातच होतीच त्यामुळे सरळ येऊन झोपलो.

अभयारण्याच्या तोंडावरच जी झाडं आहेत तिथेच खूप छान छान पक्षी दिसले..मला काळवीट पाहायचीच होती म्हणून पुन्हा एकदा आतमध्ये जायचं ठरवलं आणि थोडं जास्त मध्ये गेल्यावर पुन्हा एक छोटा कळपही दिसला. फ़क्त आम्हाला सर्वांना परत मुंबईला जायचं होतं म्हणून लवकर आवरतं घेतलं कारण कुणाच्यातरी डोक्यामध्ये सिंहगड पण करुन जाऊया अशी टुम निघाली. अर्थात नाही म्हणणं शक्य नव्हतं पण सिंहगडावर चढणं वगैरे होंणार नव्हतं. थोडं पिकनिकसारखं होणार होतं.

तरी येताना दुपारी भिगवण म्हणून एक गाव आहे तिथल्या तलावावरुन जाताना सुनिलला आयबिस दिसला आणि त्याने इथे थांबायलाच हवं म्हणून आग्रह धरला. त्याचं म्हणणं ऐकलं ते बरंच झालं. तिथे पाणपक्ष्यांची रेलचेलच होती. आम्हाला चोचीवर पांढरा ठिपका असणारे कूट,काळ्या डोक्याचे आयबिस, पेंटेड स्टॉर्क्स आणि बरेच पक्षी दिसले. मला वाटतं लोकल मायग्रेटरी बर्डसाठी हे ठिकाण चांगलं असावं.

हे सर्व कमी होतं म्हणून सिंहगडावरची पिकनिकही केली. त्याचं मुख्य कारण परतीच्या वाटेवर एका ठिकाणी खाल्लेली भाजलेली कणसं सोडली तर पोटात काही नव्हतं हेही असावं असं मला आता वाटतं. सिंहगडावरचं धुकं मला फ़ार आवडलं पण जास्त वेळ नव्हता.शिवाय थोडं पावसासारखं होतं त्यामुळे खालेल्या कांदा भजी आणि झुणका भाकरी मटका दही यांना विसरता येत नाही.बरं झालं थोडा वेळासाठी तरी गेलो कारण त्यानंतर कधीच सिंहगडावर जायचा योग आला नाही.

भरगच्च भटकंतीचे हे पाहायला गेलं तर दोनच दिवस. या दौर्‍यात भटकंतीत करता येणासारख्या बर्‍याच जागा केल्या पण जास्त लक्षात राहिले तर टणाटण उड्या मारणारे चिंकारा आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाहिलेले काळवीट....



सगळे फ़ोटो सौजन्य डॉ. संगिता धानुका





Monday, May 9, 2011

आठवणीतलं कर्नाळा

पक्षीनिरिक्षणाचा छंद लागला आणि मग वेध लागला तो एखाद्या खरखुरं पक्षी अभयारण्यात जायचा. अर्थात त्यावेळी नुकतंच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण होत होतं. ग्रुपमधले सगळेच साधारण माझ्यासारखेच मध्यमवर्गीय.त्यामुळे मग आपल्या मध्यमवर्गीय बजेटमध्ये बसणारं, मुंबईच्या जवळ असलेलं कर्नाळा हेच ठिकाण आमच्यासारख्यांसाठी योग्य होतं.कर्नाळ्याला मी निदान साताठवेळा तरी गेलेय. माझ्यासाठी कर्नाळा म्हणजे एखाद्या दिग्गज गायकाच्या मैफ़िलीसारखं..सुरुवातीला विलंबित खयालासारखं, सगळ्यांनाच कळेल असं नाही आणि "निघुया अपने बस की बात नही” म्हणावं तर एखादा सूर ह्र्दयाचा ठाव घेणारा, आपल्याला त्या मैफ़िलीचा भंग करुन निघु देणार नाही. मैफ़िलीत सुरु केलेला राग पूर्ण ऐकायचा संयम दाखवून मग स्वतः थोडा अभ्यास करुन रागदारी ऐकायची सवय लावली तर मात्र भैरवी आली की चुटपुट लावणारा...काही वेळा ठुमरी आणि तराण्यामधुन आपल्याला डोलायला लावणारा कर्नाळा.

कितीतरी आठवणी आहेत...अगदी सुरुवातीला फ़क्त चढायची सवय नाही म्हणून दमवणारा, मग अंगठ्याखाली चढलं की वरती सुटणारा भन्नाट वारा आणि आपली पांढरी पाठ दाखवत मस्त तरंगणार्‍या गिधाडांना पाहताना, एकदा माझ्या वाढदिवसाचा केक सॅकमध्ये लपवून वरपर्यंत नेऊन सगळ्यांना सरप्राइज देतानाचा आनंद घेणारा तर एकदा उतरताना नेमकं ग्रुपमधली एक मुलगी पायर्‍यांवरुन घसरल्यामुळे तिला इतरांबरोबर उतरवताना आलेलं टेंशन, त्यापेक्षाही जास्त टेंशन आणखी एका मैत्रीणीच्या वाढदिवसाला फ़क्त चौघीजणींनी कर्नाळा सर करायला जाताना त्रास देणारा मुलांचा एक ग्रुप भेटल्यामुळे आलेला प्रसंग निभावताना. आता हे सगळंच सोडून इतकी वर्षे झालीत हे सर्व एकत्र आठवतेय तेव्हा लक्षात येतंय आणि पुन्हा एकदा कर्नाळ्याला जावसं वाटतंय़.
सर्वात पहिल्यांदी कर्नाळ्याला गेलो होतो तेव्हा जाताना दादरहून बसने पनवेल मार्गे सक्काळ सक्काळी गेलो होतो. "जैत रे जैत" चित्रपटात माहित झालेला कर्नाळा तोवर मी फ़क्त महामार्गाने जाताना दिसणारा कर्नाळ्याचा अंगठा बसमधुन तेवढा पाहिला होता. जाताना तर वेळेवर गेलो. चढताना पायर्‍या असल्या तरी मध्ये मध्ये काही ठिकाणी त्या थोड्या जास्त उभ्या आहेत किंवा काही ठिकाणी त्यातलं अंतर जास्त आहे त्यामुळे झाली दमणूक आठवते. पण एकदा वर पोहोचलं की बेभान सुटलेला वारा पिऊन आणि खाली दिसणारं जंगल पाहिलं की सारा शीण कुठे जातो ते कळत नाही. पहिल्यावेळी मात्र माझं विलंबीत खयालासारखं झालं होतं. एवढ्या मोठ्या पायपिटीत जाताना काही म्हणजे काही दिसलं नाही. फ़क्त वर गेल्यावर पांढरपाठी गिधाडं आमच्या खालुन गेली. "हेच पक्षीअभयारण्य म्हणायचं का?" " हा हायवे गेलाय नं इथुन, त्यामुळे आवाज वाढलेत मग कसे दिसणार पक्षी???" असं सगळं कोल्ह्याला लागलेल्या आंबट द्राक्ष्यांसारखं बोलुन झालं.पण मान्सुनचा पाऊस झाल्यानंतर गेल्यामुळे वेड लावणारी दिसणारी हिरवाई आणि चढताना झांडांच्या गर्द छायेत जाणवणारा थंडावा यामुळे कर्नाळा मला तरीही खूप आवडला. मुंबईच्या जवळ हे एक गाजरही होतंच. पण परत निघताना संध्याकाळी कुठुनश्या येणार्‍या सगळ्या बस भरुन जाताना मात्र आता परत कसं जायचं याचं जाम दडपण आलं होतं.
शेवटी जवानांचं सामान नेणार्‍या एका टेम्पोवाल्याला आमची दया आली आणि काही जवान मागे आणि आम्ही दहा-बारा जण टेम्पोच्या मागच्या बाजुला काठ पकडून तो भन्नाट वारा खात एकदाचे पनवेलला पोहोचलो आणि पुन्हा दादरची बस-लोकल असं सगळं साग्रसंगीत करुन घरी येतानाच पुन्हा जाऊया रे एकदाचा गजर होताच. आणि मालवणला जाऊन आल्यानंतर ग्रुपचं स्वतःचं वाहन करुन ट्रेक जास्त आणखीबद्ध करता येतात किंवा आमच्यासारख्यांच्या बजेटमध्ये पण बसवता येतात हे कळल्याचा आत्मविश्वास असेल, त्याच बसने आम्ही तेरा-चौदा जण मिळुन यावेळी बसने पुन्हा कर्नाळ्याला निघालो. यावेळचं कर्नाळ्याची मैफ़िल रंगतदार होती.नेहमीपेक्षा लवकर पोहोचल्यामुळे पिकनिकर्स आले नव्हते. त्यामुळे चढतानाच बर्‍यापैकी पक्षीदर्शन झालं. दुपारच्यावेळी वर पोहोचुन मस्त तोच तो उनाड वारा खात बसताना सुख म्हणजे काय ते हेच असतं का असं वाटण्याचे ते दिवस आत्ता आठवलं तरी ती नशा चढते आणि खांद्यावर सॅक टाकुन भटकंतीला बाहेर पडावंसं वाटतं.
स्वतःच्या बसने जाण्याचा फ़ायदा येता-जाता दोन्हीवेळा झाल्यामुळे झिंग लागल्यासारखे दुसर्‍या एका मान्सुनमध्ये पुन्हा त्याच बसनेच गेलो. यावेळी ग्रुपमध्ये दोन-चार मेंबरं वाढली पण होती. अर्थात बजेट मॅनेजमेंटला अशी दोन-तीन जास्तीची लोकं बरीच पडतात. यावेळी कर्नाळ्याच्या मनात काहीतरी वेगळं होतं.जाताना कदाचित गप्पांचा अतिरेक सुरु होता की काय नीट आठवत नाही पण विशेष काही दिसलं नाही. नेहमीचे होले आणि सूर्यपक्षीवगैरे दिसले. येताना मात्र मी राकेशसोबत उतरत होते त्याच्या पायगुणाने सारखं काही नं काहीतरी दिसत होतं.
Credit: Free images from acobox.com
याआधीही त्याने बरेच चांगले स्पॉटिंग केलेत तोच शिरस्ता त्यादिवशीही कायम होता. त्यादिवशी खाली येताना बरेच पक्षी दिसले पण लक्षात राहिला तो मी पहिल्यांदीच पाहिलेला हिरवागार क्लोरोप्सिस आणि ग्रीन पिजन. त्यानंतर क्लोरोप्सिस मी बर्‍याचदा पाहिला पण पहिल्यांदी राकेशने कर्नाळ्याला तो दाखवताना (अर्थात त्याला) झालेला त्रास. "अरे तेरे तीन बजे देख"..." अभी देख नं हील रहा है वो डाल के पीछे"...बापरे किती हिरवा आणि झाडात अदृष्यच असलेला सुंदर पक्षी तो...अहाहा....ग्रीन पिजन मात्र नंतर कधीच दिसला नाही. त्यावेळी पण तो उतरताना थोडा वेळच दिसला आणि मग झाडीत नाहीसा झाला. तो बाकीच्यांना पण पाहता यावा म्हणून मागे पाहातो तो काय? बडबड करत उतरणारी मीनल धपाकन पडली होती. तिला बरंच लागलं असावं कारण आमच्या ग्रुपमधल्या दोन मुलांनी दोन्ही बाजुला पकडलं होतं तरी तिचं कण्हणं सुरुच होतं. नशीबाने आमच्यातला नितीन डॉक्टर होता पण तिला पेन किलर देऊन मुंबईला गेल्यावर कुठे न्यावं खेरीज विशेष काहीच करण्यासारखं नव्हतं. नंतर कळलं की तिला लिगामेंट फ़्रॅक्चर झालं होतं आणि दोनेक महिनेतरी घरीच राहावं लागणार होतं. ग्रुपमध्ये एकाचं जरी बिनसलं की आपसूक पूर्ण ट्रेकवर त्याची छाया येते तसंच झालं आणि सगळीजणं शांतपणे उतरायला लागली. मध्ये मध्ये चढण्यापेक्षा उतरणं कसं जास्त रिस्की आहे आणि तिने असं लागु न द्यायला काय करायला हवं होतंपासुन ते तिची थोडीफ़ार खेचाखेची हेही सुरु होतंच. नशीब खालीच आम्ही भाड्याने आणलेली पंधरा सिटर होती नाहीतर आज काय खरं नव्हतं.


हे एक संकट समोर आहे तोच दुसरा एक नवाच अनुभव आमच्यासाठी पुढे होताच. आम्ही उतरताना एक टारगट मुलांचा ग्रुप पळतपळत वर गेला. नुस्ती हुल्लडगिरी सुरु होती म्हणून जाणवलं पण कुठे लक्ष द्या? पण त्यानंतर वीसेक मिनिटांतच आमच्यापाठी एक घाईघाईत उतरणारं जोडपं दिसलं. पाय मोडलेल्या मेंबरमुळे आमचा वेग कमी होता पण त्यातली बायको मुसमुसताना दिसली म्हणून जयेशने तिच्या नवर्‍याला काही मदत हवी आहे का असं सहज विचारलं आणि कळलं ते थोडं धक्कादायकच होतं. आम्हाला वर वेगात जाणारी जी मुलं दिसली होती त्यांनी आमच्या मागे उतरणार्‍या या जोडप्याला मध्ये कुठेतरी एकांतात गाठलं आणि धमकावलं. बायकोला काही होऊ नये म्हणून अंगावरचे, दागिने, घड्याळ, पाकिट असं सगळं त्या जोडप्याने त्यांना दिलं आणि आता विमनस्कपणे खाली उतरत होते. आमच्या अंगावर काटा आला. मुळात नव्या लग्न झालेल्या जोडप्याने फ़िरायला यायची ही जागा नव्हे आणि त्यातही दागिने इ. जोखीम घेऊन. पण आता गेली गोष्ट होऊन गेली होती. आमच्या बसमध्ये जागा असणार होती म्हणून आम्ही त्यांना पनवेलपर्यंत सोडायची तयारी दाखवली आणि पुढच्या प्रवासासाठी पैसे. त्यानंतर आणखीच गप्पपणे खाली उतरून बसमध्ये चढुन एका दिवसांत किती प्रसंग दिसले त्याचा विचार करत घरी परतलो. विलंबीत लयीत सुरु झालेली, दादरा आणि तराण्याच्या साथीत रंगलेली ही आणखी एक मैफ़ल.

त्यानंतरची कर्नाळा ट्रीप आठवते ती अशाच एका जूनमधली. संगीताचा वाढदिवस जूनमध्ये असायचा आणि नुकताच सुरु झालेला पावसाळा कर्नाळ्यात छान अनुभवता येईल म्हणून अल्पाच्या गाडीने चटकन होईल म्हणून अगदी आयत्यावेळी ठरवलेली आणखी एक कर्नाळा ट्रीप अशीच वेगळा अनुभव देणारी. आम्ही चार मुलीच होतो. पण बाकीच्या वयाने माझ्यापेक्षा जास्त मॅच्युअर ग्रुप म्हणून चला जाऊया म्हटलं आणि दुपारपर्यंत चढलो, वरती घरुन आणलेला खाऊ खाल्ला आणि तेव्हा कर्नाळ्याच्या पायथ्याशी एक हॉटेल होतं (आता ते बहुधा नसावं) तिथे वडापाव खाऊन परत निघुया म्हणून उतरताना माझ्या लक्षात आलं नाही पण माझ्या मॅच्युअर मैत्रीणींच्या लक्षात आलं की एक मध्यमवयीन माणसांचं टोळकं आपला पाठलाग करतंय. आम्ही ब्रेक घेतला की आसपास ब्रेक घेणं, कमेन्ट्स इ. त्यावेळी थोडं घाबरायला झालं पण नशीबाने आम्ही पायथ्याच्या साधारण जवळपास होतो आणि अल्पा तशी व्यवसायासाठी अनेक बिल्डर वगैरेंशी सामना करते त्यामुळे बरीच बोल्ड आहे. तिने त्यावेळी खूप संयमाने हाताळलं. सुरुवातीला मला आणि इतरांना काही सुचना देताना त्या टारगट ग्रुपला कळलंही नाही आणि मग पायथ्याची गर्दी दिसायला लागली तशी त्यांना बरोबर झापुन पटापट उतरून आम्ही त्या हॉटेलात चहा आणि वडा-पाव खाताना आपणही असं एकटं यायला नको होतं या चर्चा करत राहिलो. वरच्या दोन प्रसंगामध्ये कर्नाळ्याला काही सांगायचं होतं का असं त्रयस्थपणे या घटनांकडे पाहिलं की मला उगीच वाटतं. कदाचित आता कर्नाळा जास्त करुन पिकनिकर्सचं होतंय हाच तो संदेश असावा.
हे दोन थोडे कडवट प्रसंग जरी असले तरी याच्या मध्येच मी एका एप्रिलमध्ये कर्नाळ्याला गेलो तेव्हा माझ्या सॅकमध्ये मॉनजिनिसचा माझा आणि आमच्या ग्रुपचा आवडता ब्लॅक फ़ॉरेस्ट घेऊन गेले होते तो ट्रेकही मला आठवायला आवडतो. यावेळी पण आम्ही त्या पंधरा सिटरनेच गेलो होतो. खरं तर आम्ही दहाएक जणंच असू पण स्वतःच वाहन असणं कर्नाळ्यासाठी तरी सोयिस्कर पडतं हे आता अनुभवाने लक्षात आलं होतं. माझ्या आधीच्या वाढदिवसाला हीच सॅक माझ्या याच ग्रुपमधल्या मित्र-मैत्रीणींनी मला दिली होती. खरं तर कर्नाळ्यासाठी ती मोठी होती. पण दुर्बिण, पाणी, सालिम अलींचं पुस्तक घेऊन फ़िरायचं तर ती सॅक बरी पडे म्हणून मी ती आणली असावी असं सर्वांना वाटलं होतं आणि वर पोहोचल्यावर आम्ही खायचा ब्रेक घेतला तेव्हा त्यातुन केक काढुन सगळ्यांच्या चेहर्‍यावरचं आश्चर्य आणि आनंद पाहण्यापुढे ते ओझं घेऊन चढणं काहीच नव्हतं. खरंच माझ्या भटकंती कारकिर्दीतले ते मंतरलेले दिवस होते.

त्यानंतर नेहमी माझ्या तोंडून कर्नाळा कर्नाळा ऐकुन माझ्या एका जास्त ट्रेक न करणार्‍या ग्रुपबरोबर बाइकने कर्नाळ्याला जायचा योगही आला. त्यातही मला कुणाची तरी बाइक पनवेलनंतर चालवायलाही मिळाली होती. त्यामुळे आपण कधीतरी बाइकने एखादा मोठा ट्रेक करु इ.इ. स्वप्न रंगवायला मीही सुरुवात केली होती..पण मुलींच्या आयुष्यात काही स्वप्न फ़क्त स्वप्नंच राहतात तसंच माझं हे एक स्वप्न अद्यापतरी सत्यात आलं नाही.आलंच तर त्याची सुरुवात मी कर्नाळ्यापासुन केली असं सांगायला मला नक्कीच आवडेल.
तुर्तास तरी सुरुवातीला म्हटलं तसं कर्नाळ्याच्या आठवणींची ही सुरेल मैफ़ल कधीच संपु नये, कर्नाळ्याने कधी बदलु नये आणि आपण त्याला कधी विसरु नये असं मला तेव्हा वाटायचं. फ़क्त तो योग आता पुन्हा कधी येतो त्याची वाट पाहात त्या आठवणी जागवायच्या आणि त्या सुरेल क्षणांची आपण काही काळ का होईना साक्षिदार होतो याबद्दल त्या विधिलिखिताचे आभार मानायचे इतकंच मी करु शकते.....


फ़ोटो...साभार डॉ. संगिता धानुका आणि मायाजाल

Friday, December 10, 2010

मालवण - शेवटचा दिवस मार्गे राधानगरी

मालवण भाग एक आणि दोन नंतर पुढे

तिसरा आणि शेवटचा दिवस म्हणजे पळापळ...एक तर ट्रिप संपतेय याची थोडी हुरहुर...पुन्हा असं कधी जाता येईल का अशा संमिश्र भावना आणि असंच काही काही...नंतर खरं सांगायचं तर अशा प्रकारे बाहेर गेलो नाहीच असं नाही पण प्रत्येक वेळी "आपलं मालवण" म्हटलं की प्रत्येकजण आठवणींच्या राज्यात जातो आणि ही सगळ्यात मस्त ट्रीप होती हे मान्य करावंच लागतं....


परत जाताना माझ्यासारख्या भूगोल कच्चा असणार्‍यांसाठी आणखी एक गम्मत होती ती म्हणजे येताना आम्ही आलो होतो त्याच रस्त्याने परत जाणार नव्हतो. तर परतीचा मार्ग व्हाया दाजीपूरचं राधानगरी अभयारण्य होता...म्या पामरासाठी गाडी तो एक मोठा गेट का जे काय होतं ते ओलांडल्यानंतर एकदम कोकणची लाल माती संपते आणि घाटावरचा भाग सुरु होतो हे म्हणजे अजी म्या ब्रम्ह पाहिले असं काही होतं..म्हणजे कोकणात आणि कोल्हापुरमध्ये शेपरेट ट्रिपा झाल्या होत्या पण हे असं कोकण संपलं आणि मग घाट हा प्रकार म्हणजे मनात एकदम बसला आणि मला वाटत तेवढ्यासाठी जयेशला मी तरी स्तुती (खरी) करुन खूप चढवलं..त्याने तो जरा जास्तच चढला हे वेगळं....पण मजा आली....

तर राधानगरी हे कोल्हापुरातलं बायसन म्हणजे गौर(किंवा मला वाटतं गवा) या प्राण्यासाठीचं राखीव अभयारण्य. खरं तर महाराष्ट्रातलं पहिलंवहिलं अभयारण्य ही पण ओळख आहे पण तरी बायसनसाठी हे जास्त प्रसिद्ध आहे. याला ओळखायची खूण म्हणजे त्याच्या नाकासमोर असणारा पांढरा ठिपका. आम्ही तसे दुपारचे पोहोचत होतो त्यामुळे पक्षी दिसण्याची शक्यता तशी कमी होती आणि आम्ही तिथल्या एका मचाणापर्यंत गाडीनेच जात होतो, एखादा छोटा ट्रेल करण्याइतका वेळ नसणार होता त्यामुळे बसमधुनच जंगलदर्शन करण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यात तशी मजा नव्हती. पण कधीतरी फ़क्त राधानगरीला यायला हवं हे मात्र तेव्हापासून मनात आहे (आणि अर्थातच नंतर कधीही झालं नाही हे वेगळं सांगायला नको).

मध्ये मध्ये काही दिसेल असं वाटलं तेव्हा गाडी थांबवली होती पण पक्षी पाहायचे तर खूप सहनशक्ती आणि वेळ पाहिजे..एकतर मार्चमधली टळटळीत दुपार म्हणजे सगळे कुठे नं कुठे आसर्‍याला थांबलेले असणार. त्यातल्या त्यात आम्हाला एक ग्रे जंगल फ़ाउल फ़क्त पळत जाताना दिसली होती तेवढी लिस्टमध्ये आहे म्हणून आठवतंय..

पक्षी दिसले नाहीत तरी तसा फ़रक पडणार नव्हता म्हणा कारण मालवणने तो कोटा पूर्ण केला होता.पण बायसनसाठी मात्र आमच्या ग्रुपमधला रेडा (तोच तो वर उल्लेख केलेला जास्त चढलेला...:)) ओव्हरएक्साइटेड होता त्यामुळे मचाणावर गेल्यावर त्याने बायसनसाठी आपली दुर्बीण रोखली..आणि अर्थात तो नसता तरी त्याला दिसलाच असता. पण बर्‍याच लांब जंगलाच्या दुसर्‍या भागात काळं काहीतरी बसलेलं त्याला दिसलं एकदाचं आणि अर्थातच नाकावरचा तो पांढरा ठिपका.मग आम्ही पण हो हो म्हणून बराच वेळ त्याला पाहिलं...मला खरं सांगायचं तर दगड आणि त्यात एक काळा ठिपका यात काय फ़रक आहे रे असं एकदा विचारावंस वाटलं पण अंतर पाहता त्याच्या हालचाली कळणं कठीण होतं..त्यामुळे उगा त्या वादात मी काही पडले नाही..

मध्ये एक सुतार पक्षीही ठोकाठोकीमुळे दिसला आणि काही चितळंही नशीबात होती.. एका पाणवठ्याच्या जागी चेकड किलबॅक अशा आणखी काही स्पॉटिंगही झाल्या आणि एकंदरित राधानगरीत परत आलं पाहिजे या बोलीवर आम्ही डेरा हलवला. आता मात्र मध्ये फ़क्त खाऊ थांबे घेऊन म्हमई एवढंच होतं...

परतीची हुरहुर एकदा नव्याने आली...जाताना मस्ती होती पण परत येताना जे पाहिलं त्याची उजळणी...पहिल्यांदीच एकत्र राहिलो त्या आठवणी, मूळ ग्रुपमधली जी मंडळी येऊ शकली नाही त्यांना कसं खिजवता येईल आणि हेच सगळं सुरु होतं...त्यानंतरही एकत्र बाहेर गेलो म्हणजे सुपे-रेहेकुरी वगैरे पण तरी जी मजा या थोडा मोठा ग्रुप झालेल्या मालवणच्या ट्रिपमध्ये आली ती कधीच आली नाही असं आम्ही आता भेटतो तेव्हाही बोलतो. मालवण म्हणजे आमच्या ग्रुपला पडलेलं एक स्वप्न होतं आणि ते यशस्वी करायचं सगळं श्रेय जयेशला जातं. खरं तर आमच्यापेक्षा जास्त जंगल त्याने पाहिलंय आणि त्यावेळी स्वतः प्रस्थापित डॉक्टरचा डॉक्टर मुलगा या नात्याने तो यापेक्षा चांगल्या पद्धतीने सगळं काही अफ़ोर्ड करु शकत होता पण आम्हीही सर्व पाहावं आणि सगळं जणू प्रथमच करतोय, त्याची एक्साइटमेंट या सर्वांनी आम्हाला कधी असं तो आमच्यापेक्षा जास्त पैशाने किंवा अनुभवाने मोठा वाटला नाही. सगळा खर्च आम्ही समान वाटूनच केला..

आता जेव्हा मी खरं जास्त काही अफ़ोर्ड करु शकते पण प्रत्यक्षात करु शकत नाही त्यावेळी या ग्रुपबरोबर केलेल्या अशा भटकंतीच्या आठवणी आल्या की वाटतं महिन्याला तीन हजार रुपयांत जे समाधान होतं ते आता डॉलर्सनी कमवले तरी आहे का?? अर्थात भूतकाळ हा जेव्हा वर्तमान असतो तेव्हा आपण तो विचार तसा करणार नसतो आणि गेलेले दिवस कधी परत येणार नसतात..निदान तेव्हातरी अशा दोस्तांबरोबर भटकंतीचे दिवस आले हेही नसे थोडके....

Sunday, November 28, 2010

मालवण दिवस दुसरा - धामापूर, सिंधुदुर्ग आणि रात्रीची भटकंती

आदल्या दिवशीचा मालवण वृत्तांत इथे वाचता येईल.

धामापूर ही मालवणपासून साधारण १५-१८ कि.मी. अंतरावर असलेली पक्षीअभयारण्य आणि तिथे असलेला मानवनिर्मित मोठ्ठा तलाव असलेली जागा आहे. आमचा मुख्य उद्देश पक्षी पाहाणे असल्यामुळे आम्ही सकाळी लवकरच नाश्ता करुन आमची बस घेऊन तिथे पोहोचलो. सकाळची प्रसन्न वेळ म्हणजे पक्षी पाहण्यासाठी पर्वणीच. माझ्या बर्डलिस्टप्रमाणे फ़क्त धामापुरला त्या दिवशी आम्हाला ३५ जातींचे तरी पक्षी दिसलेत.


त्यात बस पार्क केल्यानंतर जो छोटा पायरस्ता चालुन आम्ही भगवती देवीचं देऊळ आणि त्यासमोरच्या तलावाजवळ पोहोचलो होतो तिथे सुरुवातीलाच आम्हाला स्कार्लेट मिनिव्हेटच्या दोन जोड्या दिसल्या. आतापर्यंत हा पक्षी मी नैसर्गिकरित्या पाहिलाच नव्हता त्यामुळे नर आणि मादी दोघांचे रंग पाहुन अक्षरशः हरखायला झाले. त्यानंतर स्मॉल मिनिव्हेटही दिसली. बाकी नेहमी दिसणारे शिंजीर, आयोरा, बुलबुलाच्या जाती, हळद्या, पारवे, ड्रोंगो हे नेहमीचे साथीदार तर होतेच.

तलावाजवळ दिसलेली पाईड किंगफ़िशरची जोडी जणू काही आमच्यासाठीच तिथे थांबली होती. आणि बाकीचे पाणपक्षी अर्थातच होते पण त्या शांत देवळात दर्शन करुन झाल्यावर बाहेर बसलो असताना राकेशने तलावाच्या दुसर्‍या बाजुला स्पॉट केलेला क्रेस्टेड हॉक इगल म्हणजे या सगळ्यावर कळस होता.

आधी त्याला पलीकडच्या किनार्‍यावर एक मोठा पक्षी दिसला आहे इतकं जाणवलं आणि मग दुर्बिणीने पाहून सालिम अलींच्या पुस्तकात कर्न्फ़म करुन मग त्याला जो हर्षवायु झाला होता तो मला आजही तसाच आठवतो. पाण्याच्या जवळ हा गरुड बराच वेळ बसला होता. एकतर त्याबाजुला एकांत आणि मार्चमधला उन्हाळा यामुळे बहुतेक तो तिथे इतका वेळ असावा असं वाटतं. आम्ही सर्वांनी मनसोक्त त्याला पाहून घेतलं आणि दुपारच्या जेवणासाठी मुक्कामी परत आलो.

संध्याकाळी तारकर्लीचा किनारा आणि सिंधुदुर्ग किल्ला असा बेत होता. या ग्रुपमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही चटकन विचार मनात आला तरी कुणीही थोड्या वेळाने निघुया म्हणून कंटाळा केला नाही त्यामुळे हातात असलेला सगळा वेळ आम्ही निसर्गभ्रमंती करु शकलो.थोडक्यात तेरा माणसांची स्वतः बस घेऊन जाण्याचा अगदी पुरेपुर लाभ आम्ही उठवला.

सिंधुदुर्गचा किल्ला म्हणजे बोटीतुन सगळ्यांनी एकत्र जायचा अनुभव, मस्ती आणि तिथेही मनसोक्त भटकंती आणि येताना किनार्‍यावर मच्छिमार लोकांची वर्दळ पाहणे याची मजा होती. तारकर्लीला आमच्या आधी एक ग्रुप आला होता त्यांना डॉल्फ़िन दिसले होते पण आमचं मात्र तितकं सुदैव नसावं. पण खरं सांगायचं तर धामापूर  आणि सिंधुदुर्गमध्ये मन इतकं भरुन आलं होतं की माझ्या पक्ष्यांच्या नोंदीच्या खाली लिहिलेलं wonderful day मला आजही बरंच काही सांगुन जातंय..

पण अजून रात्र बाकी होती. आणि जयेशच्या मते रात्री थोडं गावाबाहेर बस काढली तर एखादं शिकारीसाठी बाहेर निघालेलं जनावर दिसू शकेल त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा सगळं पब्लिक तयार झालं. माझ्या मते नाइट जार हा रात्रीच दिसणारा पक्षी आणि ससे हे सोडलं तर आम्हाला काही दिसलं नाही. एक म्हणजे आम्ही काही कुठल्या राखीव जंगलात गाडी घातली नव्हती आणि दुसरं म्हणजे त्या भागात कुठे काय दिसु शकतं हे सांगणारा कुणी वाटाड्या आमच्याबरोबर नव्हता. पण अगदी पहिल्यांदा असं किर्र काळोखात फ़िरताना जसं रोमांचकारी वाटेल तसं मात्र झालं होतं. मध्ये एका ठिकाणी खसफ़स झाली म्हणून गाडीचं इंजिन बंद करुन आम्ही थांबलो. जयेशच्या अंगात जरा खुमखुमी असल्याने त्याने डोक्यावर लावायची टॉर्च असते ती लावुन उतरून थोडं जाऊनही पाहिलं.

लाल डोळे लांब दिसत होते पण माझं रात्रीच्या अंधारात प्राणी ओळखण्याचं कौशल्य शून्यच आहे. त्यामुळे मी तरी फ़क्त बसमधुन पाहात होते. थोडं पुढे जाऊन जयेशही परत आला. त्याच्या मते ते तरस होतं. असुही शकतं. पण हा अनुभव अजुनही आठवला की वाटतं कुणालाच कसल्या प्रापंचिक चिंता नव्हत्या त्यामुळे मनमुराद भटकण्याचे ते दिवस तेव्हा आले हे तरी नशीब नाही?? आता तर आठवलं तरी आपण नक्की कसली ओझी वाहतो आहोत आणि या अशा जुन्या आठवणीमध्ये पुनःपुन्हा जातो आहोत...

हम्म..अजुन एक दिवस उरलाय आणि कुठे जाणार आहोत आपण?? अजुन काय काय अनुभवायचं आहे बरं......

Sunday, November 21, 2010

मालवणची भटकंती

माझ्या पक्षीनिरिक्षणकालाचा "हनिमुन पिरियड" म्हणता येईल त्या दिवसांतली ही ट्रिप आहे. जयेशचं गाव मालवण आणि तिथला परिसर, दिसणारं पक्षीजीवन याबद्दल त्याला चांगली माहिती होती आणि चांगली गोष्ट ही, की आमचा सगळा ग्रुप तिथे घेऊन जावा, ही कल्पनाही त्यानेच आमच्या मागे लागुन मार्गी लावली. योग्यवेळी योग्य सहकारी मिळाले की एखादं प्रोजेक्ट जसं हमखास यशस्वी होतं तसंच या मालवण दौर्‍याचं झालं.
आईने माझी एक छोटी डायरी तिच्याकडे राहिली होती तिच्यामध्ये या मालवण फ़ेरीची सगळी बर्ड-लिस्ट वाचताना मी स्वतःलाच नशीबवान समजते की मला अशा प्रकारेही फ़िरता आलं. त्या दौर्‍याची या नोंदीप्रमाणे आठवेल तशी ही कहाणी.

Paradise flycatcher male



राखी धनेश

हळद्या
आम्ही मार्चमध्ये हा दौरा आखला होता आणि अगदी फ़ुल हाउस म्हणजे साधारण १२-१३ जण मिनी बसने मुंबईहुन मालवणला निघालो होतो. यावेळी आमच्याबरोबर सर्वात लहान भटक्या होता तो म्हणजे "केदार", त्याने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. बाकी आम्ही सगळे कर्तेसवरते होतो. यात सगळेच आमच्या मूळ ग्रुपमधले नव्हते पण काहींनी आपले पक्षीनिरीक्षणाची आवड असणारे मित्र-मैत्रीणी आणल्यामुळे सर्व मिळून १२-१३ झालो होतो. सर्वानुमते अंधेरी पुर्वेकडे भेटून निघायचं ठरलं त्याप्रमाणे बसही तिथंच बोलावली होती. बर्‍याच सकाळी निघालो होतो. तिथे तीन दिवसांचा मुक्काम होता त्याप्रमाणे सामानही जास्त होतं. सुनीलला यायला जमणार नव्हतं पण तरी आम्हाला निरोप द्यायला तो खास अंधेरीला आल्याचं मला अजुनही आठवतं त्याचा पडलेला चेहरा आम्हाला दिसु नये याचा कसोशीने प्रयत्न चालला होता पण अर्थात आम्ही त्याला जास्त खिजवले नाही. अंधेरीहून निघाल्यावर आम्हाला फ़क्त संगिता आणि तिची मैत्रीण सुगंधा यांना दादरहून घ्यायचे होते की मग आम्ही सुसाट. बसमध्ये अक्षरशः पुन्हा कॉलेजजीवन जगल्यासारखी तुफ़ान मस्ती, गाणी, हैदोस घालुन आम्ही नक्की पक्षी पाहायला चाललोत का असं काही वातावरण निर्माण झालं.पण गाडीने कोकणातल्या लाल मातीला उधळायला सुरुवात केली तसा आमच्यातल्या पक्षीनिरीक्षक जागा झाला.


खंड्या
 त्याचं कारण मुळात हे होतं की ज्या पक्ष्यांना मुंबईच्या नॅशनल पार्कात शोध शोध शोधावं लागायचं ते अगदी आमच्यासमोर हाय हॅलो करायला दिसत होते. त्यांना न्याहाळायला दुर्बिणीची पण गरज पडत नव्हती. आजुबाजुची शेतं, पुलांवरुन बस जाताना दिसलेली नदीची पात्रं अशा अनेक ठिकाणी आम्हाला सुरुवात व्हायच्या आधीच हा मटका लागल्यासारखं झालं होतं. राष्ट्रीय पक्ष्यापासुन सुरुवात झाली ती अगदी पांढर्‍या पोटाचा खंड्या आणि चक्क धनेशाच्या दोन जोड्याही(त्यातही मलाबार पाईड हॉर्नबिल) आम्हाला सहजगत्या दिसल्या. सगळीजण जाम उत्तेजित झाले. मी आत्ता ती बर्डलिस्ट वाचतानाही तिथे पोचल्यासारखं होतंय.

पहिल्या प्लानप्रमाणे आम्ही जय़ेशच्याच घरी राहणार होतो म्हणजे राहिलोही होतो. पण दुसर्‍या दिवशी तिथे त्यांनी घराचा काही भाग कुणाला वापरायला दिला होता त्यांना आमचं येणं कितपत रुचतंय याचा अंदाज न आल्यामुळे तिथेच जवळ एका घर कम खानावळीत राहिलो. तिथे राहण्याचा फ़ायदा म्हणजे अस्सल मालवणी घरगुती जेवण मिळालं आणि घरकाम करायचा त्रासही वाचला.

स्वर्गीय नर्तक
१८ मार्चला साधारण साडे-तीनच्या सुमारास पोहोचलो तर जयेशच्या घराच्या मागेच आम्हाला पाहून पॅराडाइस फ़्लायकॅचरचा मेल दुसर्‍या फ़ांदीवर उडाला. त्याला इतक्या सहजगत्या पाहुन खरं तर आम्हीच उडालो. नॅशनल पार्कात हा "स्वर्गीय नर्तक" दिसावा म्हणून किती नवस बोलायचो आम्ही! अगदी एकदा संगिताने आणलेल्या खिरीला त्या दिवशी मोठ्ठा दांडा असलेला चमचा आणला होता आणि त्यादिवशी नेमका हा नर्तक दिसला तर त्या चमच्याचंच नाव आम्ही "पॅराडाइस चमचा" ठेवलं. तिला प्रत्येकवेळी शकुन म्हणून तो आणायलाही आम्ही सांगायचो. आणि इथे बघा अजुन आंघोळीपण केल्या नाहीत तर आमचा पक्षीदेव आमच्या पुढे हजर. :)

पाइड खंड्या
मालवणमध्ये असाच सहजगत्या दिसलेला दुसरा पक्षी म्हणजे आमचा एल.जी.बी. अर्थात लार्ज ग्रीन बार्बेट. नॅशनल पार्कात त्याचा "कुकडूक कुकडूक" असा काहीसा आवाज ऐकायचो पण साहेबांचं दर्शन म्हणजे राकेशला दिसला तर. पण जयेशच्या घराच्या ओट्यावर बसल की समोरच्याच झाडावर एल.जी.बी आवाज करतोय आणि आम्ही "आ" वासुन पाहातोय. अहाहा....आणि असं जवळून दर्शन झाल्यावर मग निवांतपणे दुर्बिणीतूनही या पक्ष्यांनी त्यांचे रंग डोळ्यात कायमचे साठवेपर्यंत तिथे बसुन राहणं त्या दिवसांत रोजचं. आम्ही काय बघतो हे त्याच्या शेजारच्यांना कळायचं नाही कारण त्यांच्यासाठी हे पक्षी म्हणजे काही आमच्यासारखी नॉवेल्टी नव्हती. आम्हाला त्यांचा इतका हेवा वाटला ना...

Shrike
त्या दिवशी रात्री जेवल्यावर अंगणात आतापर्यंत पाहिलेले चांगले पंचवीसेक पक्ष्यांच्या लिस्टची उजळणी आणि पुढे काय काय पाहायला मिळेल याच्याच चर्चा सुरु होत्या. एवढा मुंबईपासुनचा रात्रभरचा प्रवास झाला तरी या पक्षीदर्शनाने मात्र कुणीच मरगळलेलं नव्हतं. रात्री त्याच्या घरी झोपुन दुसर्‍या दिवशी त्या घरगुती लॉजमध्ये जायचं होतं. आणि दुसर्‍या दिवशीच्या लिस्टवर होतं धामापुर.

पण त्याबद्द्ल नंतर. आज आठवणी आहेत त्या मालवणचं प्रथम दर्शन, तिथली ताजी हवा, रात्रीचं सामिष जेवण, सोलकढी आणि या सर्वांवर कडी करणारे ते पंचवीसच्या वर दिसलेले वेगवेगळ्या जातींचे पक्षी...

Sunday, October 17, 2010

लोहगडावर एक रात्र आणि दिवस

जसजशी निसर्गभ्रमंतीची आवड निर्माण होते तसतसं हळुहळु नेहमीची नॅशनल पार्क आणि अशा जवळपासच्या जागा सोडून थोडं वेगळ्या जागीही जावंसं वाटायला लागतं. त्यात जर वेळीच योग्य सोबती मिळाले तर मग सह्याद्री हा आपला जवळचा मित्र बनुन किती ओढ लावतो हे ज्यांनी ती तशी भटकंती केलीय किंवा करतात त्यांना सांगायलाच नको.


अशाच एका चर्चेत संगिताने तिच्या माहितीतलं कुणीतरी लोहगडावर जाणार आहे त्यांच्या बरोबर जाऊया का अशी कल्पना पुढे आणली आणि जवळजवळ सगळेच तयार झाले.२००० च्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये साधारण खूप पाऊस नाही पण गरमीही नाही अशावेळी आम्ही जायचं ठरवलं. सारेच मुंबईहून जाणार असल्याने एका शनिवारी दुपारी सिंहगडने लोणावळा आणि मग लोकलने मळवली गाठावं. संध्याकाळी चढून, रात्री गडावरच्या गुंफ़ेमध्ये राहावं, रविवारी गड हिंडून मग दुपारी जरी परतीचा प्रवास सुरु केला तरी रविवार रात्रीपर्यंत सारी घरी पोहोचतील अशी साधारण आखणी होती.

आम्ही जवळजवळ सगळीच जणं व्हीटीला भेटलो. माझा क्लायन्टही तेव्हा फ़ोर्टला होता त्यामुळे मलातर जास्तच सोयीचं होतं. शनिवारची दुपार कधी येते असं झालं होतं. एकत्रच भेटल्यामुळे गाडीत एकत्र बसायला मिळालं..लोणावळा-पुण्याला ट्रेनने जायला मला फ़ार आवडतं..कर्जतचा वडा खायचा, पावसाळ्यातले हिरवे डोंगर, धबधबे पाहायचे...ट्रेकच्या आधीच मन प्रसन्न होतं. मला आठवतं हे वडे खाल्यावर सगळ्यांनी आपापला कचरा गाडीबाहेर फ़ेकु नये म्हणून आमच्या ग्रुपमधल्या सत्यमने एक उत्स्फ़ुर्त रोड (की ट्रेन) शो केला होता. जमुरे टाइप संवाद म्हणून आणि आम्ही पण त्याला साथ केली होती. आमच्या सहप्रवाशांना त्यामुळे आम्ही पावसाळ्यात दंगामस्ती करणार्‍या भटक्यांपेक्षा काही वेगळे आहोत असंही वाटलं असावं. पण एक खरं तो प्रवास खूप छान झाला होता. त्या आठवड्याच्या कामाचा शीण हळूहळू विसरायला होत होता.

मळवलीपासुन आधी जो गावातून रस्ता जातो आणि मग डावीकडे भाज्याची लेणी दिसतात तिथपर्यंत सगळं छान सुरु होतं. नंतर मध्ये मध्ये थोडा चढ येतो..(मला वाटतं आता तिथंही रस्ता झाला आहे. पण मी स्वतः नंतर तिथं गेले नाही त्यामुळे नीट माहित नाही) तर त्या चढावाच्या इथे का माहित नाही मला धाप लागायला लागली. पहिल्यांदीच रात्री राहायचा प्लान असल्यामुळे पाठीवर राहायचं, खायचं सामान, पाण्याच्या बाटल्या हे नाही म्हटलं तरी वजनच; शिवाय कामाचा दिवस, त्यामुळे शरीर संध्याकाळी थोडं थकलेलंही होतं. मग माझं काही सामान राकेश,जयेश यांनी काढुन घेतलं आणि माझीही गाडी हलु लागली. खरं हा सगळा आणि यानंतर काही ट्रेक केले त्यातुलनेने लोहगड खूप सोपा आहे आणि नंतर तर सरळ पायर्‍याच आहेत पण त्यावेळचा माझा तो दुसरा किंवा तिसरा ट्रेक होता त्यामुळे सवय नव्हती म्हणूनही असं झालं असावं..

पुन्हा गाव लागुन पायर्‍या लागेस्तो अंधार पडायला लागला होता आणि आमच्या गाईडच्या मते आता लवकर माथा गाठायला हवा. पायर्‍यांचा रस्ता संपेस्तो जवळजवळ अंधारच झाला होता त्यामुळे आम्ही आमच्या पथार्‍या पसरायला पहिले जागा शोधायला सुरुवात केली. तिथे आमच्या आधी आणखी एक ग्रुपही वस्तीला होता आणि मला वाटतं आमच्या ग्रुपमध्ये मी आणि संगिता दोघीच मुली होतो त्यामुळे मग आमच्या रक्षणकर्त्या ग्रुपमित्रांनी आम्हाला सोयीस्कर पडेल अशा जागेची सोय केली...एकदा तिथे सेट झाल्यावर मग बरोबरीच्या खाऊची अंगतपंगत झाली आणि एकदम आम्हाला आठवलं की सुनीलपण येईन असं म्हणाला होता. आम्ही असं म्हणतोय तोच स्वारी चक्क ऑफ़िसचे कपडे आणि लेदरचे बुट अशा अवतारात हजर..मला वाटतं तो कुठल्यातरी इंटरव्ह्युवरुन सरळ इथेच येत होता. कसा काय अंधारात पोहोचला माहित नाही पण ही वल्ली नॅशनल पार्काच्या बाजुला राहुनही खूपदा स्लिपरमध्ये आमच्या बरोबर कान्हेरीला आलीय..कारण घरी नाक्यावर जातो असं काहीतरी सांगितलेलं असायचं मग दुसरं काय करणार?? असो..तर त्या रात्री झोप कमी आणि गप्पा जास्त असं सुरु होतं.

सकाळचे नक्की किती वाजले होते माहित नाही पण गडाखालुन एक सुंदर शीळ येत ऐकु येत होती. अरे Malabar Whistling Thrush अर्चित लगेच म्हणाला..त्या आवाजाचा मागोवा घेण्यासाठी सगळेच एक एक करुन उठले पण त्या दिवशी एकंदरित पक्षीदर्शन नशीबात नव्हतं. खरं तर त्या पूर्ण ट्रेकमध्ये नंतर दिसलेली पांढरपाठी गिधाडं सोडली तर काहीच पाहिल नाही पण जे काही निसर्गदर्शन झालं त्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील.

त्या थ्रशच्या निमित्ताने उठल्यामुळे प्रथमच गड पाहिला कारण आलो तेव्हा रात्रच होती.सगळा हिरवा आसमंत धुक्याने भरुन गेला होता आणि शुद्ध हवेचा एक वेगळा वास आणि प्रसन्नता जाणवत होती. मला आठवतं मी आणि संगिता त्या धुकंमिश्रीत हिरवाईला पहिल्यांदी पाहताना वेड्यासारख्या इकडे-तिकडे भटकत होतो. सूर्यदेव आले की ते विरणार हे चांगलं ठाऊक होतं ना?

थोड्या वेळाने आम्ही कुणाच्याही सुचनांशिवाय पटापट सकाळची आवराआवरी केली. आमच्याबरोबर संगिताचे एक मित्र (मी त्यांचं नाव पूर्ण विसरले आहे) आम्हाला गाईड म्हणून आले होते ते एकदम पट्टीचे भटके होते त्यामुळे त्यांनी चहाची सोय केली आणि आम्ही बरोबर आणलेल्या सुक्या खाऊचा नाश्ता करुन लगेचच बॅगा बांधुन भटकंतीला तयार झालो.


हे माझे सुरुवातीचे ट्रेकचे दिवस म्हणजे कॅमेरा नाही आणि नोंदी ठेवायचा आळस असे असल्याने आता जितकं आठवतं तितक्यावरच विश्वास. पण त्यांनी आम्हाला सगळा गड फ़िरवला, माहिती दिली आणि सर्वात शेवटी आम्हाला विंचुकाटा हा साधारण गडाच्या सोंडेसारखा भाग आहे तिथे ते घेऊन गेले होते. इथे जाण्यासाठी गड आणि विंचुकाटा यामध्ये एक थोडा कठीण उतरायचा पल्ला आहे. तो मी तरी या गाईडच्या मदतीनेच उतरू शकले होते. पण आमच्या ग्रुपमधल्या जयेशला का माहित नाही अजिबात ते जमलं नाही..आणि मग तो तिथंच आमची वाट पाहात बसुन राहिला होता. परत जाताना ट्रेनमधुन हा विंचुकाटा दिसतो आणि आम्ही जिथे जयेश बसला होता त्या जागेला "जयेश पॉइन्ट" असं नाव देऊन त्याची बरेच महिने टरही उडवली होती.असो, पण या ठिकाणी वारा पीत थांबलो होतो तेव्हा तीन-चार पांढरपाठी गिधाडं जवळजवळ आमच्या डोक्यावरुन घिरट्या घालत गेल्याचं आठवतंय.

आधी आम्ही पोटपुजा विंचुकाट्यावर करणार होतो पण मग आमचाच एक मित्र तिथे एकटा होता त्यामुळे जास्त वेळ काट्यावर काढलाही नाही पण तिथुन वारा भन्नाट लागत होता आणि आजुबाजुचा हिरवा परिसर, शेती इतकं छान वाटत होतं ना?? शिवाय आम्हाला मुंबईला जायचं असल्यामुळे परतीचा प्रवास सुरु करणं भाग होतं. परत येताना आमच्या गाइडने मग आम्हाला गडाचे दरवाजे इ.ची सुद्धा माहिती दिली. एकंदरित मजा आली..पावसाळ्यात कर्जतच्या पुढं कुठंही गेलं तरी निसर्ग वेड लावतो. त्यात असा एखादा गड चढला की वरुन दिसणारं नयनरम्य दृष्य ती जादू मनःपटलावर कोरून ठेवते.

कॅमेरा तेव्हा नव्हताच त्यामुळे फ़ोटो नाहीत, ज्या व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे तिथे गेलो ती संगिताही नाही, पण आठवणी आहेत. मागे एकदा कुणीतरी लोहगडचे फ़ोटो मेलमध्ये पाठवले होते त्या अनामिकाचे आभार मानुन तेच इथे चिकटवतेय. आणि आठवणीतल्या या अशा जागी पुन्हा केव्हातरी नक्की जाईन असं मनातल्या मनात म्हणतेय...