RSS

Sunday, November 28, 2010

मालवण दिवस दुसरा - धामापूर, सिंधुदुर्ग आणि रात्रीची भटकंती

आदल्या दिवशीचा मालवण वृत्तांत इथे वाचता येईल.

धामापूर ही मालवणपासून साधारण १५-१८ कि.मी. अंतरावर असलेली पक्षीअभयारण्य आणि तिथे असलेला मानवनिर्मित मोठ्ठा तलाव असलेली जागा आहे. आमचा मुख्य उद्देश पक्षी पाहाणे असल्यामुळे आम्ही सकाळी लवकरच नाश्ता करुन आमची बस घेऊन तिथे पोहोचलो. सकाळची प्रसन्न वेळ म्हणजे पक्षी पाहण्यासाठी पर्वणीच. माझ्या बर्डलिस्टप्रमाणे फ़क्त धामापुरला त्या दिवशी आम्हाला ३५ जातींचे तरी पक्षी दिसलेत.


त्यात बस पार्क केल्यानंतर जो छोटा पायरस्ता चालुन आम्ही भगवती देवीचं देऊळ आणि त्यासमोरच्या तलावाजवळ पोहोचलो होतो तिथे सुरुवातीलाच आम्हाला स्कार्लेट मिनिव्हेटच्या दोन जोड्या दिसल्या. आतापर्यंत हा पक्षी मी नैसर्गिकरित्या पाहिलाच नव्हता त्यामुळे नर आणि मादी दोघांचे रंग पाहुन अक्षरशः हरखायला झाले. त्यानंतर स्मॉल मिनिव्हेटही दिसली. बाकी नेहमी दिसणारे शिंजीर, आयोरा, बुलबुलाच्या जाती, हळद्या, पारवे, ड्रोंगो हे नेहमीचे साथीदार तर होतेच.

तलावाजवळ दिसलेली पाईड किंगफ़िशरची जोडी जणू काही आमच्यासाठीच तिथे थांबली होती. आणि बाकीचे पाणपक्षी अर्थातच होते पण त्या शांत देवळात दर्शन करुन झाल्यावर बाहेर बसलो असताना राकेशने तलावाच्या दुसर्‍या बाजुला स्पॉट केलेला क्रेस्टेड हॉक इगल म्हणजे या सगळ्यावर कळस होता.

आधी त्याला पलीकडच्या किनार्‍यावर एक मोठा पक्षी दिसला आहे इतकं जाणवलं आणि मग दुर्बिणीने पाहून सालिम अलींच्या पुस्तकात कर्न्फ़म करुन मग त्याला जो हर्षवायु झाला होता तो मला आजही तसाच आठवतो. पाण्याच्या जवळ हा गरुड बराच वेळ बसला होता. एकतर त्याबाजुला एकांत आणि मार्चमधला उन्हाळा यामुळे बहुतेक तो तिथे इतका वेळ असावा असं वाटतं. आम्ही सर्वांनी मनसोक्त त्याला पाहून घेतलं आणि दुपारच्या जेवणासाठी मुक्कामी परत आलो.

संध्याकाळी तारकर्लीचा किनारा आणि सिंधुदुर्ग किल्ला असा बेत होता. या ग्रुपमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही चटकन विचार मनात आला तरी कुणीही थोड्या वेळाने निघुया म्हणून कंटाळा केला नाही त्यामुळे हातात असलेला सगळा वेळ आम्ही निसर्गभ्रमंती करु शकलो.थोडक्यात तेरा माणसांची स्वतः बस घेऊन जाण्याचा अगदी पुरेपुर लाभ आम्ही उठवला.

सिंधुदुर्गचा किल्ला म्हणजे बोटीतुन सगळ्यांनी एकत्र जायचा अनुभव, मस्ती आणि तिथेही मनसोक्त भटकंती आणि येताना किनार्‍यावर मच्छिमार लोकांची वर्दळ पाहणे याची मजा होती. तारकर्लीला आमच्या आधी एक ग्रुप आला होता त्यांना डॉल्फ़िन दिसले होते पण आमचं मात्र तितकं सुदैव नसावं. पण खरं सांगायचं तर धामापूर  आणि सिंधुदुर्गमध्ये मन इतकं भरुन आलं होतं की माझ्या पक्ष्यांच्या नोंदीच्या खाली लिहिलेलं wonderful day मला आजही बरंच काही सांगुन जातंय..

पण अजून रात्र बाकी होती. आणि जयेशच्या मते रात्री थोडं गावाबाहेर बस काढली तर एखादं शिकारीसाठी बाहेर निघालेलं जनावर दिसू शकेल त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा सगळं पब्लिक तयार झालं. माझ्या मते नाइट जार हा रात्रीच दिसणारा पक्षी आणि ससे हे सोडलं तर आम्हाला काही दिसलं नाही. एक म्हणजे आम्ही काही कुठल्या राखीव जंगलात गाडी घातली नव्हती आणि दुसरं म्हणजे त्या भागात कुठे काय दिसु शकतं हे सांगणारा कुणी वाटाड्या आमच्याबरोबर नव्हता. पण अगदी पहिल्यांदा असं किर्र काळोखात फ़िरताना जसं रोमांचकारी वाटेल तसं मात्र झालं होतं. मध्ये एका ठिकाणी खसफ़स झाली म्हणून गाडीचं इंजिन बंद करुन आम्ही थांबलो. जयेशच्या अंगात जरा खुमखुमी असल्याने त्याने डोक्यावर लावायची टॉर्च असते ती लावुन उतरून थोडं जाऊनही पाहिलं.

लाल डोळे लांब दिसत होते पण माझं रात्रीच्या अंधारात प्राणी ओळखण्याचं कौशल्य शून्यच आहे. त्यामुळे मी तरी फ़क्त बसमधुन पाहात होते. थोडं पुढे जाऊन जयेशही परत आला. त्याच्या मते ते तरस होतं. असुही शकतं. पण हा अनुभव अजुनही आठवला की वाटतं कुणालाच कसल्या प्रापंचिक चिंता नव्हत्या त्यामुळे मनमुराद भटकण्याचे ते दिवस तेव्हा आले हे तरी नशीब नाही?? आता तर आठवलं तरी आपण नक्की कसली ओझी वाहतो आहोत आणि या अशा जुन्या आठवणीमध्ये पुनःपुन्हा जातो आहोत...

हम्म..अजुन एक दिवस उरलाय आणि कुठे जाणार आहोत आपण?? अजुन काय काय अनुभवायचं आहे बरं......

9 comments:

Anonymous said...

अपर्णाबाई : तुम्ही त्या स्थळाला कधी भेट दिली होती? ती भेट खूप आधी झालेली असल्यास तसा उल्लेख करावा, असं मला वाटतं. हा प्रवास तुम्ही केल्यानन्तर बराच काळ उलटला असावा, असा माझा (उगीचच) अन्दाज़ आहे.

'शुन्य', 'अजुन', 'दिसु' हे शब्द वाचताना एके काळी लेखनशुद्‌धतेवर याच बाईंनी लिहिलं होतं, याची आठवण होत राहिली.

धामापूर गांवी सुनीताबाई देशपांडे यांची आजी (वडिलांची सावत्र आई, जी सुनीताबाईंवर खूप प्रेम करत असे) होती. 'आहे मनोहर तरी' पुस्तकांत धामापूरची 'हसरी, ओलसर नक्षत्रं' असा उल्लेख आहे. त्या उल्लेखाची आठवण झाली, म्हणून मी तुमचा लेख वाचायला घेतला.

- डी एन

अपर्णा said...

धनंजयकाका, मला वाटतं मी या आधीच्या पोस्टमध्ये तो उल्लेख ओझरता केला आहे...खरं सांगायचं तर या ब्लॉगमधल्या काही अपवाद वगळता सगळ्याच आठवणी फ़ार जुन्या आहेत निदान दहा वर्षे तरी...त्यावेळी निव्वळ पक्षीनिरीक्षण इतकं डोक्यात भिनलं होतं की तुम्ही सांगितलेले उल्लेख लक्षातही घेतले नसते असं वाटतं...
शुद्धलेखनाच्या चुका पुन्हा व्ह्यायला लागल्यात हे खरंय....जमल्यात त्या दुरुस्त केल्या आहेत...आणखी आढळल्या तर त्याही करायल्या हव्यात....
प्रतिक्रियेबद्दल आभारी...

Anonymous said...

Aparna-bai : Even a cursory mention that the hike took place 8-10 years ago, or even a vague mention on the lines of '10-20 years ago', would suffice for me. Others may want greater accuracy, and some others may simply care nothing about it. I realise that you are not writing a book here but Marathi writing has been rightly criticized for its cavalier approach to dates. Ravindra Pinge has written a beautiful article on Kumar Gandharva with no hint at all about its vintage, except a casual mention which has slipped by and which only an alert reader (like me, wink) would catch. It talks about 'the recently deceased Allauddin Khan', and I happen to know that he had died in 1972.

Of course sometimes the writer may purposely want to hide any hints about the main event's datestamp. In such cases, I have even resorted to giving misleading hints. But that's a different matter altogether.

By the way, the 'pur' usage is distinctly Hindi. In Marathi, we tend to use the deergha variant, as in Solapoor, Kolhapoor, 'Dhamapoor', Nagpoor.

- dn

अपर्णा said...

डीएन काका,

या ब्लॉगच्या एका पोस्टीवर इतका उहापोह होऊ शकतो ही माझ्यासाठीच बातमी आहे पण तरी आपण इतकं आवर्जुन लिहिलंच आहे तर थोडं सांगु इच्छिते...या ब्लॉगवर उजवीकडे welcome मध्ये जे लिहिलं आहे तिथे नजर गेली की साधारण यातल्या पोस्ट्सचा संदर्भ कळेल. तसंच "प्रथमा" ही पोस्ट वाचली तरी.
अर्थात प्रत्येक वाचकाने अख्खा ब्लॉग नजरेखाली घातलाच पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही पण आपल्याला थोडा रस असेल तर सगळी माहिती थोडीफ़ार इथे-तिथे विखुरल्या अवस्थेत का होईना पण आहे...त्यात उल्लेखलेल्या व्यक्तींचे संदर्भही तसेच आहेत.
खरं म्हणजे मला स्वतःलाच नोंदी नसल्याने आठवणीत जसं राहिलंय तसं लिहावं लागतं आणि कुठेतरी भटकंतीची धग माझ्या मनात सुरु ठेवायचा हा प्रयत्न आहे.....या सगळ्यात जर मी हे पुन्हा सुरु करु शकले तर जास्त चांगल्या नोंदी येऊ शकतील...बाकी सगळ्या अर्धवट आठवणी आहेत असं म्हटलं तर जास्त बरं....

Anonymous said...

> या ब्लॉगच्या एका पोस्टीवर इतका उहापोह होऊ शकतो ही माझ्यासाठीच बातमी आहे
>---

अहो बाई, एका पोस्टवर २०-३० प्रतिक्रिया खेचणार्‍या तुम्ही. ही चर्चा म्हणजे त्या तुलनेत अगदीच किरकोळ आहे.

गोविन्दराव टेम्ब्यांच्या 'माझा संगीत व्यासंग' पुस्तकात कुठेही सनावळ नाही, यासाठी वामनराव देशपांड्यांनी त्यांच्यावर टीका केली होती याची मला उगीचच आठवण आली. तुम्ही सहज़ आठवणी लिहिता आहात, त्याला ऐतिहासिक महत्त्व नाही, हे सर्व मला मान्य आहे. तेव्हा माझा मुद्दा मी मागे घेतो आणि तुमची सपशेल माफी मागतो.

पण ही सवय मराठी लोकांना आहे खरी. पु ल बेळगावात कधी होते? 'रावसाहेब' वाचून त्याचा अन्दाज़ येणं कठीण. 'दूधभात' चित्रपटाची पटकथा तेव्हा ते लिहित होते हा एकमेव कालनिर्देश. त्या सिनेमाचं वर्षं पाहिल्यावर तो सनाचा खुलासा होईल.

ज़ाता ज़ाता एक गंमत : 'शाळा' पुस्तकात एप्रिलमधे आणिबाणी-विरोधी आन्दोलन दाखवलं आहे. म्हणजे पुस्तकाचा काळ ऑगस्ट १९७५ ते एप्रिल-मे १९७६. १९७५ आणि १९७७ या दोन्हीं वर्षीं एप्रिलात आणिबाणी नव्हती. पण 'इंग्लंडची टीम गेल्यावर क्रिकेटही बंद झालं' असं एक वाक्य त्यात आहे. इंग्लंडची टीम भारतात होती नोव्हेम्बर १९७६ ते फ़ेब्रुवारी १९७७. तिथे बोकिलांची एका वर्षानी गडबड झाली. पण आणिबाणीची आठवण आणि पुस्तकातले उल्लेख जास्त ठळक, म्हणून क्रिकेटची चूक किरकोळ म्हणून सोडून द्‌यायची.

Naniwadekar said...

I can see 6 lines under the 'WELCOME' banner. Out of them, the last 2 are less than clear because the border and the leaves overlap with them.

Narendra prabhu said...

अपर्णा, धामापूरला गेलात आणि तुम्हाला धनेश (हॉर्नबील) दिसला नाही म्हणजे कमाल आहे. मी जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला धनेश दिसला होता.

अपर्णा said...

नरेंद्रजी, धनेशाचा उल्लेख कालच्या दिवसात म्हणजे आधीच्या पोस्टमध्ये आला आहेच. खरं तर मालवणमध्ये धनेश खूप कॉमन आहे म्हणून या पोस्टमध्ये त्याचा पुन्हा उल्लेख टाळला आहे. आम्हाला फ़क्त धामापूरला साधारण पस्तीसेक जातींचे पक्षी दिसले आणि ते सर्व लिहिले तर थोडं बोअरिंगही होईल. म्हणून फ़क्त माझ्यासाठी त्या दिवशी जे थ्रिलिंग झाले होते त्यांचेच उल्लेख केले आहेत.
आपल्या खास प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.आता मी या पोस्टला आधीच्या पोस्टची लिंक दिली आहे. ती वाचुन पहा त्यात माझ्या एका मैत्रीणीने नंतर काढलेले फ़ोटोही आहेत....

वाचक said...

and नान्या इज ब्याक.... "मी, मला, माझं, मला हे माहित्ये, मला ते माहित्ये" .... चालुदे च्यामायला !!

अपर्णाजी, तुम्हाला जसं लिहायचं असेल तसं लिहायला कोणाच्या बापाची भीती नाही.. त्यामुळे या असल्या सो कॉल्ड विद्वानांना जशास तसे सुनवा किंवा नाहीतर सरळ त्यांची प्रतिक्रिया उडवा. उगाच त्यांच्या नादी लागण्याची आवश्यकता नाही.

आपल्या पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत !!

- आपल्या ब्लॉगचा नियमित वाचक